महिलेचा विनयभंग ;भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

 महिलेचा विनयभंग ;भाजप नेत्यावर गुन्हा दाखल 

वेब टीम नागपूर: भूखंड खरेदीच्या व्यवहारातून धमकी देऊन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते व संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यासह चार साथीदारांविरूद्ध विनयभंग, धमकी देणे आदींसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यादव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने नागपुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

राजवीर यादव, गणेश यादव व प्रॉपर्टी डीलर प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राजवीर हे मुन्ना यादव यांच्या परिचयाचे आहेत. जयताळा भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस सूत्रानुसार, प्रमोद हे प्रॉपर्टी डीलर आहेत. झारखंड येथील सिनू नावाच्या व्यक्तीने त्यांना प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे अधिकार दिले असून, सिनू याचा पांडुरंगनगर येथे भूखंड आहे. महिलेने प्रमोद यांच्यासोबत पांडुरंगनगर येथील भूखंड १२ लाखांमध्ये खरेदी केला. महिलेने प्रमोद यांना सहा लाख रुपये दिले. महिलेने घराच्या रजिस्ट्रेशनबाबत प्रमोद यांच्याकडे आग्रह केला. प्रमोद यांनी रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली. याच दरम्यान प्रमोद यांनी याच भूखंडाचा व्यवहार राजवीर यादव यांच्यासोबत केला. त्यामुळे प्रमोद हे महिलेला रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करू लागले.

हे प्रकरण मुन्ना यादव यांच्याकडे गेले. काही दिवसांपूर्वी मुन्ना यादव यांनी महिलेला अजनी येथील कार्यालयात बोलाविले. भूखंडाचा आग्रह सोड नाही, तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुन्ना यादव यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. महिलेच्या तक्रारीवरून मुन्ना यादव यांच्यासह चौघांविरूद्ध विनयभंग, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments