लाखाचे बक्षीस द्या पण बाळ बोठेला अटक करा : ॲड.सुरेश लगड

लाखाचे बक्षीस द्या पण बाळ बोठेला  अटक करा : ॲड.सुरेश लगड 

२१ पोलीस ठाण्यांना "दिसेल तेथे पकडा"चे आदेश 

वेब टीम नगर :  रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार  पत्रकार बाळ बोठे  याच्या  अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अहमदनगर पोलिसांनी   बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा, असे आदेश जिल्ह्यातील २१ पोलिस ठाण्यांना जारी करण्यात आले आहेत.  पारनेर न्यायालयाने जिल्हा पोलिसांना बोठेविरोधात स्टँडींग वॉरंट काढण्याचे आदेश जारी केल्याने  पोलिसांनी आता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना या वॉरंटची माहिती देत बाळ बोठेला पकडण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. 

 बोठे विरोधात स्टॅंडिंग वॉरंट पारनेर न्यायालयात मंजूर झाल्याने  जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या वॉरंटसंदर्भामध्ये माहिती देऊन पत्रकार बाळ बोठे कुठेही   दिसल्यास त्याला तात्काळ पकडण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाच्यावतीने आता देण्यात आले आहेत.  

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर  बाळ बोठेने  औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पारनेर न्यायालयामध्ये बोठे विरोधात स्टॅंडिंग वॉरंट मिळण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता, न्यायालयाने तो मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाईस सुरुवात करून  जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना याची माहिती देऊन बाळ बोठेचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

तर  रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ  बोठे यास शोधून सापडून देणाऱ्यास एक लाखाच्या पुढे बक्षीस जाहीर करावे, अशी मागणी ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश लगड यांनी केली आहे. तसेच बोठेला मदत करणाऱ्या वकिलांचे कॉल डिटेल्स तपासण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

जरे यांची हत्या घडून महिना झाला तरी बोठे सापडत नसल्याने अखेर  ॲड. लगड यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आणखी एक पत्र दिले असून, त्यात बोठेला अटकपूर्व जामीन मिळणार नाही याचे प्रयत्न करावेत तसेच बोठेला शोधणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस द्यावे आणि बोठेच्या संपर्कातील वकिलांच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे.

थोर पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणार्थ सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जात असतांना  लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या गुन्हेगाराच्या तात्काळ मुसक्या आवळल्याशिवाय गत्यंतर नाही, असेही ॲड.लगड यांनी या पत्रात केले आहे.


Post a Comment

0 Comments