नगरटुडे बुलेटिन ०२-०१-२०२१

  नगरटुडे बुलेटिन ०२-०१-२०२१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिनेश भालेराव यांच्या निवडीमुळे नगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

 किरण काळे : काँग्रेस पक्ष क्रीडापटूंच्या सदैव पाठीशी 

वेब टीम नगर : दिनेश भालेराव राष्ट्रीय खेळाडू म्हणून नगर शहर आणि जिल्ह्याला परिचित आहेत. महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स असोसिएशनच्या राज्य सहसचिवपदी त्यांची निवड झाल्यामुळे नगर शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केले आहेत.

भालेराव यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे यांनी भालेराव यांचे कौतुक केले. 

यावेळी काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण भैय्या गीते पाटील, एन. एस. यु. आय. - विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, तायक्वादो प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक नारायण कराळे, बाॅक्सिग प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक मच्छिंद्र साळुंखे, तायक्वादो प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक महादेव मगर, राष्ट्रीय खेळाडु प्रियांका शिरसाठ, युक्ता मिस्त्री, वर्षा आहेरराव, सलमान खान, श्रषिकेश क्षिरसागर, निखिल गंलाडे आदिंसह खेळाडू यावेळी उपस्थित होते.

यावेळी काळे म्हणाले की, दिनेश भालेराव यांनी अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सचिव पदाच्या माध्यमातून क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे काम आजवर केले आहे. ट्रेक रेसर्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भालेराव यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

भालेराव यांच्या माध्यमातून नगरला राज्याच्या कार्यकारणी मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे नगरमधील ॲथलेटिक्स खेळाडूंना मोठे पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी राष्ट्रीय खेळाडू आणि काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी उपस्थित प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, खेळाडूंना दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जस्मीत यांच्या उपक्रमातून अनेकांना प्रेरणा


 बाळासाहेब बोराटे : दिल्ली ते मुंबई सायकल प्रवास करणारे  जस्मीत वधवा यांचा चांदबिबी मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार

   वेब टीम  नगर :  जस्मीत वधवा या नगरच्या तरुणाने इंडिया गेट दिल्ली ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई पर्यंत पाच दिवसात सायकल प्रवास करून अंतर पार केले याबद्दल त्यांचा चांदबिबी मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे, दादा भाकरे, प्रकाश जोशी, श्रीपाद कुलकर्णी, संजय बाले, राहीज सर, अभय मुथा, चीनुभाई निक्रड, नरेंद्र लोळगे, अजय झिंजे, जाधव मेजर, शंतनु मोहारे आदिंसह सर्व सभासद उपस्थित होते.

     याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, आज प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम करत आहेत. परंतु त्याचबरोबर एखादे ध्येय ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करुन ते साध्य करणारे फार कमी लोक आहेत. असेच ध्येय ठेवून जस्मीत वधवा याने दिल्ली ते मुंबई हे १ हजार ४६० किलो मीटरचा पल्ला पाच दिवसात गाठून एक उंच्चाक निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. ध्येय निश्‍चित असले की यश नक्कीच मिळत असते. हे जस्मीतने आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. चाँदबिबी मार्निंग ग्रुपसाठी ते एक ऑयडॉल आहेत, अशा शब्दात त्यांनी जस्मीत वधवा यांचे कौतुक केले.

      दिल्ली ते मुंबईदरम्यान १ हजार ४६० किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पुर्ण करुन शहरात आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

     याप्रसंगी जस्मीत वधवा म्हणाले, कठोर परिश्रम, जिद्द व नगरकरांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करु शकल्याचे सांगून, पुढील ध्येय काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल राईडचा संकल्प व्यक्त केला. तर नगरमधून पुढील जी टू जी सायकल राईडसाठी पाच सायकलपटू पाठविण्याचा मानस व्यक्त केला आहे. या सत्कारामुळे पुढील संकल्पही पुर्ण होण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पर्यावरणाच्या लढाईत  दिशादर्शक  कार्य 


 पाशा पटेल : पाशा पटेल यांची सतीश गुगळे यांच्या ‘बांबू हाऊस’ला भेट 

     वेब टीम नगर : बुरुडगांव रोड येथे राहणारे शिक्षक सतीश गुगळे यांच्या बांबू हाऊसची ख्याती आता राज्य आणि देश पातळीवर पोहचली आहे. बांबू वापरुन स्वस्तात दुमजली घर बांधता येते, हे पाहून अनेकजण आश्‍चर्य चकित झाले. अशा प्रकारची पर्यावरणपूरक घरे बांधली गेली तर खर्च तर वाचेलच शिवाय बांबूला मागणी वाढेल. माजी आमदार व राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय पाशा पटेल यांनी सतीश गुगळे यांच्या बांबू हाऊसला सदिच्य भेट दिली व त्यातील बारकावे समजून घेतले.

     लोखंडी सळ्यांऐवजी आरसीसी बांधकामातील बांबूचा वापर, सोबत कॅविटी वॉल वीट काम, बायोगॅस प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग,25% सिमेंटचा कमी वापर, नैसर्गिक पीओपी, चुन्याचा वापर, नियमित बांधकाम खर्चामध्ये ३० ते ४० टक्के बचत सोबतच बांबूच्या वापरामुळे पर्यावरणाचा प्रदूषण कमी करण्यासाठी, कार्बन डायॉक्साईड कमी करण्यासाठी, उर्जेची बचत करण्यासाठी लोखंडाला पर्याय उपलब्ध होत असल्याने देशातील सर्वसामान्य व्यक्तींसाठी शासनाच्या इंदिरा आवास मॉडेलला  एक वेगळा पर्याय बांबूच्या घराच्या रुपाने याठिकाणी मिळू शकतो हे निदर्शनास आल्याने पाशा पटेल हे खूपच प्रभावित झाले. आणि त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व आत्मीयतेने बांबू हाऊस चा विषय समजून घेतला.

     यावेळी अतुल देऊळगावकर या पर्यावरणात काम करणार्‍या लेखकास त्यांनी प्रत्यक्ष फोन लावून व्हिडिओ कॉल करून  बांबू हाऊस दाखविले. पुढील भविष्यामध्ये  बांबू संवर्धन या देशव्यापी उपक्रमांमध्ये आपण मिळून काम करू या असे आश्‍वासन पाशा पटेल यांनी सतीश गुगळे यांना दिले .

     याप्रसंगी पाशा पटेल म्हणाले, बांबू हाऊस ’कल्पतरू’ अहमदनगर खूप ऐकून होतो .आज प्रत्यक्षात घराला भेट देण्याचा योग आला .घर बांधतानाची जिज्ञासा, बांबूचा उपयोग बांबूचा टिकाऊपणा, लॉरी बेकर्सच्या पुस्तकातील उतार्‍यांचा उपयोग कौशल्याने प्रत्यक्षात उतरलेला पाहून मनस्वी आनंद झाला. अशी ध्येयवेडी माणसेच समाजाचा व देशाचं भलं करू शकतात. देशातील पर्यावरणावर काम करणार्‍या सर्व तज्ञांनी या शिक्षकाला भेटावे असे मला वाटते. पर्यावरणाच्या लढाईत आपण दिशादर्शक म्हणून कार्य करत असल्याचे सांगून कौतुक केले.

     यापूर्वीही इस्त्रोचे संशोधक धनेश बोरा, पुण्याचे आर्कि.रवी गर्दे, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे प्रतिनिधी सुहास चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपसंचालक राजेंद्र चव्हाण, राजस्थानमधील आदर्शगांव पिपलांत्री गावचे सरपंच शामसुंदर पालिवाल आदिंसह सुमारे 10 लोकांनी या बंबू हाऊसला भेट दिली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ.  बाळासाहेब विखेंचे शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील कार्य स्मरणात राहील :प्रा.सुनिल कल्हापुरे

   वेब टीम नगर : समाजात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात काही स्वत:साठी जगतात तर काही दुसर्‍याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपले जीवन पणाला लावून जगतात. पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन देखील देशाच्या जडण-घडणीत व सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य, शेतकरी तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून सर्वांच्या स्मरणात राहिले, त्यांच्या या आठवणी वृक्षाच्या रुपाने पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन संस्थेचे उपसंचालक (तांत्रिक) प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी केले.

     डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषी महाविद्यालयात डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन प्राणंगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी प्रा.कल्हापुरे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली, यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, प्राध्यापक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

     प्रा.कल्हापुरे पुढे म्हणाले, पद्मभुषण डॉ.विखे पाटील यांनी राजकारण, समाजकारण करीत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागात मोठे कार्य केले. शेतकरी व कष्टकरी समाजाला पत व प्रतिष्ठा प्राप्त करुन देऊन ग्रामीण अर्थकारण गतिमान करुन विकासासाठी सहकाराचे प्रारुप विकसित केले, त्यामुळे त्यांचे मोठे योगदान नगर जिल्ह्याला लाभले, असे ते म्हणाले.

     प्राचार्य डॉ.धोंडे यांनी स्व.विखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महाविद्यालयाच्यावतीने अभिवादन केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ.विखेंचे शैक्षणिक क्षेत्रात असलेले कार्य कोणीच विसरु शकत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून डॉ.विठ्ठलराव विखे फौंडेशनच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल अशी महाविद्यालये सुरु केल्याने विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला. पुढील पिढीला त्यांचे कार्य स्मरणात ठेवण्यासाठी पुण्यतिथी निमित्त परिसरात नारळाची ५० झाडे लावली ती जशी वाढतील तसे त्यांचे कार्य कायम लक्षात राहील, असे डॉ.धोंडे म्हणाले.

     यावेळी विद्यार्थ्यांनी आज केलेल्या या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. याबद्दल त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदागर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासकिय कारवाई कायम

विभागीय सह. निबंधक सहकारी संस्था, नाशिक प्राधिकरणाचा आदेश

    वेब टीम  नगर: अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अहमदनगर या संस्थेच्या ९ संचालकांनी राजीनामा दिल्याने गणपुर्ती होत नाही, या निकषावरवेळोवेळी सुनावणी होऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमनगर यांनी २३-१२-२०१९रोजी आदेश पारीत करुन संस्थेवर प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) नेमणुक केली होती. तेव्हा पासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे अधिक्षक के.के.आव्हाड हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात पदच्युद संचालक मंडळाने ज्ञानदेव पांडूळे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपिल दाखल केलेहोते. सदरच्या अपिलावर सुनावणी होवून, सहकार मंत्री यांनी प्राधिकृत अधिकारी नेमणुकीस तात्पुरती स्थगिती देऊन विभागीय सहनिबंधक, नाशिक विभाग, नाशिक यांनी ३महिन्यांत गुणवत्तेवर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांनी केलेली कारवाई कायम ठेवण्यात आली. त्याबाबतचा दि.२८/१२/२०२० रोजी प्राधिकरणाचा निर्णय जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाला.

     मंत्री, सहकार व पणन यांचे दि.१६/९/२०२० च्या आदेशाला संस्थेचे मानद सचिव प्रकाश भिमराज कराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन प्रधिकृत अधिकारी कायम ठेवणे कामी याचिका दाखल केली होती.

     विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक  यांनी आदेश दि.२२/१२/२०२० रोजी देऊन जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर यांचा प्राधिकृत अधिकारी नेमणुकीचा दि.२३/१२/२०२० चा आदेश योग्य ठरला आहे. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कायम राहिल्याने संस्थेचा राजीनामा दिलेले संचालक सर्वश्री रामकृष्ण करडिले, विठ्ठलराव गुंजाळ, छगनराव काळे, बाप्पासाहेब बोडखे, रमेशराव कराळे, राजेंद्र म्हस्के, भाऊसाहेब हारदे, सविता बोठे, सोपानराव मुळे व काशिनाथ डोंगरे यांनी दिलेले राजीनामे कायम झाल्याने गणपुर्ती होत नाहीत हे सिद्ध झाले आहे. या कामी संस्थेचे मानद सचिव प्रकाश कराळे यांनी मंत्री, सहकार व पणन, विभागीय सहनिबंधक नाशिक, यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच अ‍ॅड.एम.बी.आंबेकर व अ‍ॅड.अजित वाडेकर यांनी प्रतिवादीच्या वतीने काम पाहिले.

     या निर्णयाचे संस्थेचे संस्थापक मानद सचिव प्रकाश कराळे यांनी स्वागत केले असून, सहकारात कायदे व कानून पायदळी तुडविण्याच्या व दबावाच्या राजकारणाला पायबंद बसेल असे नमूद केले आहे. त्याचबरोबर संस्थेवर दि.२३/१२/२०१९ पासून प्रशासक असल्याने संस्थेच्या ठेवीत सुमारे 2 कोटीची वाढ झाली असून, यापुढेही संस्था हितासाठी प्राधिकृत अधिकारी के.के.आव्हाड यांना साथ देऊन संस्थेचे वसुली व दैनंदिन कामकाज गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे. शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच या संस्थेची निवडणूक पार पाडली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुक घेणेकामी कार्यवाही होणार असल्याचे मानद सचिव प्रकाश कराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी होणार अभिवादन, पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन
दारात विवेकाचा दिवा लाऊन सावित्री उत्सव साजरी करु या
- स्वागताध्यक्ष अविनाश घुले

    वेब टीम नगर- कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून, काळजी घेवून नवीन वर्षातील पहिला सण म्हणून सावितीबाई फुले यांची जयंती सावित्री उत्सव म्हणून साजरा करतांना सावित्री अभिवादन, सावित्री-फातिमा पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम होणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा असल्याने घरी गोडधोड स्वयंपाक करून, महिलांनी कपळावर चिरी (आडवे कुंकू ) लाऊन आणि सायंकाळी दारात रांगोळी काढून विवेकाचा दिवा लावून साजरा करावा, असे आवाहन सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष अविनाश घुले व विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले यांनी केले.

         विचारधारा, मातृसंघटनाराष्ट्र सेवादल व जिज्ञासा अकादमीच्या वतीने होत असलेल्या सावित्री उत्सवाचे विविध कार्यक्रम अहमदनगरमध्येहोत आहे. या निमित्ताने रावसाहेब पटवर्धन स्मारकातहोणारा अभिवादन सोहळा सकाळी नऊ वाजता होणार आहे व खूप गर्दी होऊ नये व सर्वांना अभिवादन  करता यावे म्हणून ९ ते १२ वाजेपर्यंत एका एका कुटुंबाने येऊन या वेळेत अभिवादन करण्याची विनंती करण्यात आली आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ बाबा आरगडे असून थोर सामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई आपटे यांचे चिरंजीव  भालचंद्र आपटे यांच्या हस्ते उद्ाटन होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटक बापू जोशी, सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. सुचिताताई धामणे, पटवर्धन स्मारकाच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, सामाजिक कार्यकर्ता युनूसभाई तांबटकर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

         यावेळी संजय रेंदाळकर, रेश्मा खाडे, प्रणीता वारे यांनी संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या छायाताई फिरोदिया, शारदाताई पोखरकर, सत्यभामा शिंदे, डॉ. निशात शेख, मनीषाताई बनकर या सावित्रीच्या लेकींचा सावित्री फातिमा पुरस्काराने सन्मान होईल. आपल्या आपल्या घरी नवीन वर्षातील सण महिलांनी विवेकाचा दिवा लावून साजरा करावा असे आवाहन शिवाजी नाईकवाडी, संगीताताई गाडेकर, गोविंद आडम, अनघा राऊत,  विवेक पवार, श्रीकांत वंगारी, पियुष मंडलेचा, तारिक शेख, आंबदास कोडम, राजेंद्र बुलबुले, त्रिशाली तोटा आदींनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

युवक बिरादरीच्या युवकांना घडवण्याच्या कार्याला तोड नाही

 प्रा. शिरीष मोडक : राज्यस्तरीय युवा सांसद स्पर्धा प्रशिक्षण शिबिरास सारडा महाविद्यालात सुरवात

वेब टीम नगर : आपला भारत देश आता युवकांचा देश झाला आहे. युवक बिरादरीच्या माध्यमातून संपूर्ण देशातील युवकांना प्रशिक्षण देवून चांगले युवक घडवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य होत आहे. या कार्याला तोड नाही. युवकांनी व विद्यार्थांनी युवक बिरादरी कडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा व  प्रशिक्षणाचा जास्तीतजास्त लाभ घेवून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करून भारताचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.

          युवक बिरादरीच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने होणाऱ्या युवा सांसद या राज्यस्तरीय स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबाराचे आयोजन नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयात करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष स्थानावरून प्रा. शिरीष मोडक बोलत होते. यावेळी मंडळाचे सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, डॉ. पारस कोठारी, युवक बिरादरीचे जिल्हाध्यक्ष के.के.आव्हाड, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, बी.यू. कुलकर्णी, सचिन मुळे आदींसह युवक बिरादरीचे पदाधिकारी उपस्तीत होते.

यावेळी के.के. आव्हाड म्हणाले, स्वतःसाठी न जगता इतरांसाठी काम करतो तो जगण्याचा खरा आनंद घेत असतो. युवक बिरादरी युवकांना इतरांसाठी जगण्याचे प्रशिक्षण देत आहे. ज्याच्याकडे आत्मविशवास आहे तो जगात कधीही कोठेही कमी पडत नाही. त्यामुळे स्पर्धेत भाग घेतांना पूर्णपणे सकारात्मक आत्मविश्वासाने उतरा.

          ब्रिजलाल सारडा म्हणाले, पद्मश्री क्रांती शहांच्या कामांनी प्रभावित होवून युवक बिरादरीच्या स्थापने पासून या कार्यात मी सहभागी होतो. त्यावेळी युवक काँग्रेस व युवक बिरादरी एकत्रच काम करत होते. विविध भागात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृतीचे काम केले. तेच काम अजूनही पुढे चालू असल्याचे पाहून मला आनंद होत आहे.

          कार्याक्रमचे सुत्रसंचलन जिल्हा संघटक सुनील साळवे यांनी केले. बी.यू. कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा संघटक भरत कुंकूलोळ, उपाध्यक्ष प्रमोद पत्की, प्रशिक्षक पंकज इंगोले, अमेय पाटील आदींसह महाविद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वकील संघटनेचा दिनदर्शिकेचा उपक्रम  स्तुत्य : न्या. श्रीकांत आणेकर

वेब टीम नगर : जिल्हा न्यायालयात शहर वकील संघटनेचे उत्कृष्ठ काम चालू आहे. वर्षभर राबलेल्या विविध उपक्रमांची माहिती, फोटो असलेली सुंदर व सुबक दिनदर्शिका तयार करून प्रकाशन करण्याचा स्तुत्य उपक्रम बार असोशिएशन दरवर्षी राबवत आहे. आलेले या वर्षात करोना मुक्त होवून सर्वकाही सुरळीत होवून पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा नव्या वर्षा कडून आपण करू. सर्व वकिलांनी या दिनदर्शिकेनुसार चांगले काम करून नगरच्या बारचे नाव अधिक उंचवावे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी करून सर्व वकील व न्यायाधीशांना नव्या २०२१ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

         नवीन वर्षाच्या शुभारंभानिमित्त जिल्हा न्यायालयात शहर बार असोशिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या २०२१ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या झाले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, उपध्यक्ष ॲड. सुहास टोणे, सचिव ॲड.. अमोल धोंडे, महिला सचिव ॲड.. मिनाक्षि कराळे, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, लॉयर्स सोसायटीचे अध्यक्ष  ॲड.. नानासाहेब पादीर, सचिव ॲड.. रफिक बेग, माजी अध्यक्ष ॲड.. शिवाजी कराळे, ॲड. युवराज पाटील, ॲड. सुनील तोडकर, ॲड.. संदीप म्हस्के आदींसह कार्यकारणी सदस्य, उपस्थित होते.

       प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, या २०२१ वर्षात करोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे व न्यायालयीन कामकाज पूर्वी प्रमाणे व्हावे. वकील संघटनेच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सलग दुसऱ्या वर्षी माझ्याकडे आली आहे.  सर्व वकिलांच्या सहकार्याने तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने ॲड.जिल्हा  न्यायालयात विविध उपक्रम राबावले आहेत. या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती व फोटो असलेली तसेच उच्चन्यायालयाने जाहीर केलेल्या सूचना, विधिसेवा प्राधिकरणाने जाहीर केलेल्या सूचना व सुट्यांची सविस्तर माहिती असलेली ही २०२१ वर्षाची सुंदर दिनदर्शिका तयार आली आहे. सर्व वकील बंधू भगिनींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच पहिल्याच दिवशी ही दिनदर्शिका देतांना आनंद होत आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिव्यांग व्यक्तीस अपमानास्पद वागणूक, शोषण, गैरवर्तणूक केल्यास कलम 92 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी


 दिव्यांग व्यक्तींच्या 2016 नुसार कायद्याची अंमलबजावणी करण्याची जन आधार सामाजिक संघटना प्रणित दिव्यांग सेलची मागणी         

वेब टीम नगर : केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक व त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहण्यासाठी दिव्यांग अधिकार कायदा २०१६पारित केला असून देशातील सर्व राज्यांमध्ये भारत राज्यपत्र अन्वये दि. १९/४/२०१७  पासून अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे या कायद्यात कलम९२नुसार दिव्यांग व्यक्तीस अपमानास्पद वागणूक, दिव्यांगाचे शोषण, गैरवर्तणूक आदीनुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे परंतु याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी व दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देण्यात यावा याकरिता जन आधार सामाजिक संघटनेच्या प्रणित दिव्यांग सेल  वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका संघटक विजय वाळके, अहमदनगर जिल्हा अपंग सेलचे अध्यक्ष सोमनाथ पवार, शहराध्यक्ष शहानवाज शेख, मच्छिंद्र गांगर्डे, शिवाजी कुंदनकर, दीपक गुगळे, अमित गांधी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण द्या ,अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था सुरु करा   

  दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने                                                                              

वेब टीम नगर : मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण द्यावे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनं करून करण्यात आली यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील समवेत जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष सलीम सय्यद, नागेश वायदंडे, रफिक शेख, चंद्रकांत सकट, विशाल भालेराव, सुलोचना बहिरट, मंदाकिनी मेगाळ, रंगनाथ वायदंडे, संजय साळवे, दत्ता शेलार, बंडू पाडळे, नवनाथ उकिरडे, बाबासाहेब शिंदे, बबनराव डोंगरे, भीमा डोंगरे, शांताराम मधे, लक्ष्मण मधे, बाळू मधे, दगडू भले, नाना कांबळे, अविनाश लोंढे, मच्छिंद्र नेटके, सुरज राजगुरू, किरण जावळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.                               
राज्यात मातंग समाजाची सुमारे ७० लाखांहून अधिक संख्या आहे त्यामुळे अनुसूचित जातीतील १३ टक्के आरक्षण पैकी ७ टक्के आरक्षण मातंग समाजाला द्यावा व मातंग समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही दलित समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दीडशेपेक्षा अधिक योजना मंजूर केल्या आहेत परंतु सदर योजनेचा लाभ आरक्षणातील प्रमुख जातींनी घेतला आहे म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन त्याचे अ.ब.क.ड. अनुसार वर्गीकरण करण्यात यावे अनेक वर्षापासून राज्यातील अनेक संघटना आरक्षणासाठी विविध स्वरूपाचे आंदोलन करत आहेत बीड जिल्ह्यातील केज येथील मातंग समाजाच्या संजय ताकतोंडे या युवकाने मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेऊन आपले जीवन संपविले विविध अनेक संघटनांनी मोर्चे काढले परंतु सरकार मातंग समाजाची दखल घेण्यास तयार नाही त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जातीतील एकूण ५९जातीचे अ.ब.क.ड.अनुसार वर्गीकरण करण्यात यावे बार्टीच्या धरतीवर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी जेणेकरून मातंग समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि अनुसूचित जातीतील सर्वांनाच याचा फायदा होईल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सुरू करण्यात यावे यामध्ये २०१४ साली चारशे कोटीचा भ्रष्टाचार झाला त्यानंतर हे महामंडळ बंद करण्यात आले त्याच वेळी अन्य एका खात्यात दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार होऊन ते खाते बंद करण्यात आले नाही असा दुजाभाव सरकार करत आहे तरी सरकारने त्वरित अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करून हजार कोटीचे भागभांडवल देण्यात यावे व राज्यातील सर्व मागासवर्गीय व आदिवासी विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी   

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन    

 वेब टीम नगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.  पक्षाच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी कोणत्यातरी विरोधकांने षडयंत्र करून सदरील महिलेला पुढे करून अत्याचार सारख्या गंभीर गुन्हा दाखल करायला लावला आहे सदरील महिलेने तिच्यावर ज्यादिवशी अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले त्यादिवशी महेबूब शेख हे मुंबईत होते असे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे तसेच जर काही खोटे असेल तर शेख व सदर महिलेची नार्को टेस्ट करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली यावरून स्पष्ट होते की विरोधकांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षड्यंत्र रचण्यात आलेले आहे महबूब शेख हे अति सामान्य कुटुंबातून स्वतःच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर पोहोचले आहे म्हणून त्यांच्या चांगल्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम या महिलेच्या मार्फत करण्यात येत आहे तरी हा खोटा गुन्हा मागे घेऊन या महिलेमागे कोण आहे याचा तपास लावून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केली यावेळी युवकचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग, संतोष आघाव, संगमनेर तालुका अध्यक्ष अक्षय भालेराव, राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, ताहेर पटेल, चंद्रकांत मरकड, नितीन धांडे, शरद शिंदे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम कळमकर, चारुदत्त शिंगर, सचिन पवार, रवी मालुंजकर, धीरज पानसंबळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षण विभागाशी संबंधित  प्रश्‍नाचे  ना. बच्चु कडू यांना निवेदन 

बाबासाहेब बोडखे : शिक्षकांची संच मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे, सातवा वेतन आयोगाप्रमाणे सुधारित आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ आदी   प्रश्‍न उपस्थित

वेब टीम नगर : शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्‍नाच्या अनुषंगाने मुंबई येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांची बैठक पार पडली. यामध्ये शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी संच मान्यता, शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित आश्‍वासित प्रगती योजना लाभ मिळण्यासह शिक्षकांच्या इतर प्रश्‍नांचे मुद्दे उपस्थित करुन सदर प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन ना. बच्चू कडू यांना देण्यात आले. तर  दोन वर्षाच्या प्रलंबित असलेल्या संच मान्यतेने मुंबईतील सुमारे दोन हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती वर्तवून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुंबईतील अनुदानित शाळांची संचमान्यता वेगळी करण्याची मागणी केली शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष शिवनाथ दराडे यांनी आग्रही मागणी केली असल्यची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शैक्षणिक सत्र२०१३-१४ पासून ऑनलाइन पद्धतीने संच मान्यता देणे सुरू झाली. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली माहिती सादर करताना फार मोठ्या प्रमाणात त्रुटी उणिवा राहिल्या आहेत. शिक्षणाधिकारी स्तरावर त्रुटी न सुधारता पाठविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात चुकीच्या पध्दतीने संच मान्यता देण्यात आल्या आहेत. या चुकीच्या संचमान्यतांची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार अपील करण्यात आली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या संच मान्यतेची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्य अटी रद्द करून सर्व शिक्षकांना१२/२४ वर्षांच्या सेवेनंतर सरसकट विनाअट वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी पदोन्नती समजून देण्यात यावी, यासाठी दि.५सप्टेंबर २००७ चा शासन निर्णय रद्द करून शिक्षकांना १२/१४ वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी पदोन्नती समजून देण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतना बाबत कार्यवाही करणे, नियमित वेतन होतील त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, शालार्थ आयडी बाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्या, अनुदान वितरण आदेश निर्गमित करण्यात यावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासह खाजगी, अनुदानित शिक्षण संस्थांमधील सेवा निवृत्ती विषयक प्रलंबित प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बाबा बोडखे यांनी म्हंटल आहे.  


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सैनिक कुटुंबीयांच्या तक्रारीची पोलीस यंत्रणा दखल घेत नसल्याचा आरोप

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन : सैनिक कुटुंबियांच्या प्रश्‍नांसाठी केंद्रीय  न्यायमंत्री ना. आठवले यांना निवेदन

वेब टीम नगर : देशसेवेचे कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची पोलीस स्टेशनला तक्रारीची दखल घेतली जात नाही. सैनिक कुटुंबियांना जागेच्या वादातून धमकावण्याचे प्रकार होत आहे. ही बाब गंभीर असून त्यादृष्टीने केंद्र सरकारने उपाययोजना करण्याच्या मागणीचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांना देण्यात आले.

ना. आठवले नुकतेच नगरमध्ये आले असता जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी त्यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न मांडला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब देशमाने, संतोष शिंदे, भगवान डोळे, अ‍ॅड.संदिप जावळे, खंडेराव लेंडाळ, हरिदास भाबड, जनार्धन जायभाये, सिध्दार्थ सिसोदे, रामकृष्ण काकडे आदि उपस्थित होते.     देश रक्षणाचे कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांना जागा व इतर वादातून त्रास देण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच उत्तर प्रदेश मधील फरीदपूर (जि. बरेली) येथील भारतीय लष्करातील जवान देवेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांच्या लगत असलेल्या जागेत मोठे खोदकाम करुन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सध्या देवेंद्र कुमार भूतान येथे देश सेवेसाठी कार्यरत आहे. सदर जवानाचे कुटुंबीय पोलीस स्टेशन व बरेली येथील पोलीस अधिक्षकांची भेट देखील घेतली. मात्र जवानाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. देश रक्षण करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांच्या तक्रारी दखल घेऊन त्यांचा पोलीस यंत्रणेने देखील सन्मान केला पाहिजे असल्याचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

फरीदपूर (जि. बरेली) येथील भारतीय लष्करातील जवान देवेंद्र कुमार यांच्यासह देशातील अनेक जवानांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी केंद्र स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अ.भा.किसान सभेचे जत्थे रविवार पासून दिल्लीकडे रवाना

वेब टीम नगर : शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील महिन्याभरापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेण्यास केंद्र सरकार तयार नाही. या आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेने दिल्ली येथे जाऊन आंदोलनास सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवार दि.३ जानेवारी रोजी नागपूर येथून वाहनाचे जत्थे दिल्ली येथील आंदोलनात पाठविण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातून कॉ. लांडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, एल.एम. डांगे, बापूराव राशिनकर, आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डांगे व सेक्रेटरी कॉ. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी नागपूरहून दिल्लीकडे जाणार आहे.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व विविध संघटनांच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनास पाठिंबा देऊन स्थानिक पातळीवर आंदोलने करण्यात आली होती. मात्र दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलना बाबतीत केंद्र सरकारची हटवादी भुमिका पहाता हे आंदोलन किती काळ चालणार? हे अनिश्‍चित असून, शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. आता देशातील सर्व राज्यातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहचत असताना अखिल भारतीय किसान सभेने या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्राहक पंचायतीची आता विषयनिहाय जागृती...

१२ तज्ज्ञांची केली नियुक्ती

वेब टीम नगर : ग्राहकांचा नेहमी संबंध येणाऱ्या विविध विषयांची तज्ज्ञांद्वारे जनजागृती करण्याची नवी संघटनात्मक रचना अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. सायबर क्राईम, बांधकाम, बँक व्यवहार, कृषी, वैद्यकीय-आरोग्य, विधी व न्याय, उर्जा-महावितरण, महिला संघटन, शिक्षण, प्रवासी अशा १२ विषयांच्या तज्ज्ञांच्या मदतीने त्या-त्या विषयाची जनजागृती तसेच त्या-त्या विषयातील ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणुकीची मोहीम यापुढे ग्राहक पंचायतीद्वारे राबवली जाणार आहे.

(स्व.) बिंदू माधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून देशभरात उभी केलेली ग्राहक जनजागृती चळवळ आता विकेंद्रीकरणातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन झाले आहे. पूर्वी ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणीच ग्राहकांचे सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यात कार्यरत होती. आता याच जिल्हा कार्यकारिणीच्या मदतीला ग्राहकांशी संबंधित विविध विषयांच्या तज्ज्ञांची टीम असणार आहे. या तज्ज्ञांद्वारे त्या-त्या विषयात होत असलेल्या बदलांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासह त्या विषयातील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यालाही चालना दिली जाणार आहे.

नगर जिल्ह्याच्या स्तरावरही आता जिल्हा कार्यकारिणीसमवेत १२ तज्ज्ञांची स्वतंत्र समिती केली गेली आहे. अशी रचना महाराष्ट्र प्रांत स्तरावरही केली गेली आहे. प्रांत स्तरावर १० जिल्हे व २ महानगरांच्या स्तरावर अशा समित्या करण्यात आल्या असून, भविष्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात अशीच समिती रचना असणार आहे. त्यानंतर प्रांत स्तरावरून जिल्हा व तालुका स्तरावरील अशा समित्यांच्या समन्वयातून विविध ठिकाणच्या ग्राहकांची जनजागृती, समस्यांचे संकलन व सोडवणूक मोहीम राबवली जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील अशा विषय तज्ज्ञांच्या जिल्हा प्रतिनिधींची समिती अशी-1) सायबर क्राईम व बॅंक समिती- दिनेश थोरात (संगमनेर, मो.नं.- 9766074467). 2) प्रबोधन समिती-शाहूराव औटी (पारनेर. मो. नं. -9890875099). 3) प्रसिध्दी समिती-श्रीराम जोशी (नगर, मो. क्र.-9822511133). 4) ग्राहक संरक्षण फुड,ड्रग व वजन माप समिती- नकुल चंदे (नगर, मो नं.9423792984). 5) कृषी समिती-हरिभाऊ चौधरी (पारनेर, मो. नं.9545449441). 6) वैद्यकीय व आरोग्य समिती:- डॉ.प्रसन्नकुमार खणकर ( नगर, मो. नं.-9822785554) 7) विधी व न्याय समिती- ॲड . आदिनाथ बाचकर (नगर-मो.नं.7972450700) 8) महिला जिल्हा संघटन समिती:- सुचेता कुलकर्णी (नगर, मो नं.9922580779). 9) ऊर्जा व महावितरण-अशोक शेवाळे (शेवगाव, मो. नं.९४०५२१७९०१.) 10) प्रवासी जिल्हा संघटन- रामकृष्ण थोटे (नेवासे, मो नं 9527705445). 11) बांधकाम जिल्हा संघटन समिती- गिरीश अग्रवाल (नगर, मो नं 99 22112244). १२) शिक्षण विषयक संघटन समिती- जालिंदर आहेर (पारनेर, मो. नं. 7709134316)

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची नवी नगर जिल्हा कार्यकारिणी अशी- जिल्हाध्यक्ष-विलास जगदाळे (नगर, मो - 9765986601), जिल्हा उपाध्यक्ष- अमिता कोहली (नगर, मोबा-9271564076), जिल्हा संघटक- अतुल कुऱ्हाडे (नगर, मोबा - 9420642021), जिल्हा सचिव-सुरेश राहाणे (संगमनेर, मोबा-9767063100), जिल्हा कोषाध्यक्ष- सीताराम बोरुडे (पारनेर मोबा- 9860356971) जिल्हा कार्यकारिणी सदस्य - बन्सीधर आगळे (शेवगाव, मोबा- 9270769746).

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------




Post a Comment

0 Comments