नगर बुलेटीन - 25-02-2021

नगर बुलेटीन - 25-02-2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांच्या तर्फे ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन

वेब टीम नगर : कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांच्या तर्फे ग्रामीण जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आले. या अंतर्गत पहिले शिबीर इसळक–निंबळक येथील जी.के.एन. प्रकल्पात युवा प्रेरणा शिबिरात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी आयोजित करण्यात आले. स्नेहालयचे संचालक अनिल गावडे या उपक्रमाचे समन्वयक आहेत.  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. महेश  कांबळे, डॉ. घनश्याम वाळके, डॉ. सुरज पवार, डॉ. वांढेकर आदी वैद्यकीय व्यावसायिक शिबिरार्थीना आरोग्य सेवा देत आहेत. मार्च अखेर पर्यंत जिल्ह्यातील ३० गावांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचा स्नेहालय संस्था व कॅरियर मायडीया यांचा मानस असल्याचे कंपनीचे सी.एम.आय. एच. आर. विद्यानंद यादव यांनी सांगितले.

स्नेहालय संचालित केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. संस्थेच्या सुसज्ज अश्या ‘फिरत्या दवाखान्यात’ शारीरिक तपासणी, योग्य औषधोपचार, रक्त-लघवी तपासणी, इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जातात. आतापर्यंत ८ शिबिरांचे यशस्वी आयोजन कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांनी इसळक–निंबळक, जातेगाव, वाघुंडे बुद्रुक, मुंगशी, वाघुंडे खुर्द, बाबुर्डी, हंगा आणि पळवे बुद्रुक येथे केले असल्याची माहिती कंपनीचे एचआरविभागाचे जेनेरल मॅनेजर पंकज यादव यांनी दिली. सुमारे १००० च्या वर रुग्णांना या शिबिरांचा लाभ झाला असल्याचे कॅरियर मायडीयाचे एचआरचे सिनियर मॅनेजर गौतम साबळे  यांनी सांगितले. मार्च अखेर पर्यंत ३० गावातील ३००० रुग्णांपर्यंत ही मोफत आरोग्य सेवा पोहीचाविण्याचा स्नेहालय संस्था व कॅरियर मायडीया कंपनीचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव राजीव गुजर आणि अध्यक्ष संजय गुगळे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रेल्वे क्रांती आंदोलनातंर्गत नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवेचा नगर-आष्टी मार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रेल्वे मंत्री गोयल यांना निवेदन

वेब टीम नगर : अनेक वर्षापासून नगर-मुंबई-परळी रेल्वेचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. या रेल्वेसाठी साकारण्यात आलेल्या नगर-आष्टी दरम्यानचा रेल्वेमार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा आणि नगर शहर मुंबईशी जोडला जावून सदर भागाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी नगर-मुंबई-परळी रेल्वेसेवा सरकारने मंजूर केली. दरवर्षी तोकडी रक्कम मिळत असल्याने या रेल्वेचे काम अर्धवट राहिलेले आहे. नगर ते नारायणडोह पर्यंत रेल्वेमार्ग चांगल्या स्थितीत झाला असून, त्याची चाचणी देखील घेण्यात आली आहे. आष्टी पर्यंतचा मार्ग पुर्ण करुन नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवा सुरु होई पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात नगर-आष्टी ही रेल्वे सेवा सकाळ-संध्याकाळ या दोन वेळेत सुरु करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका व्यापारी दृष्ट्या नगर शहराशी जोडला गेलेला आहे. नगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास तेथील युवक नगर शहराशी जोडले जाऊन त्यांचे देखील प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तर प्रलंबीत असलेल्या नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवेला गती देखील मिळणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अर्शद शेख, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, सुखदेव चौरे, किशोर झरेकर, बळीराव पाटोळे, आर.आर. पिल्ले, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, शहादेव चव्हाण, पोपट भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना व महागाईच्या काळात  गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे बोरुडे यांचे कार्य कौतुकास्पद 

दिपक खेडकर : बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा फुले ब्रिगेडच्या वतीने सत्कार

वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल फुले ब्रिगेडच्या वतीने त्यांचा माळीवाडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भूतारे, विष्णूपंत म्हस्के, किरण जावळे, नितीन डागवाले, महेश सुडके, मोहित सत्रे, विक्रम बोरुडे, गणेश शेलार, प्रसाद बनकर, गणेश जाधव, विकास खेडकर, प्रविण वारे, विश्‍वास शिंदे, श्रीकांत आंबेकर, आशिष भगत आदी उपस्थित होते.

दिपक खेडकर म्हणाले की, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम केले.  कोरोना व महागाईच्या संकटात माणुसकीच्या भावनेने अनेक गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे अविरत सुरु असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी देखील ते कटिबध्द राहणार आहेत. कार्य करण्याची तळमळ असल्यास तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवितो. याप्रमाणे बोरुडे यांचे समाजात सर्वसमावेशक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे यांनी इतरांचे प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेऊन समाजात योगदान देत आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत चासला निबंध व पोस्टर स्पर्धेतून एड्सची जनजागृती

स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेच्या माध्यमातून एचआयव्ही बाबतचे गैरसमज दूर करुन याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, संतोष एडके आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीवर आकर्षक पोस्टर रंगवले. तर निबंधातून हा आजार हद्दपार करण्यासाठी विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना हा आजार एकत्र वावरल्याने, बोलण्यातून, हस्तांदोलनातून, एकत्र सहवासातून होत नसून, याचा संसर्ग असुरक्षित संबंधातून, बाधित मातेकडून बालकाला, दूषित रक्त संक्रमणातून होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.रंगनाथ सुंबे यांनी केले.

मुख्याध्यापक चंद्रकांत भवर म्हणाले की, एड्स हा कोरोनापेक्षा महाभयंकर आजार आहे. कोरोनातून बरे होण्याचे  प्रमाण अधिक असून, एड्समुळे अनेक मृत्यूमुखी पडले आहेत. एड्सवर शंभर टक्के उपचार नसून, हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. यासाठी समाजात जागृती होणे अपेक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पै. नाना डोंगरे यांनी एड्स रोग टाळण्यासाठी जनजागृती व उपयायोजना हाच एकमेव पर्याय आहे. याची शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी करुन औषधोपचारही देण्यात येते. विवाहपूर्व युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिंटीग शिवाय कागदालाही किंमत नाही 

 विठ्ठलप्रसाद तिवारी : मुद्रण दिनानिमित्त नंदेश शिंदे यांचा सन्मान

    वेब टीम  नगर :  आज ऑनलाईनचा जमाना असला व पेपरलेस काम जरी सुरु असले तरी आज प्रिंटीग शिवाय कागदालाही किंमत नाही, असेच म्हणावे लागेल. छापाई क्षेत्रातील बदल आत्मसात करुन प्रत्येकाने आपला व्यवसाय केला पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. सप्तरंग प्रिंटर्सने गेल्या २२ वर्षांपासून प्रिटिंग क्षेत्रात चांगल्या सेवेने नाव कमविले आहे. सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा निमित्त गौरव करण्यात आला असल्याचे प्रतिपादन शिक्षक संघटनेचे सचिव विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी केले.

     जागतिक मुद्रण दिनानिमित्ताने नगरमधील प्रसिद्ध सप्तरंग प्रिंटर्सचे संचालक नंदेश शिंदे यांचा शिक्षक संघटनेचे सचिव विठ्ठलप्रसाद तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिनुभाऊ क्रिडा मंडळाचे सदस्य विष्णू देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी मुद्रण कलेचे संस्थापक जोहान्स बुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

     याप्रसंगी नंदेश शिंदे म्हणाले, जोहान्स गुटेनबर्ग यांनी मुद्रण कला विकसित केली ही त्याकाळी एक क्रांतीच होती. त्यानंतर प्रिंटींग क्षेत्रात काळानुरुप बदल होत गेले. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास प्रिटींग क्षेत्रातीही चांगल्या संधी आहेत.  कोरोनामुळे सध्या प्रिंटींगक्षेत्र अडचणीत आला असला तरी भविष्यात ही परिस्थिती सुधरेल. सत्कारामुळे काम करण्यास प्रेरणा व पाठबळ मिळणार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एनसीसीच्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास सुरवात

   वेब टीम नगर : कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत १७ महारष्ट्र बटालियन एनसीसीच्या पाच दिवशीय एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबीर अहमदनगर कॉलेज अहमदनगरच्या मैदानावर रोजी सुरु झाले. या एनसीसी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल जीवन झेंडे व प्रशासकीय अधिकारी कर्नल विनय बाली यांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी एसएम लिकेंद्र सिंघ, सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, भरत डगळे, डॉ.एम एस जाधव, भरत होळकर सीटीओ शांता गडगे, शैलेजा, पीआय स्टाफ  व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

     या प्रसंगी कर्नल जीवन झेंडे यांनी शिबिरार्थी कॅडेट्सना संबोधित केले. शिबिराची शिस्त, करोना पार्श्‍वभूमीवर घ्यावयाची खबरदारी, परिसर स्वच्छता व पर्यावरण, समाजसेवा व सामिजिक जागृती, एनसीसी छात्रांची जबाबदारी, एनसीसी प्रमाणपत्रांचे महत्व, परीक्षाची तयारी अशा अने विषयांवर शिबिरार्थीना मार्गदर्शन केले. 

     हे प्रशिक्षण एनसीसी ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र परिक्षांना पात्र होण्यासाठी द्वितीय व तृतीय वर्षांच्या सर्व कॅडेट्सनां करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर कॉलेज, न्यू आर्ट्स कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय अहमदनगर व पारनेर, बाबूजी आव्हाड कॉलेज पाथर्डी, टाकळीडोकेश्‍वर महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचे मुली व मुले कॅडेट्स या शिबिरात सहभागी आहेत.

     या प्रशिक्षण शिबिरादरम्यान  ड्रील, शस्त्र प्रशिक्षण, फिल्ड क्राफ्ट बॅटल क्राफ्ट, नकाशा वाचन, एनसीसी संघटन,कोरोना, पर्यावरण जागृती, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता, सामाजिक जागृती व सामाजिक विकास , एनसीसी व स्त्रीसबलीकरण इ. विषयीचे ज्ञान छात्र त्रसैनिकांना देण्यात येणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवंतांचे नामस्मरण हे जीवनाचे उद्दिष्ट ठेवले कि प्रश्‍न सुटतात

 हभप माऊली गायकवाड : लोकवर्गणीतून संत सेना महाराज रथाचे लोकार्पण

    वेब टीम  नगर : जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो, तेव्हा तो अगदी असमर्थ असहाय्य असतो, पहिला गुरु आई, दुसरा गुरु वडिल असतात तिसरे गुरु आपण भगवंताच्या रुपात पाहतो. भगवंतांचे नामस्मरण हे जीवनाचे उद्दिष्ट ठेवले कि प्रापंचिक प्रश्‍नांबरोबरच परमार्थातील समस्या आपोआप सुटतात, असे प्रतिपादन हभप माऊली महाराज गायकवाड यांनी केले.

     दरवर्षी वडाळा ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्यासाठी वारकरी खांद्यावर पालखी नेत. आता लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या संत सेना महाराज रथाचे लोकार्पण हभप माऊली गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास अरुण महाराज गायकवाड, राम महाराज गायकवाड, शौकत इनामदार, नामदेव गवळी, विलास कोरडे, अशोक भागवत, माधव कदम, भागचंद बिडवे, बाबासाहेब शिंदे, तात्यासाहेब शिंदे, दिलीप गवळी, आदिंसह भक्तगण उपस्थित होते.

     हभप गायकवाड पुढे म्हणाले, प्रपंच हा मोहात अडकवतो तर परमार्थ माया, मोह, द्वेष यामधून मुक्त करत असतो. वडाळा-पंढरपूर संत सेना महाराज यांची दिंडी जात असते. यावर्षी रथ तयार करण्यासाठी भाविकांनी योगदान दिल्याने आज हा रथ लोकार्पण होत आहे, ही सेवा पांडूरंग चरणी लागेल, असे सांगितले.

     प्रास्तविकात शाम औटी यांनी दिंडीबाबत सविस्तर माहिती दिली. पालखी नेण्यासाठी रथ तयार करण्याचा मानस होता, तो आज पूर्ण झाला. यंदा तरी पंढरपुरला दिंडी जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

20 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मोफत इंटरनेट प्रशिक्षण

वेब टीम नगर : गेल्या 20 वर्षापासून संगणक प्रशिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्या 20 वा वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून भाजी विक्रेत्या, छोट्या दुकानदार व गरजू महिला व मुलींना मोफत इंटरनेटचे प्रशिक्षण कोर्स देण्यात आला. प्रोफेसर कॉलनी चौकातील विझार्ड कंप्युटर्स संस्थेचे संचालक रवींद्र राउत यांनी राबवलेल्या या उपक्रमात प्रोफेसर कॉलनी चौंकातील महिला सहभागी झाल्या होत्या. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व महिलांना   या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी उपक्रमाची माहिती देतांना रवींद्र राउत म्हणाले, आजच्या आधुनिक काळात सर्वसामान्यांपासून सर्वच जण मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करत आहेत. त्यामुळे सर्वांनाच इंटरनेटचा चांगला वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण घेवून आपल्या ज्ञानात भर घालणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातील व छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना अत्याधुनिक इंटरनेट प्रशिक्षण कोर्सद्वारे मोफत प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमास महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

अनघा राऊत म्हणाल्या, विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांत शासकीय अधिकारी, कर्मचारी, छोटेमोठे उद्योग करू पहाणारे व्यवसायिक, गृहिणी, विद्यार्थी असे हजारो प्रशिक्षणार्थीं यशस्वीपणे संगणक प्रशिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात ते यशस्वीपणे काम करीत आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या संगणक प्रशिक्षणाच्या विविध योजना राबविल्या जात असून ज्या व्दारे अनेक गरजु विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झाला आहे.

यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी शैलजा ससाणे, कांता चंगेडीया, लिना नेटके, सारीका गाडे, विद्या एक्कलदेवी आदी उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रमाई आवास योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहविण्यासाठी प्रयत्न करणार : बाळासाहेब बोराटे

    वेब टीम  नगर : शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना संबंधितापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आज अनेकांना या योजनांची माहिती होत नाही. तेव्हा मनपाने याबाबत अधिक जागृती करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांनीही इतरांना याबाबत माहिती द्यावी.  रमाई योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान टप्याटप्प्याने मिळत असते. या योजनेबाबत कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावा, आपण याबाबत सहकार्य करु. असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

     राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत माळीवाडा बौद्ध वस्ती येथील लाभार्थी विकास भिंगारदिवे यांना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते पहिला हप्ता 82,500 रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी  विशाल वालकर, हर्षल म्हस्के, तारिक कुरेशी, बाबा पटवेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी लाभार्थी विकास भिंगारदिवे म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. शासकीय योजनांसाठी थोडे कष्ट होत असले तरी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या सहकार्याने आज पहिला हप्त्याचा धनादेश मिळाला आहे. आता चांगले घर बांधकाम निर्माण होण्यास मोठी मदत यामुळे झाली असल्याचे सांगून आभार मानले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगाला दिशा देणार्‍या श्रीराम मंदिर कार्यात सहभागी झाल्याचा आनंद 

 सुमित वर्मा : मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने श्रीराम मंदिरास देणगी

   वेब टीम नगर : आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावे, ही भाविकांची भावना होती. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु होता. आता सर्व संकटे दूर होऊन श्रीराम मंदिर निर्माण होत आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या निर्माण कार्यात प्रत्येकाचा सहभाग असावा, या उद्देशाने सुरु केलेल्या उपक्रमात सर्वच सहभागी होत आहे. जगाला दिशा देणारे या मंदिर निर्माणात सहभागी झाल्याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

     मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरास देणगी देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, सागर सुरपुरे, भैय्या भांडेकर, अनिकेत जाधव, साहिल गांधी, महादेव दहिफळे, ओंकार काळे, आदित्य अनेचा, अनमोल कांकरिया, अतुल जगताप, गौरव कांकरिया आदि.

     याप्रसंगी सागर सुरपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांना या निर्माण कार्यात देणगीरुपाने सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून, आभार मानले. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आयडियल स्टडी ॲप मुळे सुलभ अभ्यासाचा पर्याय खुला

अँड अनंत फडणीस  : भाईसथ्था रात्र प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी  ॲप चे मोफत वितरण                                                   

वेब टीम नगर : भाईसथ्था रात्र प्रशालेतील विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत मेहनतीने व परिश्रमाने शिक्षण घेत आहेत.कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला आहे. आयडियल स्टडी  ॲप मुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्त सराव करून प्रश्नपत्रिका सोडवता येतील.हिंद सेवा मंडळाने विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी  ॲप चे मोफत वितरण करून सुलभ अभ्यासासाठी पर्याय खुला केला आहे.शाळेचे अध्यक्ष ,प्राचार्य व हिंद सेवा मंडळाच्या सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त होत आहेत.याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करावी.असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे अध्यक्ष  ॲड.  अनंत फडणीस यांनी केले.

 हिंदसेवा मंडळाच्या भाईसथ्था नाईट हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी  ॲप चे मोफत वितरण करण्यात आले.याप्रसंगी पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे अध्यक्ष  ॲड. अनंत फडणीस बोलत होते.यावेळी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी,शालेय समिती सदस्य विलास बडवे,प्राचार्य सुनील सुसरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी दुकानात काम करताना मिळालेल्या फावल्या वेळेत आयडियल स्टडी ॲप द्वारे सर्व विषयांचा अभ्यास करावा.हिंद सेवा मंडळ व रोटरी क्लबच्या सहकार्याने हा  ॲप मोफत प्राप्त झाला आहे.या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी यश मिळवावे.हा  ॲप दहावीच्या विद्यर्थ्यांसाठी अत्यन्त उपयुक्त असा आहे.                             

प्रास्तविकात डॉ.पारस कोठारी म्हणाले कि,दहावीच्या विद्यार्थ्यांना नेहमीच हिंद सेवा मंडळ व मासूम संस्थेमार्फत  शैक्षणिक सुविधा देऊन प्रोत्साहन देण्यात येते.आयडियल स्टडी  ॲप द्वारे सर्व विषयांची पाठय पुस्तके,प्रत्येक पाठाचे महत्वाचे मुद्दे,सूत्रे ,सनावळी व प्रश्नोत्तरे,सर्वासाठी कृतिपत्रिका,भाषा विषयांसाठी खास मूळ व्याकरण व उपयोजित लेखनासहित मार्गदर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याने मोबाईल वर सहज विना पुस्तक अभ्यास करता येईल. सूत्र संचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार अमोल कदम यांनी मानले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments