नगरटुडे बुलेटीन 15-01-2021

नगरटुडे  बुलेटीन 15-01-2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहा महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळणार 

बाबासाहेब बोडखे : शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने अखेर तो शासन निर्णय निर्गमीत

वेब टीम नगर : सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शासनाच्या वतीने शासन निर्णय निर्गमीत करण्यात आल्याने दि.१जानेवारी २०१९ ते ३० जून २०१९या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग आखेर मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षक परिषदेच्या वतीने आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना दि.८ जानेवारी रोजी शासनास विसर पडलेल्या ३ टक्के महागाई भत्ता तसेच ५ टक्के थकबाकी रोखीने देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. जुलै२०१९ला महागाई भत्ता १२ टक्के वरून १७ टक्के झाला होता. ही वाढ शासनाने डिसेंबर २०१९पासून लागू करून १७ टक्के महागाई भत्ता नियमित सुरू केला होता. परंतू  दि.१ जानेवारी२०१९ ते ३०जून २०१९ ही ६ महिन्याची थकबाकी नंतर निर्णय करुन देण्याचे सांगितले होते. यासंदर्भात शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार गाणार, अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, मुंबई विभागाचे उल्हास वडोदकर, शिवनाथ दराडे यांनी शासनाशी वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याने सदर प्रश्‍न मार्गी लागला असून, या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंडी, कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नाही 

 जिल्हा पोल्ट्री असोसिएशन :बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

वेब टीम नगर : बर्ड फ्लूच्या भितीने गैरसमज व अफवा पसरुन नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना बर्ड फ्लू व मानवी आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी अंडी व कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून, चुकीच्या गोष्टी व अफवाला बळी न पडण्याचे आवाहन केले.

 यावेळी डॉ. देविदास शेळके, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके, संतोष कानडे, दीपक गोळक, डॉ.उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांनी माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करताना म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात 52 पक्षी मरण पावले असून, ते बर्ड फ्लूने मेले हे अजून निष्पन्न झाले नाही. यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिडसांगवी  गावाला कंट्रोल झोन म्हणून घोषित केला आहे व इतर भाग अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे. पक्षी मृत होत असतील तर त्या भागातील पक्ष्यांची वाहतुक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. २००६ सालापासून हा बर्ड फ्लू आला. या संदर्भात शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली असता मनुष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले नाही. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसून, यापासून धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोनानंतर बर्ड फ्लूचे संकट महाराष्ट्रात आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरल्याने नागरिकांनी कोंबड्याचे मास व अंडी खाने बंद केले आहे. यामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सन २००६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नवापूर (नंदुरबार) व जळगाव जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी अनेक कुक्कटपालन करणार्‍या व्यक्तींना बर्ड फ्लूची लागण झालेली नव्हती. ज्यांनी पक्षी मारण्याचे काम केले त्यांच्यात देखील ती लक्षणे आढळली नाही. भारतात एकाही व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याची नोंद नाही. यावरून बर्ड फ्लू व मानवी आरोग्याचा कोणताही संबंध दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

कोंबडीचे मास व अंडी खाणे कोणत्याही प्रकारे धोकादायक नसून, समाजमाध्यांच्या चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असल्याचे अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवणार्‍यांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार

शेतकरी संरक्षण कायदा देशातील शेतकर्‍यांना नवसंजीवनी ठरणार
अ‍ॅड. कारभारी गवळी : राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा मंथनची घोषणा

वेब टीम नगर : देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांचा सर्वांगीन विकास होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी संरक्षण कायदा मंथनची घोषणा करण्यात आली असून, याद्वारे सर्व शेतकरी संघटना, शेतकरी नेते व सर्वसामान्य शेतकर्‍यांचे निवेदन स्विकारुन शेतकर्‍यांचे प्रश्‍न व मागण्या सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या समिक्षेसाठी नेमलेल्या समिती समोर मांडण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. तर कृषी कायद्यांची समिक्षा करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमली आहे. यामध्ये नगरचे असलेले शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा देखील समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कलम १४१ खाली हा निवाडा देऊन तो केंद्र सरकार, देशातील राज्य सरकारे व जनतेवर बंधनकारक आहे. संघटना देशात शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आणण्यासाठी प्रयत्नशील असताना सर्व शेतकरी संघटना व नेत्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे देण्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व निवेदनांच्या मागण्यांचा एक मसुदा तयार करुन ते सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर मांडण्यात येणार आहे.

शेतकरी संरक्षण कायदा देशातील शेतकर्‍यांना नवसंजीवनी ठरणार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार व त्यांच्या विकास साधला जाऊन त्यांना सन्मानाने जगता येणार आहे. शेतकरी या संज्ञेत शेतकरी, शेतमजूर व शेतीमालावर प्रक्रिया करणारा स्वयंरोजगाराचा या कायद्याने संरक्षण मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या न्याय, हक्कासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या मागे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांनी उभे राहण्याचे आवाहन संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.    

देशातील प्रत्येक राज्यांनी व केंद्र सरकारने कृषी अंदाजपत्रक वेगळे सादर करावे, जलसंधारण, ठिबक सिंचन, सिंचन पाणी वाटपाची हमी मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत बाजारभाव मिळणे, सरकारचे नियंत्रण नसलेला कृषीमुल्य आयोग स्थापन होणे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकर्‍यांना विमा संरक्षण, शेतात जाण्यासाठी रस्ते, प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संरक्षण न्यायप्राधिकरणची नेमणुक होणे, शेतकर्‍यांची फसवणुक करणार्‍यांवर फौजदारी कारवाई होऊन आरोपींना जेलमध्ये टाकण्या संदर्भातच्या तरतुदी शेतकरी संरक्षण कायद्यात समाविष्ट करण्याची मागणी केली जाणार आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पालावरील बालकांसमवेत रंगला पंतगोत्सव

वंचित मुलांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्यासाठी स्टुडन्ट पॉवर फाउंडेशनचा उपक्रम

वेब टीम नगर : मकर संक्रांतनिमित्त पंतगबाजीचा आनंद दुर्बल घटकातील मुलांना घेता यावा या भावनेने स्टुडन्ट पॉवर फाउंडेशन व स्वाती फॅशन डिझाईनिंगच्या वतीने नारायणडोह (ता. नगर) तळ्याच्या मळा येथे उपेक्षित घटकातील पारधी समाजाच्या मुलांसमवेत पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जोपासत युवक-युवतींनी हा उपक्रम राबविला.

केअरिंग फ्रेंडस संस्थेद्वारे चालविण्यात येणार्‍या पुजा बालसंस्कार केंद्रातील मुलांबरोबर साजरा झालेल्या या पंतगोत्सव कार्यक्रमप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक तथा सचिव मोहसीन सय्यद, स्वाती खिळदकर, निशाद शेख, सय्यद मुस्तमीर, आरिश शेख, केअरिंग फ्रेंड्सचे संस्थापक अध्यक्ष युवराज गुंड, संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदींसह युवक-युवती उपस्थित होते.

तळ्याच्या मळा येथे मोठ्या प्रमाणात उपेक्षित वंचित समाजातील पारधी कुटुंब वास्तव्यास आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केअरिंग फ्रेंडस संस्थेद्वारे पूजा बालसंस्कार केंद्र चालविले जाते. या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, संस्कार व मूल्य रुजविण्याचे कार्य बालसंस्कार केंद्र करीत आहे. या बालकांचा मकर संक्रात सण गोड करण्यासाठी व त्यांना पंतगबाजीचा आनंद लुटता यावा याकरिता पंतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहयोगाने उपेक्षित वंचित समूहाच्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आनण्यासाठी विविध पालावर जाऊन बालसंस्कार केंद्र सुरू करणार असल्याचे युवराज गुंड यांनी सांगितले. मोहसीन सय्यद म्हणाले की, समाजातील उपेक्षित मुलांसाठी कार्य करणार्‍या सामाजिक संस्थांना स्टुडन्ट पॉवर फाउंडेशनचा नेहमीच योगदान राहणार आहे. मुलांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्यासाठी फाऊंडेशनच्या युवक-युवतींना हा उपक्रम घेतला. वंचितांच्या सेवेतच जीवनाचे समाधान असून, आनंद वाटल्याने द्विगुणीत होत असते. वंचितांना मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांनी आवाहन केले. पालावरील रंगलेल्या पंतग महोत्सवाचा बालकांनी मनमुराद आनंद लुटला. संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बालकांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची 

प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे : राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास युवकांचा प्रतिसाद

वेब टीम नगर : रक्तासाठी मनुष्य मनुष्यावर अवलंबून असल्याने रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे. रक्तही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून, रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. युनिट, आय.सी.टी.सी. विभाग, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भिंतीपत्रक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य कल्हापुरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.नवनाथ आगळे, एन.सी.सी.चे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान, प्रा.डॉ.एम.बी. शेख, डॉ.डी.जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव, स्नेहल सावंत, अशोक पवार, नरेश पेवाल, मोहन पोकळे, शाहीर कान्हू सुंबे, युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक सागर अलचेट्टी, आदिती उंडे, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचे गणेश निमसे, वैभव धनगर, अविनाश गाडेकर, श्रावण कुटे, देवेंद्र थोरात, कुशल पवार आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात सागर अलचेट्टी यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी व युवकांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या शिबीराचे आणि स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले. शाहीर कान्हू सुंबे यांनी युवकांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन जगताना इतरांसाठी जगण्याचा पोवाड्यातून संदेश दिला. तर आपल्या शाहिरीतून रक्तदान व एड्सबद्दल जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवनाथ आगळे यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रेडिओनगर ९०.४ एफ.एम.ने नगरकरांची अस्मिता जागविली

वेब टीम नगर :मागील दशकात रेडिओनगर केंद्राने अहमदनगर मध्ये सांस्कृतिक-सामाजिक संदर्भात नवा विचार रुजविला. जगातील एका प्राचीन आणि समावेशक अशा  नगरी संस्कृतीचे जागरण करून नगरी अस्मिता फुलवली. त्यामुळेच हे केंद्र नगरकरांचा आवाज बनले असल्याचे प्रतिपादन भारतसेवक निक कॉक्स यांनी केले.

दि१३ जानेवारी २०२१ रोजी रेडियो नगर चा १० वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी " कृतज्ञता नगरची", या सोहळ्यात अहमदनगर शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होऊन "रेडियो नगर" ला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, क्रिकेट आणि बँकिंग तज्ञ पि.डी. कुलकर्णी म्हणाले की, रेडियो नगर ने प्रत्येक क्षेत्रातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. स्नेहालय संस्थेचे हे रेडिओ केंद्र मुळात ना नफा, या उद्दिष्टाने समर्पित असल्याने ज्या विषयांकडे व्यवसायिक माध्यमांचे दुर्लक्ष होते ,त्यांना न्याय मिळाला.

 स्नेहालय संस्थेचे सचिव राजीव गुजर म्हणाले की, भारतातील सर्व समुदाय रेडियो केंद्रात ,(कम्युनिटी रेडियो) सर्वात जास्त वेळेचे  प्रसारण रेडियो नगर ने केले आणि करीत आहे. स्नेहालय चे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख  यांनी वर्ष २००८ मध्ये अहमदनगर मध्ये समुदाय रेडिओ केंद्र सुरू करण्याची संकल्पना मांडली होती.

 देशमुख म्हणाले की,२००८ मध्ये मांडलेली ही संकल्पना ज्येष्ठ समन्वयक आणि विचारवंत स्वर्गीय डॉ.गोपाळराव मिरीकर यांना आवडली आणि त्यांनी रेडियो उभारणी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कार्यक्रम प्रसारण यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की येथे अत्यंत उच्च व व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण मिळते. त्यामुळे या केंद्रात तयार झालेले अनेक निवेदक आणि आर.जे. आज देशातील विविध व्यावसायिक रेडियो केंद्रांची धुरा सांभाळत आहेत. एका छोट्याश्या खोलीमध्ये सुरु झालेल्या या रेडियो स्टुडियो चे आज अतिशय अद्यावत अश्या रेडियो केंद्रात रुपांतर झाले.

प्रास्ताविकात  डॉ गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की ,मागील दशकात रेडियोनगर च्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नावर सामन्यांच्या प्रतिक्रिया, लालबत्ती भागातील वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिला, झोपडपट्टी मधील बालके यांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

नगरची शान...

२०११ मध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार, कुमार केतकर यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या कम्युनिटी रेडियोने खऱ्या अर्थाने सामन्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. रेडियो तंत्रज्ञान देखील सोपे करून नगरकरांसमोर आणले. यापुढे देखील रेडियोनगर आपले कार्य यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीने सुरु ठेवेल अशी ग्वाही स्नेहालय परिवारातर्फे डॉ.प्रीती भोंबे यांनी यावेळी दिली.

ज्येष्ठ सुफी गायक पावन नाईक,  लेखक डॉ.चं.वी. जोशी, कवी शशिकांत शिंदे आणि चंद्रकांत पालवे, चित्रकार अशोक डोळसे, सामाजिक कार्यकर्ते सुमित वर्मा, कवियित्री डॉ.कमर सुरूर, शारदा होशिंग, अॅड पूजा गुंदेचा, निनाद बेडेकर, रुपाली देशमुख, प्रसन्न पाठक, संजय धोपावकर,संजय साठे, अजित कुलकर्णी, अजित माने, अर्कीटेक्ट रसिका आणि प्रसाद बडवे, स्नेहालय परिवारातील हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, ॲड.  उमेश नगरकर ,श्याम आसावा, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी सुगम संगीताच्या अतिशय सुरेल मैफिलीचा उपस्थितांनी आनंद घेतला. युवा कलाकार, गायक अविनाश तिजोरे आणि अमृता देशमुख, सिंथेसाईझर वादक प्रणव देशपांडे आणि गिटार वादक निसर्ग मेहता आणि केजॉन वादक कमलेश रजपूत यांनी नव्या जुन्या हिंदी-मराठी गाण्यांचे अनोख्या पद्धतीने सादरीकरण करून मने जिंकली. हा संपूर्ण सोहोळा फेसबुक लाइव्हच्या माध्यामतून असंख्य रेडियो नगरच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

रेडिओ केंद्राचे संचालन करणाऱ्या अनुजा मुळे, सिद्धांत खंडागळे, अक्षय म्हस्के, सिद्धेश राजगुरू, विशाल अहिरे यांनी दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दर्शन काळे यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोटरीचा सामाजिक जाणीवेतून सण साजरे करण्याचा उपक्रम वाखाण्याजोगा

 पोलीस निरिक्षक विकास देवरे : सावली मधील मुलांना मिळाले भरपूर पतंग

वेब टीम नगर : मकर संक्रांत हा जीवनात गोडवा निर्माण करणारा सण आहे. मनाला आनंद देणारा हा सण रोटरी क्लबने हा सण सावली प्रकल्पात साजरा करत आनंद द्विगुणित केला आहे. सावली मधून मुलांना चांगले संस्कार मिळत असल्याने उद्याची देशची धुरा सांभाळण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळत आहे. रोटरी क्लबचे सामाजिक जाणीवेतून  सण साजरा करण्याचा उपक्रम वाखाण्याजोगा आहे. आपला भारत जगात सर्वशक्तिमान होण्यासाठी सण साजरा करतांना जास्तीतजास्त भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करावा, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विकास देवरे यांनी केले.

          नगरच्या रोटरी मेन क्लबच्या वतीने मकर संक्रांती निमित्त केडगाव येथील सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांना पोलीस निरिक्षक विकास देवरे यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करून भरपूर पतंग देवून मकर संक्रांतिचा सण साजरा केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष अॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, प्रशांत बोगावत, दादासाहेब करंजुले, पराग कुलकर्णी, सावलीचे नितेश बनसोडे आदी उपस्थित होते. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर भरपूर पंतग मिळाल्याचा आनंद यावेळी दिसत होता.

          प्रास्ताविकात ॲड. अमित बोरकर म्हणाले, नगरचा रोटरी क्लब प्रत्तेक सण सामाजिक उपक्रमांनी साजरा करतांना समाजातील वंचित घटकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा करोनाची सर्वाजास्त रुग्ण होत होती त्यावेळी रोटरी कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार, निवास व भोजनाची व्यवस्था केली होती. मकर संक्रांत साजरी करतांना सावली मधील मुलांना भरपूर पतंग दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदातच आमचा आनंद आहे.

          कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी केले. सुत्रसंचलन दादासाहेब करंजुले यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोचिंग क्लासेस  सुरु करण्यास परवानगी मिळावी जिल्हाधिकार्‍यांना प्रोफेशल टिचर्स असो.चे निवेदन

    वेब टीम  नगर : मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असणारे कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन प्रोफेशल टिचर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.बाळासाहेब किर्तने, रोहित रामदिन,  प्रा.आनंद पोळ, प्रा.विजय शेठे, प्रा.सच्चिदानंद घोणसे, प्रा.रविंद्र काळे, प्रा.विजय कांडके, प्रा.प्रकाश जोशी, प्रा.श्रीकांत सोनटक्के, प्रा.विवेक धर्माधिकारी, प्रा.किरण कालरा, प्रा.भगवान गवते, प्रा.संदिप घुमरे आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड १९ मुळे मागील दहा महिन्यांपासून कोचिंग  क्लासेस बंद आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक क्षेत्रांचे व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत.  हे एकमेव क्षेत्र अद्याप अनलॉक झालेले नाही. त्यामुळे स्वयंरोजगार मिळविलेले लाखो युवक बेरोजगार झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील एक महिन्यांपासून शाळा सुरळीत सुरु असून, त्यामध्ये कोविड पेशंट आढळून आलेले नाही. तसेच  पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अहमदनगरमध्ये त्या अनुषंगाने कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यास काही हरकत नसावी.

     उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने अनेक बेरोजगार युवकांनी क्लासेस सुरु केले आहे. त्यासाठी जागा भाडे, इतरही अनेक गोष्टींसाठी कर्ज काढून गुंतवणुक केलेली आहे. परंतु क्लासेस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

आजमितीला कोचिंग क्लासेस हा व्यवसाय ४० टक्के पूर्ण बंद झाला असून, अनेक क्लासेसवाले नैराशातून आत्महत्येचा विचार करत आहेत. याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी प्रा.राजेश मुंडे, प्रा.बेळगे, प्रा.सांगळे, प्रा.अशोक काळे, प्रा.महाले, प्रा.मनोज पाटील, अविनाश जाधव आदिंसह कोचिंग क्लासेसमधील शिक्षक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments