नगरटुडे बुलेटीन 13-02-2021

नगरटुडे  बुलेटीन 13-02-2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षक भारतीच्या वतीने अमोल दुधाडे यांचा सत्कार

    वेब टीम  नगर : लोणी हवेली ता.पारनेर येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी अमोल दुधाडे  यांची निवड झाल्याने त्यांचा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, श्रीकांत गाडगे, आशा गाडगे- लंके आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना सुनिल गाडगे म्हणाले कि, अमोल दुधाडे बी.इ.कॉम्प्युटर आहेत. त्यांनी राजकारणात नुकताच प्रवेश केला आहे. तरुणांना राजकारणात संधी दिल्याने ते विकास करतात हे सिद्ध झाले आहे. आज अमोल दुधाडे  यांच्या सारख्या तरुणांना ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंचपदी निवड करुन खर्‍या अर्थाने गावाच्या विकासाला चालना मिळाली आहे. तरुणांना सामाजिक कार्यांची आवड आणि त्यांची तळमळ यामुळे त्यांचा गावाच्या विकास कामांवर जास्त जोर असतो, ते प्रथम गावाचा विकास करुन गावाच्या तरुणांना चांगली संधी निर्माण करुन देतील.

     यावेळी अमोल दुधाडे बोलताना म्हणाले कि, लोणी हवेली सारख्या गावाला जाण्यासाठी रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, पथदिवे असे विविध कामे तातडीने हाती घ्यावी लागतील. गावकर्‍यांच्या मदतीने, सर्वांना बरोबरच घेऊन गावाचा विकास करायाचा आहे, या एकाच हेतुने राजकारणात प्रवेश केला आहे. गावातल्या प्रत्येक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न असेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन

वेब टीम नगर : अहमदनगर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, विशाल शिंदे, नितीन लिगडे, गजेंद्र भांडवलकर, सुमित कुलकर्णी, विक्रांत दिघे, विशाल शिंदे, निलेश घुले, लाला खान, मुजाहिद शेख, सैफअली शेख, शितल राऊत, शितल गाडे, उषाताई सोळंकी, सुनिता पाचारणे, लिलाबाई डाडर आदी उपस्थित होते.    

शहरातील उपनगरातील एकवीरा चौक तसेच बुरुडगाव परिसरातील रस्त्याने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली. अशा प्रकारचे अनेक घटना घडल्या असून, शहरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरत असून, महिला एकट्या रस्त्याने जाण्यास घाबरत आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याची नागरिकांची भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शहरात वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने हा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलीसांच्या विविध तुकड्या नेमाव्या, पोलीसांची गस्त वाढवावी आदी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सुरु होण्यासाठी रेल्वे रोकोची हाक

 अहमदनगर रेल्वे स्थानक येथे झालेली बैठक फिस्कटली : बैठकीतच आंदोलनाची घोषणा

वेब टीम नगर : जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्‍न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील असलेले स्वयंसेवी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक शुक्रवारी (दि.१२ फेब्रुवारी) अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासंदर्भातच निर्णय वरिष्ठ पातळीवरचा असल्याने आंदोलकांनी बैठकीतच दि.१३ मार्च रोजी रेल्वे रोकोचा इशारा दिला. अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने सदरचे आंदोलन घोषित करण्यात आले असून, यामध्ये पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स सोशल फाऊंडेशन संघटना सहभागी होणार आहे.

 नगर-पुणे शहरांना जुळ्या शहरांचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी व नगर शहरातील औद्योगिक, व्यापार, रोजगार व विकासाला चालना देण्यासाठी मागील दहा वर्षापासून सत्याग्रही व स्वयंसेवी संघटनेची पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी सातत्याने सुरु आहे. रेल्वे विभागाने दौंड येथे 30 कोटी रुपये खर्च करुन कॉड लाईनचे काम पुर्ण केले. कॉड लाईनचे काम पुर्ण झाल्याने रेल्वे दौंड स्टेशनवर इंजन बदलण्यासाठी न थांबता दोन तासात पुण्याला पोहोचणार आहे. ही रेल्वेसेवा नगरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सदर रेल्वेसेवा सुरु न केल्यास रेल्वे रोको करण्याचा इशार्‍याचे निवेदन रेल्वे अधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठविण्यात आले. सदर प्रश्‍न रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करुन मार्गी लावण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे शिष्टमंडळ खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेणार आहे.

 या बैठकीत रेल्वे स्टेशनचे प्रभारी स्टेशन मास्तर श्रीकांत परिडा, वाणिज्य निरीक्षक एल.जी. महाजन, रामेश्‍वर मीना, स्वयंसेवी संघटनेचे हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी आदी उपस्थित होते. शिवजयंती दिनी शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रेल्वे स्थानक समोर सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करुन, रेल्वे रोकोसाठी सत्याग्रहांची नोंद केली जाणार आहे. तसेच यावेळी आजीव आंदोलकांचा सन्मान देखील होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवसेवा करणार्‍या सामाजिक संस्थांमुळे समाज सावरला आहे 

राजेंद्र कपोते : मानवसेवा प्रकल्पास पोलीस मित्र संघटनेचा कोरोना योध्दा सन्मान प्रदान

वेब टीम नगर : बेवारस मनोरुग्णांसाठी आधार ठरलेल्या व त्यांच्यावर उपचार करुन पुनर्वसनासाठी कटिबध्द असलेल्या तसेच कोरोनाच्या टाळेबंदीतही आपली सेवा अविरत सुरु ठेऊन माणुसकीच्या भावनेने योगदान देणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पास अहमदनगर पोलीस व महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात झालेल्या या सन्मान सोहळ्यात संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ व वनिता गुंजाळ यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसनाचे कार्य सुरु आहे. या मानवसेवा प्रकल्पात कार्य करणारे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवकांनी कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावरील निराधार, पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंना आधार देऊन त्यांच्यावर उपचार केले. समुपदेशन करुन त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करण्याचे कार्य केल्याबद्दल संस्थेस कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.

माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले मानवसेवेचे कार्य प्रेरणादायी असून, अशा सामाजिक संस्थांमुळे समाज सावरला असल्याचे पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले. तर मानवसेवेच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ आग्रवाल, विभागीय पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक पल्लवी देशमुख, पोलीस मित्र संघटनेचे राज्य संघटक सुनिल दरंदले, अमित इथाटे, शारदा होशिंग, सतिश गिते आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वारुळाचा मारुती परिसराची महापौरांकडून पहाणी

पाणी प्रश्‍न सोडवून, नागरी सुविधा पुरविण्याचे महापौरांचे आश्‍वासन

वेब टीम नगर : शहरातील वारुळाचा मारुती परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांनी व पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍याची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांसह या भागाची पहाणी केली. तर येथील नागरिकांच्या पाण्यासह, भूयारी गटार योजना व पथदिव्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, अमृत योजना प्रमुख रोहिदास सातपुते, मेहेत्रे, लोखंडे, अ‍ॅड. कारभारी गवळी, संगीता साळवे, एकनाथ उमाप, जनार्धन घाटविसावे, नितीन वांद्रे, रत्नाकर पवार, संतोष क्षीरसागर, विमल गायकवाड, आशिष सोनवणे, भीमराव कसबे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.    

शहरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून महापालिकेने २०१६ साली वारुळाचा मारुती येथे त्यांचे पुनर्वसन केले. येथे २४०फ्लॅटमध्ये सुमारे दीड हजार नागरिक राहतात. तसेच या प्रकल्पा शेजारी असलेल्या २४० फ्लॅटमध्ये महापालिकेचे सफाई कर्मचारी राहतात. मात्र येथील नागरिकांचे पाणी, स्वच्छता व लाईटचे प्रश्‍न अद्यापि सोडविण्यात आलेले नाहीत. या प्रकल्पासाठी व येथील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करुन २०१५ साली पाण्याची टाकी बांधण्यात आली. टाकी बांधून पडिक अवस्थेत असून, त्यामधून नागरिकांना पाणी वाटपासाठी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. पिण्यासाठी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, टँकरद्वारे अनियमीतपणे पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच या भागात भूयारी गटार योजना नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. उघड्या गटारी व डासांचा उच्छादामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या भागात पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री बाहेर पडता येत नाही. तर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याने या मुलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर स्थानिक नागरिकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती.

महापौरांनी तातडीने दखल घेत या भागाची पहाणी करुन पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी टँकर वाढवून पाणी पुरविण्याचे आश्‍वासन दिले. तर तीन महिन्यात या भागातील पाण्याच्या टाकीत अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी सोडून नागरिकांना पाणी वाटप करण्याचे, भूयारी गटार योजना कार्यान्वीत करण्यासाठी व पथदिवे सुरु होण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

    वेब टीम  नगर : सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी दु.१२ ते ४ वाजता श्री मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान,अ.नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम सुंकी यांनी दिली.

     श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा.रुद्राभिषेक, स.८ वा.होमहवन, स.१० वा.सत्यनारायण महापुजा, स.११ वा.महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद (भंडारा) होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 पुणतांबा ग्रा.पं.कर्मचार्‍यांना उपदान रक्कम देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

     वेब टीम नगर :  ग्रामपंचायत कर्मचारी उपदान (ग्रॅज्युईटी) कायदा १९८२ नुसार ज्या ग्रामपंचायतीमध्ये १०व त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत तेथे हा कायदा लागू आहे. पुणतांबा ग्रामपंचायत ही राहाता तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी२०च्या आसपास कर्मचारी आहेत. या ठिकाणी प्रभाकर शेंडगे हे दि३१/०३/२०१८ ला निवृत्त झाले व भोलेनाथ थोरात ३१/१२/२०१४ रोजी निवृत्त झाले आहेत. परंतु ग्रामपंचायतीने त्यांची उपदानाची रक्कम १९८२ ला रुपये ५०,०००/- होती व त्याचा आधार घेऊन ग्रामपंचायतीने वरील दोघांनाही ५० हजार रुपये टप्याटप्प्याने दिले. मात्र संपूर्ण होणारी उपदान तरतुद कलम  नुसार होणारी रक्कम दिलेली नाही, म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनाच्यावतीने गटविकास अधिकारी पं.स. व सरपंच यांना पत्रव्यवहार करुन अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर यांच्या मार्फत नोटीसा दिल्या परंतु त्याची दखल घेतली नाही. म्हणून अहमदनगर येथील कामगार न्यायालयात अर्ज दाखल केला.

     शेंडगे यांची ३ लाख ८५ हजार ८३८ रुपये तर थोरात यांचे रु.१लाख २४ हजार ७८८ एवढी रकमेची कोर्टाकडे मागणी केली होती. ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने अ‍ॅड.चितळे यांनी मुद्दे मांडून सदर दोन्ही कर्मचारी यांना रुपये ५० हजार प्रत्येकी दिल्याचे व इतर मुद्देही मांडून युक्तवाद केला. अर्जदारांच्यावतीने अ‍ॅड.सुधीर टोकेकर यांनी युक्तीवाद केला. सर्व युक्तीवाद व कागदपत्रे व पुराव्याच्या आधारे दुसरे कामगार न्यायालय, अहमदनगरचे न्यायाधीश निता अ.आणेकर यांनी अर्जदारांचा अर्ज पार्टली मंजूर करुन प्रत्येकी शेंडगे यांना रु.३लाख ३५ हजार ९३८ व थोरात यांना रु.७४ हजार ७८८रुपये देण्याचे आदेश केले. तसेच अर्ज दाखल केल्यापासून रक्कम येईपर्यंत त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा हुकूम केला.

     दोन्ही अर्जदारांच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक)चे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर यांनी काम पाहिले. या निकालाबाबत राज्य उपाध्यक्ष कॉ.तानाजी ठोंबरे तर सेक्रेटरी कॉ. नामदेवराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, कॉ.संजय डमाळ यांनी समाधान व्यक्त केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांगल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात.: वसंतराव मुंडे

वेब टीम नगर  :  पत्रकार हा समाजातील घटनांचा वाहक आहे. चांगल्या संकल्पना राबविण्याची भूमिका पत्रकार संघ नेहमीच घेतो. मात्र ज्यांच्यात क्षमता आहेत त्यांनी आपल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात. असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवार दि. १० फेब्रुवारी रोजी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. सरचिटणीस विश्वास आरोटे, वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदिप भटेवरा, उमेश कुलकर्णी, अनिल बिबवे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या १ वर्षाच्या काळातील कार्याचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला. पत्रकार संघाच्या वतीने राज्यात ११ रुग्णवाहिका प्रशासनाला देण्यात आल्या. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात वेबिनारच्या माध्यमातून २८ जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. गरजू पत्रकारांना मदत केली. त्याचबरोबर पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना विश्वास देण्याचे काम केले.  औरंगाबाद विभागिय कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. तेथे दर आठवड्याला वार्तालाप सारखा कार्यक्रम सुरू करण्यात आला. अशाच प्रकारचा कार्यक्रम आता सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात अनेक दैनिकांमधील पत्रकारांना कामावरून कमी करण्यात आले तर अनेकांचा पगार निम्म्यावर आला. याबाबत मालक, संपादकांची भेट घेऊन पत्रकार आणि मालक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद मध्ये संपादकांची गोलमेज परिषद आयोजित करून वृत्तपत्र व्यवसायातील अडचणींवर चर्चा करून मार्ग काढण्यात आला. वृत्तपत्र व्यवसाय टिकविण्यासाठी वृत्तपत्रांची किंमत वाढविली पाहिजे हे पटवून दिले त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील २५ हुन अधिक दैनिकांनी किंमत वाढविली. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे यावरही चर्चा घडवून आणली. पत्रकारांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. संघटना हे पत्रकारांना विकसित करण्याचे माध्यम आहे असे ते म्हणाले. 

राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्याला अशाच पद्धतीने पुढे जायचे आहे. दोन्ही हातांनी चांगले काम करा म्हणजे हजारो हात तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपले कुटुंब, समाज आणि देश यांच्याप्रती असणाऱ्या जबाबदारीचे भान आपण ठेवले पाहिजे आणि पत्रकारिता हाच धर्म समजून आपण ही संघटना पुढे घेऊन जाणार आहोत असे ते म्हणाले.

राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी, ठाणे विभागाचे अध्यक्ष भगवान चंदे आणि राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी आपला कार्य अहवाल मांडला. 

यावेळी पुणे विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना काळात हजारो गरजू लोकांना अन्नधान्य  व किराणा वाटप करणारे इंदापूर येथील पत्रकार अनिल मोहिते आणि सहकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

वैभव स्वामी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विश्वास आरोटे यांनी आभार मानले. या बैठकीस पत्रकार संघाचे राज्यभरातील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिमेंट ,स्टीलची भाववाढ रोखण्यासाठी नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती करावी विविध संघटनांची मागणी

    वेब टीम  नगर : सिमेंट, स्टील उत्पादक कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण देशात सिमेंट व स्टीलच्या किंमतीमध्ये अनैसर्गिक भाववाढ कंपन्या करत आहेत. त्यामुळे घरांच्या व बांधकाम प्रकल्पांच्या किंमती वाढत आहेत. या भाववाढीमुळे शासनाबरोबरच सर्वसामान्यांनाही याची झळ बसत आहे. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने टेलिकॉम, विमा, बांधकाम आदि क्षेत्रांसाठी नियामक मंडळाची निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर सिमेंट व स्टीलचे भाव वाढ रोखण्यासाठी नियंत्रण प्राधिकरणाची नियुक्ती करावी, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन व क्रेडाई संघटनांच्याच्या वतीने सामुहिक पद्धतीने करण्यात आली आहे.     

     सिमेंट व स्टीलच्या भाववाढी नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन व क्रेडाई संघटनेच्यावतीने आज देशव्यापी संप पुकारुन धरणे आंदोलन करण्यात आले. नगरमध्ये औरंगाबाद रोडवरील बांधकाम चालू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर तीनही संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी क्रेडाईचे संस्थापक अध्यक्ष  जवाहर मुथा, बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन मच्छिंद्र पागिरे, इंजिनिअर आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन सलिम शेख, सचिव अन्वर शेख, खजिनदार प्रदीप तांदळे, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, मिलिंद वायकर, शरद मेहेर, विजय तवले, यश शाह आदिंसह तीनही संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना जवाहर मुथा म्हणाले, कोरोना व लॉकडाऊनमुळे मरगळ आलेला बांधकाम व्यवसाय स्टील व सिमेंटच्या सातत्याने होणार्‍या दरवाढीमुळे आणखी अडचणीत आला आहे. सिमेंटची जवळपास २५ टक्के तर स्टील जवळपास ५० टक्के महाग झाले आहे. कंपन्यांच्या मोनोपॉली वृत्ती थांबली पाहिजे. परदेशामध्ये निर्यातीच्या नावाखाली तुटवडा दाखवून मनमानी पद्धतीने कंपन्या भाववाढ करत आहेत. या भाववाढीचा निषेध तीनही संघटनांच्यावतीने करत देशव्यापी आंदोलन छेडले आहे. त्वरित भाववाढ कमी झाली नाही तर संपूर्ण देशातील बांधकाम थांबविण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.  

     मच्छिंद्र पागिरे म्हणाले, केंद्रीय बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी सिमेंट व स्टीलच्या कंपन्यांना भाववाढ थांबविण्याची तंबी दिली आहे. कंपन्यांचा मनमानी कारभार थांबण्यास तयार नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.

     सलिम शेख म्हणाले, सिमेंट व स्टील भाववाढ तातडीने नियंत्रणात येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शेतीनंतर जास्तीत जास्त रोजगार देणारे देशातील हा एकमेव उद्योग आहे. लाखो कुटूंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत.

     यावेळी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, मनपा उपायुक्त  श्री.पवार, लघु पाटबंधारेचे अधिक्षक ए.आर.नाईक आदिंना निवेदने देण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करणार : किरण काळे

वेब टीम नगर : केडगाव मध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक कार्यकर्ते केडगाव मध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्यास तयार आहेत. आगामी काळात केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी पक्ष करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त केडगाव मधील नागरिकांसाठी "मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच मास्क, बिस्किट आणि कॅल्शियम गोळ्या वाटप कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे बोलत होते.

काळे म्हणाले की, केडगाव मध्ये नागरी पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. केडगावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आवश्यक तो पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. 

आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीस  नलिनीताई गायकवाड यांच्या संकल्पनेतून गायकवाड यांच्यासह शहर जिल्हा सहसचिव नीता बर्वे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सुनीताताई बागडे, उषाताई भगत, जरीना पठाण यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

यावेळी सरचिटणीस नलिनीताई गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने कायम तळागाळातील समाज घटकांना बरोबर घेऊन काम केले आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त केडगावमध्ये काँग्रेस पक्षाने आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांना शहरातील तज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. नीता बर्वे म्हणाल्या की, शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सफल झाला आहे. सुनीता बागडे यांनी भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा आयोजित केले जातील असे यावेळी सांगितले.

शिबिरामध्ये फॅमिली फिजिशियन डॉ.रेवन पवार, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव हराळ, स्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती हराळ, अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन धोत्रे, मेडिकल ऑफिसर डॉ. राहिंज, फिजीशियन डॉ. बागले, नेत्ररोग तज्ञ डॉ.ताठे यांनी आपली सेवा दिली. 

शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. २७८ नागरिकांनी यावेळी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांना या वेळी कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तर परिसरातील लहान मुलांसाठी बिस्कीट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. 

यावेळी सेवादलाचे डॉ.मनोज लोंढे, निजामभाई जहागीरदार, अनंतराव गारदे, फारुक शेख, कौसर खान, प्रवीणभैय्या गीते पाटील, विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिझवान अहमद, सौरभ रणदिवे, अमित भांड, प्रमोद अबुज आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments