नगर बुलेटीन -26-02-2021

 नगर बुलेटीन -26-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुपारी सावकारांच्या विरोधात

कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा

वेब टीम नगर : पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी घेऊन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरोधात शनिवार दि.६ मार्च रोजी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

या आंदोलनातंर्गत मुळ शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या शेतात बहिण व भाऊ नांगर चालवून जनते समोर ताबा सिध्द करणार आहे. भांडेवाडी (ता. कर्जत) येथील दळवी वस्ती येथील गट नं.१८५ ची २ हेक्टर ४ आर व १८६ ची २ हेक्टर या दोन जमीनी सावकारी ताब्याशिवाय गहाण होत्या. सदर जमीनी संपत लक्ष्मण पवार, पार्वती रामचंद्र शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर, दिगंबर बाळू पवार, दिनानाथ बाळू पवार यांच्या वडिलोपार्जीत असून, त्यांच्याच ताब्यात आहे. नाना दशरथ वराळे व नानासाहेब बापूराव धांडे यांनी सावकारांकडून सुपारी घेऊन सदर शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.    

  हिंदू वारसा कायद्याने मुलीला भावाप्रमाणे वडिलोपार्जीत संपत्तीत समान हक्क देणार्‍या २००५ च्या दुरुस्ती कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. वडिल जिवंत नसले तरी त्या संपत्तीमध्ये मुलींचा भावाप्रमाणे समान वाटा आहे. तरी देखील सावकाराशी व्यवहार करणार्‍यांनी बहिण व भावाचा हिस्सा विचारात न घेता ताब्याशिवाय जमीन गहाण देण्याच प्रयत्न केला. सुपारी सावकारांना पाठवून सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी सावकार प्रयत्नशील असून, यासाठी शेतकर्‍यांची पिळवणुक सुरु आहे. सुपारी सावकारांचा बिमोड करुन पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कर्जत पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली 

शिवाजी कर्डिले : हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा सत्कार

वेब टीम नगर :  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले बहुमताने निवडून आल्याबद्दल हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेट येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शफी जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, नगरेसवक आसिफ सुलतान, नफिस चुडीवाले, डॉ.इमरान शेख, इरफान जहागीरदार, अकलाख शेख, जुनेद शेख, आफताब शेख, जाकीर कुरेशी, हाजी फकिर शेख, आलिम शेख, महेमुद शेख आदी उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली. अनेक चुकीचे प्रकार बंद पाडले. हे शल्य बोचल्याने प्रस्थापितांनी मला बाजूला करण्याचे काम केले. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन प्रमाणिकपणे काम केल्याने या निवडणुकित मताधिक्याने विजय झाला. राजकीय जीवन संघर्षमय असल्याने प्रस्थापितांना न घाबरता जिल्हा बँकेत प्रमाणिकपणे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रफिक मुन्शी यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व म्हणून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची ओळख आहे. शेतकरी व सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांचे कार्य सुरु असून, लोकनेते म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रूत असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा
 : संजय जोशी यांची मागणी

वेब टीम नगर : सर्वसामन्य नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी खिश्याला परवडेल अश्या साई एक्सप्रेस येत्या ११ मार्च पासून सुरु होणार आहे. मात्र राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा दिला नसल्याने या तालुक्यातून थेट मुंबईला जाण्यासाठी प्रवासी वंचित राहणार आहे. त्यामुळे साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा या रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवासी व उद्दोजाकांची सोय करावी अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. खा. डॉ. गिरीष बापट, खा.सदाशिव लोखंडे व खा. डॉ. सुजय विखे यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व पर्यटक यांचा वेळ वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी धावणारी साई एक्सप्रेस रेल्वे सुरु करण्याची मागणी करत प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांच्या वतीने गेली दहा वर्षे पाठपुरावा करीत होते. श्रीरामपूरहून १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दररोज रेल्वे खात्याकडे पोस्टाने पाठवून महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून सोईस्कर अशा वेळ असलेली साई एक्सप्रेस येत्या ११ मार्च पासून सुरु होणार असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रवासी जनतेची मोठी सुविधा निर्माण होणार आहे. संजय जोशी यांनी रेल्वे खात्याचे आभार मानले आहेत.

साई एक्सप्रेस सुरु व्हावी यासाठी रणजीत श्रीगोड यांनी नुकत्याच झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सभेत या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी १९ बोगी असलेली स्वतंत्र दर्जा असलेली साई एक्सप्रेस दौंड रेल्वे स्टेशनवरुन न जाता कॉर्ड लाईन मार्गे थेट पुण्याला जाण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे जाहीर केले होते. मध्य रेल्वेचे प्रबंधक सुबोध जैन यांची रणजीत श्रीगोड यांचे समवेत एका शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेऊन या मागणी बाबत लक्ष वेधले होते. आता या सर्व मागण्या रेल्वे मंत्रालयातून पूर्ण होत असल्याने रेल्वे मंत्री  पियुष गोयल व रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनितकुमार शर्मा यांनी सहकार्य केल्याने मुंबईला जाण्यासाठी व शिर्डी येथे येणा-या साईभक्तांची गरज लक्षात घेऊन साईनगर-पुणे-दादर साई एक्सप्रेसचे नियोजन झाल्याचे श्रीगोड यांनी सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोंगरगण येथील ब्रिटिश कालीन रस्ता प्रांत अधिकारी यांच्या प्रयत्नाने खुला अनेक शेतकर्‍यांची अडचण दूर

वेब टीम नगर : नगर लुक्यातील डोंगरगण येथील गट नंबर 165 व 167 मधील शेत रस्ता व गाव नकाशा वरील रस्त्याच्या सामायिक वादात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत मोजणी करून रस्त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुला करण्यात आला.

सदर रस्त्यावर काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे अनेक वर्षापासून हा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता.  शेतामध्ये रस्ता काढण्यासाठी मोजणी केल्यानंतर जेसीबीच्या साह्याने सदरील रस्ता खुला करण्यात आला. रस्ता खुला करत असताना संबंधित शेतकर्‍यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र सदर रस्ता खुला करत असताना त्याला विरोध दर्शवीत काही महिला व पुरुष जेसीबीच्या आडवे आल्याने काही वेळ सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जेसीबीला  आडवे आलेल्या नागरिकांना बाजूला  करून रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरु ठेवली. सदर रस्त्यावरून दोनशे शेतकर्‍यांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाला आहे. रस्ता खुला करण्यासाठी जेऊर मंडलाधिकारी, मौजे डोंगरगण तलाठी तसेच पोलिस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सर्व शेतकर्‍यांना रस्ता खुला करुन दिल्याबद्दल महसूल प्रशासनाचे स्थानिक शेतकर्‍यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संप

२००३ कोटप्पा कायद्यातील बदलास विरोध दर्शवून विडी कामगारांची निदर्शने कायद्यात बदल न करण्याची मागणी

वेब टीम नगर :  केंद्र सरकारने २००३ च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.२५ फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन संप करण्यात आला. शहरातील विडी कामगारांनी काम बंद ठेऊन नगर-पुणे महामार्ग, रेल्वे स्टेशन जवळील विडी कारखान्या समोर निदर्शने केली. या आंदोलनात आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारम, उपाध्यक्ष विनायक मच्चा, विडी कंपनीचे बाबू शांतय्या स्वामी, लक्ष्मी कोटा, कमलाबाई दोंता, सरोजनी दिकोंडा, शोभा बिमन, सरोजनी दिकोंडा, शारदा बोगा, विनायक मच्चा, कविता मच्चा, शमीम शेख, सगुना श्रीमल, लिला भारताल, ईश्‍वरी सुंकी, सतीश पवार, शोभा पासकंठी आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

 सिगारेट व विडी तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कोटप्पा च्या तरतूदीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल न करता विडी कामगार, कारखानदार, शेतकरी, शेतमजूर, दुकानदार यांचा रोजगार वाचविण्याच्या मागणी सदर संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारच्या जाचक कायद्यास हरकत नोंदवून याबाबतचे निवेदन केंद्र सरकाला पाठविण्यात आले होते. मात्र केंद्र सरकार विडी कारखानदार व विडी कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विचार करीत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या एक दिवसीय संप करण्यात आला.

देशामध्ये विडी उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात असून, देशात दोन कोटी पेक्षा जास्त शेतकरी तंबाखू पिकवतात, ४० लाख शेतमजूर तेंदूपत्ता गोळा करतात, ७२ लाख किरकोळ व्यापारी व दुकानदार या क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. तर ८५  लाख विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी उत्पादनावर चालतो. यामध्ये ९० टक्के महिला घरी विडी वळण्याचे काम करतात. यापूर्वीही सरकारने २८ टक्के जीएसटी लावून हा धंदा मोडकळीस आणला आहे. पाने व तंबाखू उत्पादित करताना मोठ्या संख्येने शेतमजूर या कामाशी जोडले गेलेले आहेत. लाखो विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी व्यवसायावर चालतो. केंद्र सरकारने सिगारेट व विडी तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कोटप्पा च्या तरतूदीमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून, हरकती मागवल्या आहेत. या नवीन काद्यान्वये विडी कारखानदारांना विडी बंडलवर कोणत्याही प्रकारची ब्रॅण्डची जाहिरात करता येणार नसल्याने, ती विडी कोणत्या कंपनीची ते ग्राहकांना समजणार नाही. दुकानदार विडीचे फलक लाऊ शकणार नाही, विडी ग्राहकाची अट १८ वर्षावरुन २१ वर्ष करण्यात येत आहे, विडी पॅकिंगमध्ये विकणे, विक्रेत्यांना परवाना असणे, सार्वजनिक ठिकाणी विडी ओढल्यास दोनशे ते दोन हजार रुपये दंड, शैक्षणिक संस्थे जवळ विडी विक्री केल्यास सात वर्षा पर्यंतच्या शिक्षेची तरतूद अशा जाचक अटींमुळे मोडकळीस आलेला विडी उद्योगधंदा बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

विडी उद्योगधंद्यावर अवलंबून असलेले लाखो शेतमजूर, शेतकरी, कामगार व दुकानदारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. ग्राहक कमी झाले की, हा धंदा कोलमडून पडणार आहे. एक तर सरकार नवीन रोजगार निर्माण करीत नाही, आहे तो रोजगार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. यासाठी केंद्र सरकारने रोजगाराचा पर्याय उपलब्ध करुन कठोर कायदे होण्याची गरज आहे. आरोग्यास विडी हानिकारक आहे. तर दारु देखील तेवढीच हानिकारक असल्याने त्याच्यावर देखील निर्बंध टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांना नाट्य गीतांची पर्वणी 

 लक्ष्मण डहाळे : निलेश-स्वरगंध कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

   वेब टीम नगर : २०२० वर्ष ‘कोरोना’मुळे कलाकारांसह रसिकांना सुद्धा चुकचुकल्या सारखे गेले. वर्षभर कार्यक्रमच नसल्याने नवीन ताल,सुर, राग शिकण्याची, ऐकण्याची संधी मिळाली नसल्याने आम्ही बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गायकांना संधी मिळाल्याने रसिकांना देखील निलेश-स्वरगंध या सांगीतिक नाट्य गीतांची पर्वणी मिळाली, असे   प्रतिपादन बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण डहाळे यांनी केले.

     सावेडी मधील रावसाहेब पटवर्धन स्मारकात बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्यावतीने न्यू आर्टस् कॉलेजचे संगीत विभागप्रमुख निलेश खळीकर यांचा ‘निलेश-स्वरगंध’  कार्यक्रम पार  पडला. यावेळी  डहाळे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गांधी, सचिव सुमेधा देशपांडे, अविनाश देऊळगांवकर, अविनाश बोपर्डीकर, हेमंत काळे, राम शिंदे, अविनाश कुलकर्णी, धनश्री खरवंडीकर आदिं उपस्थित होते.

     प्रारंभी श्रीगणेश, शारदा देवींचे पूजन करण्यात आले. दिपप्रज्वलनानंतर नाट्य गीतांची सुरुवात हमीरा रागातील ‘चमेली फुली चंपा’ या बंदिशीने केली. विलंबित झुमरा तालातील हा बडा ख्याल व ‘चंचल चपल मदमाती’ या दृतएकतालातील चिजेने सभागृहातील वातावरण भारावले. त्यानंतर बसंत रागातील ‘फुगवा ब्रीज देखन को चलो री’ ही बंदिश बहारदार झाली एक वेगळा प्रयोग म्हणून बागेश्री रागामध्ये इतर काही रागांचे अंशत: एकत्रिकरण करुन भिवालामध्ये ऋत बसंत सखी अपने उमंग, फेर आये मोरा अबुना पे, एरी पिहरवा घर आवो या तीन बंदिशी सादर केल्या, त्यास श्रोत्यांनी उत्तम दाद दिली.

     यानंतर ‘रंधात पेरली मी आषाढ दर्द गाणी व गुंतता हृदय हे’ हे दोन नाट्यपदे सादर केली. राग मांडणीतील कल्पकता, तानेतील स्पष्टपणा व स्वरांचे सच्चेपण ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये जाणवली शेवटी भैरवी रागातील ‘भोला मन जानी’ या निर्गुणी भजनाने या अविस्मरणीय मैफिलिची सांगता झाली. या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.खळीकर यांना मकरंद खरवंडीकर (हार्मोनियम) कल्पेश अदवंत (तबला) तुषार भंडारे व आकाश गाडेकर (तानपुरा)ची साथ दिली.

     सूत्रसंचालन प्रकाश कुलकर्णी यांनी केले तर अनघा पछाडे यांनी कलाकारांचा परिचय करुन दिला. वर्षा पंडित   यांनी आभार मानले. या कार्यक्रमात महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटनेच्या नगर शाखा अध्यक्षपदी परशुराम मुळे यांची निवड झाल्याबद्दल व पवन नाईक, लक्ष्मण डहाळे यांची सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अक्षय बहिरवाडे यांची राज्य वीरशैव लिंगायत गवळी  समाज युवक प्रतिनिधीपदी नियुक्ती

           वेब टीम  नगर : महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच कार्याध्यक्ष भेटू नामागवळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. बैठकीस सखाराम गेण्णाप्पा (धुळे), विजय नाईक (पुणे), नामदेव लंगोटे (नगर), बाळासाहेब हिरणवाळे (नाशिक) आदिंसह राज्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी गवळी समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नुतन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये राज्य कार्यकारिणीवर युवक प्रतिनिधी म्हणून अहमदनगरचे अक्षय सिदाप्पा बहिरवाडे यांची निवड करण्यात आली.

            अक्षय बहिरवाडे यांनी संघटनेत काम करतांना सामाजिक, सांस्कृतिक, पारंपारिक कामाच्या माध्यमातून समाजाचे संघटन केले. विविध उपक्रमातील त्यांच्या सहभागामुळे त्यांची राज्य कार्यकारीपदी निवड करण्यात आली आहे.

            अक्षय बहिरवाडे यांच्या  निवडीबद्दल आ.संग्राम जगताप, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा,  विशाल भागानगरे, बंडू लंगोटे, रवी चवंडके आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगारमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींचा सत्कार

डॉ.राजेंद्र फडके यांच्या उपस्थितीत बूथ रचना बैठक 

वेब टीम नगर : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार भाजपाची बूथ रचना बैठक झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, भिंगर मंडल अध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हाउपाध्यक्ष सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.

          यावेळी डॉ.राजेंद्र फडके म्हणाले, बूथ रचना हा भाजपचा पाया आहे. याच पायावर संपूर्ण देशात भाजपाचे कामकाज होत आहे. त्यामुळे प्रत्तेक शहरात, मंडला मध्ये बूथ रचना उत्कृष्ठपणे व्हावी यासाठी सर्व पादाधीकारींनी लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी शेकडो लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जनते पर्यत योजना पोचवण्याचे काम बूथ रचनेद्वारे व्हावे यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भिंगार मध्ये भाजपाच्या माध्यमातून योजनांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

          यावेळी  शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांनी प्रसाताविकात कामाची माहिती देतांना सांगितले, भिंगारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी बजावणी साठी काम केले जात आहे. आत्तापर्यंत हजारो सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. शासकीय कर्मचारी व बँकेच्या कर्मचारी जनतेची अडवणूक करत असहकार्य कारभारा विरोधात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने जनतेला न्याय मिळवून दिला आहे.

          यावेळी शहर कार्यकारीणी सदस्य लक्ष्मीकांत तिवारी, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, दिपक फळे, छत्तुशेठ मेवानी, अतुल मुनोत, संजय स्वामी, श्रीमती रॉक, कृष्णा पारेकर, राजेश फुलारे, संजय सदलापूरकर, कार्तिक जाधव, किरण सपकाळ, नाफीसा नगरवाला व कार्यकर्ते उपस्थित होते. दिपक फळे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्‍न सोडवू

आ.सुनिल भुसारा : समता परिषदेच्यावतीने आ.सुनिल भुसारा यांचे नगरमध्ये स्वागत

   वेब टीम नगर : महात्मा फुले समता परिषदेचे राज्यभर चांगले काम सुरु असून, समाज जोडण्याचे काम यानिमित्त होत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या माध्यमातून सुरु आहे. शासनाच्यावतीने समाजासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नगरमध्ये समता परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. नगरमधील कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,  असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांनी केले.

     अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा हे नगरमध्ये आले असता, त्यांचे  समता परिरिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

     याप्रसंगी दत्ता जाधव यांनी समता परिषदेच्यावतीने नगरमध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा आ.सुनिल भुसारा यांना सांगितला. नगरमध्ये समता परिषदेच्या चांगल्या कामांमुळे अनेक युवक परिषदेत सहभागी होऊन योगदान देत आहेत. वरिष्ठ पातळीवरुनही सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments