नगर टुडे बुलेटीन 01-02-2021

 नगर टुडे बुलेटीन 01-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हळदी कुंक समारंभात महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराचा उपक्रम स्तुत्य : धनश्री विखे

वेब टीम नगर : ध्यानधारणामुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होतात हे संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. जाती धर्माच्या पलीकडे जात आता ध्यानधारणेचे महत्व वाढले आहे. ध्यानधरणेमुळे माझ्यात झालेल्या बदलांचा आनंद मी घेत आहे. सहजयोगा मध्ये सुद्धा ध्यानाचे  महत्व सांगितले आहे. सहजयोगातील ध्यानधारणा सर्वांनी स्वीकारून आपल्या जीवनात बदल घडवावेत. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा निमत्त महिलांना ध्यानधारणेचे धडे देण्याचा सहजयोग परिवाराने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे, असे प्रतिपादन धनश्री विखे यांनी केले.

       श्री निर्मलादेवी प्रणीत सहजयोग परिवाराच्या नगर शाखेच्या वतीने मकर संक्रांत निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभात धनश्री विखे बोलत होत्या. यावेळी डॉ. प्रिया मिटके, डॉ. माधुरी नंनवरे, कार्यक्रमच्या संयोजिका माजी नगरसेविका वीणा बोज्जा, ॲड. शारदा लगड आदींसह विविध क्षेत्रातिल महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते निर्मलादेवींच्या प्रतिमेची महाआरती करून सर्वांना तिळगूळ व वाणाचे वाटप झाले. महिलांच्या उखाण्यांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.

       यावेळी बोलतांना डॉ.प्रिया मिटके म्हणाल्या, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सहजयोगाचे महत्व सांगितले आहे. सध्याच्या वातावरणात महिलांना ध्यानधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सहजयोगाच्या शिकवणीचे सर्वांनी पालन करावे.

       प्रास्ताविकात वीणा बोज्जा म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या सहजयोग परिवाराच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. गेल्या १० महिन्यापासून घरात बसलेल्या महिला यानिमित्ताने बाहेर पडून एकत्र आल्या  

       कार्याक्रमचे सूत्रसंचलन शीतल ठोंबरे यांनी केले. आभार गीता सातपुते यांनी मानले. यावेळी रेणुका अजमाने, छाया ढाकणे, कांचन भुजबळ, सुनिता शिंदे, जयश्री सामलेटी, रुपाली रोह्कले, वासंती वैद्य, सुनंदा तोगे, वाणी सोनावणे आदि उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोलिओला हद्दपार करण्यासाठी पोलिओ डोस घेणे आवश्यक

 महापौर बाबासाहेब वाकळे : मनपाच्यावतीने पोलिओ अभियान मोहिमचा बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात शुभारंभ

     वेब टीम नगर : राष्ट्रीय पोलिओ अभियानाचा शुभारंभ मनपाच्यावतीने बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते बाळास डोस पाजून करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित,  महिला बाल कल्याण सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेनप्पा, नगरसेवक विपुल शेटीया, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती ढापसे, डॉ.सुजोत सैंदाणे, आरोग्य सेविका एस.डी.क्षेत्रे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून भारतात नियमित राबविलेल्या पोलिओ लसीकरणामुळे भारतात पोलिओचे निर्मुलन झाले आहे. शासनाच्यावतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. अशा विविध लसी या बालकांना दिल्यास बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते. या लसींचे सकारात्मक परिणाम हे दुरगामी असल्याने प्रत्येक पालकांनी आपल्या बालकास लस ही दिलीच पाहिजे. शासनाच्यावतीने यासाठी विशेष मोहिम राबविली जात असते, त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे.  पोलिओला हद्दपार करण्यासाठी हा डोसे घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्यावतीने हे लसीकरण मोफत केले जात असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

     याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित म्हणाले, बालकांचे आरोग्य अबाधीत राहावे, यासाठी शासनाच्यावतीने सातत्याने लसीकरणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात. या लसीकरणामुळे आज अनेक रोग निर्मुलनाचे कार्य झाले आहे. पोलिओसारख्या घातक आजाराचा नायनाट केलेला आहे, तरी सुद्धा काळजी घेणे आवश्यक असल्याने या राष्ट्रीय पोलिओ कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे असे सांगितले.

     याप्रसंगी आरोग्य अधिकारी अनिल बोरगे म्हणाले, नगर शहरात पोलिओचे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. यामध्ये ४६२८० बालकांना डोस देण्यात येणार असून, त्यासाठी ३७४बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ७५० कर्मचारी काम करत आहे, यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नर्सेस, आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. ही मोहिम पुढील पाच दिवस शहरात राबवून राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन हा पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या मदतीनेही पोलिओ डोससाठी सहकार्य करत असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या लता शेळके यांनी या अभियानाविषयी जागृता निर्माण करुन सर्वांनी आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोलिओ डोसमुळे बालकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत 

बाळासाहेब बोराटे : माळीवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ अभियानाचा शुभारंभ

     वेब टीम नगर : पोलिओ अभियानाचा माळीवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अशोकराव बाबर, प्रा.विजय म्हस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती ढापसे, डॉ.सुजोत सैदाणे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, पोलिओ लसीकरण हे बालकांच्यादृष्टीने महत्वाचे असून, त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकांना लस ही दिलीच पाहिजे. आजच्या लसीमुळे पुढे बालकांच्या आरोग्यावर चांगले परिणाम होत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. प्रभागातील प्रत्येक बालकांच्या लसीकरण करण्यासाठी मनपाच्यावतीने सोय करण्यात आली असून, नागरिकांनीही त्याचा लाभ घेतला पाहिजे. सुदृढ बालके ही कुटूंबास आनंद देणारी असल्याने महत्वाचे असलेले हे लसीकरण आवश्यक आहे.

     याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती ढापसे यांनी पोलिओ डोस हा बालकांसाठी महत्वाचा असल्याने बालकांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचा आहे, त्यामुळे  पालकांनी या मोहिमीत सहभागी होऊन आपल्या बालकांना डोस द्यावा. यासाठी मनपाच्यावतीने ही मोहिम राबविण्यात येत आहे. पुढील पाच दिवसात ज्यांना डोस घेतला नसेल त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन हा डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतांच्या शिकवणी आचरणात आणल्यास मनुष्याची प्रगतीच होते

 हाजी खलील चौधरी : ह.अशरफ शाह वली दर्गा कमिटीच्यावतीने अन्नदान

    वेब टीम  नगर : थोर संत हजरत शाह शरीफ बाबांचे संदल उरुसानिमित्त खिस्तगल्ली येथील हजरत अशरफ शाह वली दर्गा कमिटीच्यावतीने भंडारा-महाप्रसादाचा शुभारंभ सामुदायिक विवाहाचे प्रणेते हाजी खलील चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी कुराण पठण, नातशरीक, सलाम पठण करुन फातेहा देण्यात आले.

     याप्रसंगी हाजी खालील चौधरी म्हणाले, संतांची शिकवण ही मनुष्याने आपल्या जीवनात आचणात आणल्यास आपली प्रगती होईल. समाजामधील दूरी दूर होऊन आपले जीवन आनंदी होईल. हजरत अशरफ शाहवली दर्गा कमिटीच्यावतीने हजरत शाह शरिफ बाबांचे उरुसनिमित्त सर्वधर्मियांसाठी अन्नदानासारखे उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहेत, असे सांगितले.

     कार्यक्रम यशस्वीतेसठी दर्गा कमिटीचे प्रमुख सय्यद अन्सार गुलाब पेटीवाले, रफीक बागवान, अरबाज कुरेशी, हाजी अन्वर खान, शेरु पार्टी बाबु डिजेवाले, बारी पिंजारी, सोनू सनईवाले, मो.हनिफ कादरी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत महात्म गांधींना अभिवादन

    वेब टीम  नगर : स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. संस्थेच्या शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, विक्रम पाठक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना भामरे, शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशिल आंधळे, सुलभा तरवडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी जितेंद्र लांडगे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आपले सर्व आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वाचा संपूर्ण जगाने स्विकार केला. सत्यग्राहाच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या महान कार्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते.

     याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनवरील प्रसंगी सांगून त्यांच्या कार्याची ओळख करुन विद्यार्थ्यांना करुन दिली.  शेवटी सुलभा तरवडे यांनी आभार मानले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धार्मिक स्थळे ही आपली बलस्थाने

आ.संग्राम जगताप : तपोवन रोडवरील एसटी कॉलनीत गणेश मंदिराचा वर्धापन दिन

    वेब टीम  नगर : माणसाला मन:शांती ही फक्त अध्यात्मिक ज्ञानाने मिळते, पण त्याचबरोबर मठ, मंदिरे उभारुन चालणार नाही तर त्यांचे पावित्र्य राहिले पहिजे. नगर जिल्हा ही संतांची भुमी असलेला आहे. धार्मिक स्थळे ही आपली बलस्थाने आहेत, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

     तपावेनरोड वरील एस.टी. कॉलनीतील गणेश मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंदिराला आ.जगताप यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

     याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे  व भाविक उपस्थित होते.

     आ. जगताप पुढे म्हणाले कॉलनीतील मंदिरामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. सुख, शांती समाधानाचे ते प्रतिक आहे. मंदिरामुळे सर्वजण एकत्र येतात, यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. एस.टी. कॉलनीमधील या मंदिरासाठी नगरसेवक त्र्यंबके यांनी सुरवातीपासून मोठे योगदान दिले. साई बाबांच्या मंदिरामुळे धार्मिक कार्यात त्यांचे नाव होत आहे. गणेश मंदिराच्या वर्धापन दिनासाठी त्यांचे सहकार्य असल्याने आज मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले, असे ते म्हणाले.

     गणेश मंदिरासाठी नित्यनियमाने स्थानिक नागरिक आरतीसाठी एकत्र येतात. विधिवत पूजा-अर्चा होत असल्याने र्श्रीं ची कृपा आहे, असे मत नगरसेवक त्र्यंबके यांनी व्यक्त केले.

     मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री.गणेश मूर्तीस अभिषेक, भजन, प्रवचन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यावेळी भाविकांनी सर्व धार्मिक कार्यास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाविक व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी साई मंदिरात पोलिओ केंद्र : नगरसेवक सुनिल त्र्यंबके

    वेब टीम  नगर : भारत पोलिओमुक्त आहे, पण काही देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो, त्यासाठी ‘दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी‘ या ब्रीद वाक्याचा विचार करुनच भाविक व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी वसंत टेकडी येथील साई मंदिरात पोलिओ डोस देण्यासाठी केंद्र सुरु केले असे, प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ मोहिमेत साई संघर्ष प्रतिष्ठानने सहभाग घेऊन पोलिओ केंद्रास सहकार्य केले. यावेळी बालकास पोलिओ डोस देऊन त्र्यंबके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, आरोग्य विभागाचे डॉ.गणेश मोहोळकर, कर्मचारी हर्षदा खरात, स्नेहल साळवे, स्वाती कांबळे, वैशाली आनंदकर, सुनिता चौधरी, मिनाक्षी मोरे उपस्थित होते.

     रविवारी १०० टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न होता, पण तरीही काही नागरिक वंचित राहतात, त्यांच्या सोयीसाठी पुढील पाच दिवस पोलिओ देण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी जवळील पेट्रोल पंपावर सोय करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक

प्रशांत गडाख : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने गाव तेथे वाचनालय उपक्रमास पुस्तके भेट

वेब टीम नगर : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, अहमदनगर जिल्हा शाखा यांच्या वतीने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गाव तेथे वाचनालय या उपक्रमाकरीता पुस्तकांची भेट देण्यात आली.

डॉ.दिपक शिकारपुर लिखित आयटी करियर २०२० या पुस्तकांचा संच यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हासचिव व शिवतेज मित्र मंडळाचे समन्वयक संतोष कानडे, प्रा.सोपान शेळके, शरद पुंड, देवीदास दहातोंडे, प्रशांत दहातोंडे, संतोष बोरुडे आदी उपस्थित होते. प्रशांत गडाख यांनी सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. शिवतेज मित्र मंडळ ट्रस्ट राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉक्टरांनी सामाजिक भावनेने रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवावा 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा : केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या मोफत स्त्रीरोग व अस्थीरोग तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

 वेब टीम नगर : डॉक्टरांनी सामाजिक भावनेने रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवावा. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना अद्यावत आरोग्यसुविधा मिळण्यासाठी विविध शिबीर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. शेख कुटुंबीयांनी गरजूंसाठी आपली दारे उघडी करुन सर्वसामान्यांना आधार देत  रुग्णसेवेचे व्रत जोपासले असल्याची भावना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी व्यक्त केली.  

शहरातील किंग रोड, रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठी मोफत स्त्रीरोग व अस्थीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पोखरणा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमसीआयचे डॉ. निसार शेख, डॉ. आर.आर. धूत, नगरसेवक नज्जू पैलवान, डॉ. विजय पाटील, हाजी अब्दुल कादीर, हॉस्पिटलचे डॉ.सईद शेख, अस्थिरोग तज्ञ डॉ. जाहीद शेख, स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉ. मारिया शेख, स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कुदरत शेख आदी उपस्थित होते.

नगरसेवक नज्जू पैलवान यांनी डॉ. सईद शेख यांच्या परिवारातील सर्व सदस्य डॉक्टर असून, सामाजिक भावनेने त्यांचे कार्य सुरु आहे. संपुर्ण कुटुंबीय गरजू रुग्णांची सेवा करीत असल्याचे स्पष्ट केले. डॉ.आर.आर. धूत यांनी सदर जागा शेख यांना देताना या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा घडावी या भावनेनेच देण्यात आली आहे. जुने धूत हॉस्पिटलच्या जागेत नव्याने सुरु झालेले केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटल लवकरच नावरुपास येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एमसीआयचे डॉ. निसार शेख यांनी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत शिबीराचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.    

प्रास्ताविकात अस्थिरोग तज्ञ डॉ. जाहीद शेख यांनी अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करुन शेख परिवार आरोग्य क्षेत्रात उभे राहिले आहे. सर्वसामान्यांची जाणीव ठेऊन हॉस्पिटलची भविष्याची वाटचाल राहणार असून, अल्प दरात रुग्णांना दर्जेदार अद्यावत सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत स्त्रीरोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कुदरत शेख यांनी केले. या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये गरोदर स्त्रियांची तपासणी, वंध्यत्व निवारण, स्त्री रोग निदान व उपचार, वयात येतानाच्या तक्रारींवर मार्गदर्शन, विवाहपूर्व समुपदेशन, प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्‍चात तपासणी, वेदनारहित प्रसूती, वारंवार गर्भपात होणे निदान व उपचार, कुटुंबनियोजन सल्ला व मार्गदर्शन, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणे, तसेच अस्थिरोगाशी संबंधीत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सर्व प्रकारचे जुळून आलेले फ्रॅक्चर, फ्रोजन, सांधे निखळणे आदी संदर्भात तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या ऑपरेशन सवलतीच्या दरात होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सईद शेख यांनी केले. आभार डॉ. मारिया शेख यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने टंगळ-मंगळ मोदी, कारभार अनागोंदी राज्याची घोषणा

धर्माच्या नावावर राजकारण करुन, संघ प्रणाली देशावर लादली जात आहे

अ‍ॅड. गवळी : शेतकरी, घरकुल वंचित व युवकांचे प्रश्‍न दुर्लक्षीत केले जात असल्याचा आरोप

वेब टीम नगर : शेतकरी, घरकुल वंचित व युवकांचे प्रश्‍न न सोडवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवत पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे टंगळ-मंगळ मोदी, कारभार अनागोंदी राज्याची घोषणा करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अंबिका नागूल, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, संतोष लोंढे, संजय स्वामी, फरिदा शेख, सुशील देशमुख आदी उपस्थित होते.

एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात आपला देश जाती, धर्मावर आधारित कालबाह्य व्यवस्थेचा स्विकारुन त्या पध्दतीने राज्य करीत आहे. उन्नतचेतना व लोकभज्ञाक तंत्रापासून मोदी सरकार दूर असल्याने देशातील ज्वलंत प्रश्‍नावर टंगळ-मंगळ पध्दतीने कार्य केले जात आहे. देशात वाढत चाललेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, घरकुल वंचितांची ससेहोलपट, जातीय व्यवस्थेमुळे अल्पसंख्यांक समाजावर होत असलेला अन्याय, स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणुक, युवकांची बेरोजगारी हे प्रश्‍न अत्यंत गंभीर होत चालले आहे. सदर प्रश्‍न सोडविण्यास केंद्र सरकार अपयश ठरत असून, हुकमशाही पध्दतीने राज्यकारभार चालू असल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

अहमदनगरसह इतर शहरालगत मोठ्या प्रमाणात पड जमीन उपलब्ध आहेत. अशा जमीनींवर वीज, पाणी व रस्ते या मुलभूत सुविधा निर्माण करुन घरकुल वंचितांना स्वस्तात घरे देणे शक्य आहे. मात्र राज्य सरकार याबाबत उदासिन असल्याची खंत घरकुल वंचितांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

केंद्र सरकारने देशातील घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे घर देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र घरकुल वंचितांचा प्रश्‍न कोणत्याही प्रकारे सोडविण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य लोकांच्या प्रश्‍नांपासून दूर आहेत. त्यांचा अजेंडा फक्त धर्माच्या नावावर भावनिक राजकारण करुन, संघ प्रणाली देशावर लादण्याचे कार्य केले जात आहे.देशातील राज्यकर्ते उन्नतचेतनेपासून लांब राहिल्याने सर्वसामान्यांची प्रश्‍न प्रलंबीत राहिले. देशातील महाविद्यालय व विद्यापिठांची शिक्षणपध्दती कालबाह्य झाली असून, आधुनिक अशा शिक्षण पध्दतीचा स्विकार करण्याची गरज आहे. यातून सामाजिक क्रांती घडणार असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रमैनी विवाह पध्दतीची समाजाला गरज 

चंद्रकांतदास पाटील : ना हुंडा, ना खर्च करीत रमैनी पद्धतीने पार पडला विवाह

वेब टीम नगर : सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु असून, लग्नसमारंभ मोठ्या थाटात होण्यासाठी वारेमाप खर्च करण्याची पध्दत रुढ झाली आहे. या रुढीला फाटा देत शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ना हुंडा, ना खर्च करीत रमैनी पद्धतीने खंडू पुंड (रा. नेवासा) व वैशाली कोरडे (रा. अकोले) यांचा विवाह थाटात पार पडला.

 रमैनी पद्धतीच्या विवाह सोहळ्यात कोणत्याही स्वरुपाचा हुंडा दिला अथवा घेतला जात नाही. संसरोपयोगी वस्तू देखील दिल्या जात नाही, आहेर-मानपान, कोणत्याही प्रकारची पूजा, साखरपुडा, हळदी, मंगलाष्टके, अक्षदा, हार, फटाके, बॅण्ड, वरातीला फाटा दिला जातो. रुढी, परंपरेला पूर्णत: फाटा देऊन पुज्य कर्विदेव कबीर व त्यांचे अवतार जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आर्शिवादाने 17 मिनीटात रमैनी आरती करुन साध्या पध्दतीने हा विवाह लावण्यात येतो.

संत रामपालजी महाराजांनी समाजसुधारणेची चळवळ चालवून रमैनी विवाह पध्दत रुढ केली. या विवाह पध्दतीमुळे अनेक परिवारांचे कल्याण झाले. तसेच त्यांनी स्त्री भ्रुण हत्या, नशा मुक्ती, भ्रष्टाचार मुक्ती, जात, वर्ण व धर्मभेद थांबविण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात जागृती केली. रमैनी विवाह सोहळा आदर्श पध्दती असून, यामुळे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चाचे ओझे वाटत नाही व ते कर्जबाजारी होण्यापासून वाचतात. या विवाह पध्दतीची समाजाला गरज असल्याची भावना चंद्रकांतदास पाटील यांनी व्यक्त केली. हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी उत्तमदास कदम, चंद्रकांतदास पाटील, गणेशदास कासार, प्रमोददास भापकर आदींनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निवारा बालगृहात आल्यामुळे मला माझ्या माहेरात आल्याचा आनंद झाला : भास्करराव पेरे पाटील

वेब टीम जामखेड : मी मुळात भटकाच आहे, कारण मी टाकून दिलेला माणूस आहे. निवारा बालगृहात आल्यामुळे मला माझ्या माहेरात आल्याचा आनंद झाला. असे प्रतिपादन निर्मलग्राम पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. जेष्ठ विश्वस्थ प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर, इकोनेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी भोपटकर, ऊस तोडणी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्योजक संदिप बोराडे, कोरो मुंबई चे सूर्यकांत कांबळे, उमाताई जाधव, अलकाताई जाधव आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना पेरे म्हणाले की, काम करणाऱ्या माणसांना काही लोक नावे ठेवत असतात त्याकडे लक्ष न देता आपण आपले काम प्रामाणिक पणे केले पाहिजे. माणसातच देव शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगून येत्या २६ जुलै रोजी माझ्या आईच्या स्मरणार्थ निवारा बालगृहातील मुलांना जेवू घालणार आहे. आणि मी ही त्यांच्या सोबत जेवणार आहे असे ते म्हणाले. 

वसंत मुंडे म्हणाले की, ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणजे उपेक्षितांचा आवाज आहेत. आजचे खरे मुकनायक तेच आहेत. ज्यांच्याकडे अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत असते तोच माणूस जीवनात यशस्वी होत असतो. असे सांगून ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे ते म्हणाले. 

लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर म्हणाल्या की, दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव स्मृती सांस्कृतिक पुरस्कार मला मिळाला याचा मला आनंद आहे. मात्र मी माझी कलावंत असलेली आई गमावली हे दुःख आहे. मात्र पुरस्काराच्या रूपाने आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहिल.

ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो. वंचित, निराधार, अनाथ, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे. आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच हे वसतिगृह चालते. याला शासनाचे कुठलेही अनुदान नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, महिला मंडळ फेडरेशन च्या अध्यक्षा मुमताज शेख, टोल ग्रुपच्या एच. आर. मॅनेजर जयंतीताई फडके, इकोनेट च्या गौरी ताई भोपटकर, उद्योजक संदिप बोराडे, कोरो मुंबई चे सूर्यकांत कांबळे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदींना यावेळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लावणी कलावंत संजीवनी मुळे नगरकर यांना दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

शाहीर हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर दिलीप शिंदे, निवेदक उद्धव काळापहाड यांचा गौरव करण्यात आला. तर स्वयंसेवक अजिनाथ शिंदे (जामखेड), दादा शिंदे (इंदापूर), नारायण गडई (नेवासा), कडूबा वाघ (पैठण), गोरख भोसले (मंगलवेढा) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

शाहीर भारत गाडेकर, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर दिलीप शिंदे, शाहीर हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर राजगुरू यांनी शाहिरी जलसा सादर केला. त्यांना प्रा. सचिन साळवे (हार्मोनियम), राजेंद्र चव्हाण (ढोलकी), राहुल शिंदे यांनी तबल्यावर साथ संगत केली. 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उदघाटन झाले तर राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी निवारा बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. 

यावेळी विशाल नाईकवाडे, प्रा. शिवराज बांगर, प्रा. बाळासाहेब बळे यांचीही भाषणे झाली. बापु ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. द्वारकाताई पवार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, प्रकाश शिंदे, संतोष भोसले, तुकाराम पवार, राजू शिंदे, छाया भोसले, पल्लवी शेलार, मनीषा काळे, रोहिणी राऊत, काजोरी पवार, सुनीता बनकर, जालिंदर शिंदे, विशाल पवार, लता सावंत, सारिका गोंडे आदींनी परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन : किरण काळे

  वेब टीम नगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा सात फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून या निमित्तानं १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर शहरामध्ये 'काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. 

काळे यांनी म्हटले आहे की, ना. बाळासाहेब थोरात हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या सुसंस्कृत आणि संयमी व्यक्तिमत्वासाठी ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. राज्याच्या काँग्रेसचे ते नेतृत्व करतात. त्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिमान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच नगर शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये भव्य-दिव्य प्रमाणामध्ये पक्ष बळकटीकरण सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

१ फेब्रु.- अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग बांधवांसाठी मिष्टान्न भोजन वाटप कार्यक्रम, २ फेब्रु.- मुशायरा (कवि संमेलन), ३ फेब्रु. - गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी वाटप उपक्रम, ४ फेब्रु. - शिवकालीन मर्दानी खेळांचे लाईव्ह प्रात्यक्षिक, त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू, क्रिडा प्रशिक्षक यांचा सन्मान सोहळा, ५ फेब्रु.- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची प्रकट मुलाखत, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक किशोर रक्ताटे यांचे व्याख्यान पार पडणार आहे. 

६ फेब्रु. - महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर कार्यक्रम, ७ फेब्रु. - 'शिक्षण कट्टा' उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवशी ७ फेब्रुवारीला सायंकाळी पक्ष कार्यालयमध्ये शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी आयोजित विशेष संमेलनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे.

विविध प्रभागांमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमांना आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह सर्व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच विविध फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करीत आहेत. बळकटीकरण सप्ताहाच्या माध्यमातून ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा विश्वास किरण काळे यांनी व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments