अपहृत चार वर्षीय नयनची सुटका

अपहृत चार वर्षीय नयनची सुटका 

नयनची आजीचा निघाली अपहरण कटाची सूत्रधार 

वेब टीम  अमरावती : शारदानगर येथून बुधवारी अपहरण करण्यात आलेल्या नयन मुकेश लुणीया या चार वर्षीय बालकाची अहमदनगर येथून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर त्यास शनिवारी अमरावतीत आणून त्याच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन केले. अपहरणाची मुख्य सूत्रधार नयनची आजी असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले.

याप्रकरणात राजापेठ पोलिसांच्या पथकाने अहमदनगर पोलिसांच्या मदतीने बंबईया  उर्फ अल्मश ताहीर शेख (१८, रा. कोठला), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंद नगर), आसीफ युसूफ शेख (२४, कोठला), फिरोज रशीद शेख (२५, कोठला), हिना (वय २५) यांना अटक केली. शनिवारी याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या नयनच्या आजी मोनिका लुणीया(वय ४७ ) यांना पोलिसांनी अटक केली.

नयनच्या आजीनेच अहमदनगर येथील २५ वर्षीय मैत्रिणीच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अहमदनगर येथून अटक करण्यात आलेली व अपहरण करणारी युवती ही नयनच्या घरी नेहमी ये-जा करीत होती. ती १५ ते २० दिवस नयन याच्या घरी राहत होती. त्यामुळे तिची नयनसोबत चांगली ओळख झाली होती. नयनच्या आजीने खंडणीसाठी हा डाव रचला होता. गत दोन महिन्यांपासून यासाठी नियोजन आखण्यात आले होते. कोठला झोपडपट्टीत राहणारी आरोपी युवती व अन्य सहा जणांना यात सहभागी करण्यात आले होते. नयनच्या आजीची चौकशी करण्यात येत असून त्याद्वारे आणखी सत्य बाहेर येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

अपहरण करणारी युवती व अन्य पाच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांवर बालकांच्या अपहरणांचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयाने २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नयनच्या सुटकेसाठी व आरोपींच्या अटकेसाठी कामगिरी बजावणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचेसह अहमदनगर येथील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्येकी ५० हजार रूपयाचा रिवार्ड पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी जाहीर केला.

Post a Comment

0 Comments