रक्षकच निघाले भक्षक ....
वेब टीम गोरखपूर: रक्षकच निघाले भक्षक तर..? असा प्रश्न एका घटनेने उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लुटमार करणारे पोलीसच निघाले. व्यावसायिकांची झडती घेण्याच्या बहाण्याने अपहरण करून नौसढमध्ये १९ लाख रुपये आणि ११.२० लाख रुपयांचे दागिने लुटले होते. गोरखपूर पोलिसांनी गुरुवारी या लुटारू पोलिसांना जेरबंद केले.
बस्ती जिल्ह्यातील जुन्या बस्ती पोलीस ठाण्यात तैनात एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी रोकड आणि लुटलेले दागिने हस्तगत केले. वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी पोलिसांना बडतर्फ करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे.
महाराजगंजच्या निचलौल येथून लखनऊच्या दिशेने जात असताना, दोन सराफा व्यावसायिक दीपक वर्मा आणि रामू वर्मा यांना बुधवारी सकाळी खाकी वर्दीतील आरोपींनी झडतीच्या बहाण्याने बस थांब्यावर उतरवले. त्यांच्याकडील रोकड आणि सोन्या-चांदीचे लुटले. व्यापाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस खडबडून जागे झाले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी तपास सुरू केला.
...अन् सापळ्यात अडकले
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता, एका वाहनाबाबत माहिती मिळाली. ती बस्ती येथील असल्याचे समजले. बस्ती जिल्ह्यातील जुन्या बस्ती पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस अधिकारी धर्मेंद्र यादव, शिपाई महेंद्र यादव आणि संतोष यादव हे ते वाहन घेऊन निघाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे एक पथक बस्ती येथे रवाना झाले. पोलिसांनी चालक देवेंद्र यादवला ताब्यात घेतले. त्यानंतर धर्मेंद्र यादव आणि दोन्ही शिपायांना अटक केली. कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
0 Comments