आज राज ठाकरे न्यायालयात

 आज राज ठाकरे न्यायालयात 

नवी मुंबई: वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर २०१४साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर राहणार आहेत. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. चार ते पाच हजार कार्यकर्ते कोर्टाच्या आवारात उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आयती संधी चालून आली आहे. 

राज ठाकरे आज सकाळी १०. ३०वाजता सिबीडी येथील कोर्टात पोहोचणार आहेत. तिथून ते ११ वाजता सिवूड येथील मनसे कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी चार ते पाच हजार कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागताला येणार असल्याची माहिती आहे.

वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. २६ जानेवारी २०१४रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

२६जानेवारी २०१४ रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घटवा असे वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुढील काही वेळातच वाशी खाडी पुलावरील टोलनाक्यावर नवी मुंबईतील मनसेने कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेंसह एकूण ७ जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments