स्त्रियांकडे एकटक पाहणं ठरणार गुन्हा

  स्त्रियांकडे एकटक पाहणं ठरणार गुन्हा 

वेब टीम औरंगाबाद : स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळं अशा पीडित मुलींना बळ मिळेल . एखाद्या मुलीने  पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं स्पष्ट केलं आहे.

एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असल्याचा आरोप ठेवत सन २०१७ मध्ये या आरोपीला अटक केली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच  तिच्या घरासमोरील बगीच्यात ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा तिथंही या रोड रोमिओनं  तिची पाठ सोडली नाही. तेव्हा मामानं आपल्या मित्रांनी मदतीनं या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या खटल्यात एकूण ६ साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला ६ महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Post a Comment

0 Comments