स्वागत २०२१ चे संकल्प नववर्षाचे

 स्वागत २०२१ चे संकल्प नववर्षाचे 

                                नगरटुडे च्या सर्व वाचकांना
                              नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

प्रिय वाचक ,

सरत्या वर्षाच्या शेवटी कटू स्मृतींना अलविदा म्हणून नववर्षाची  सुरवात नव्या उमेदीने करायची आहे. सरत्या वर्षातील कोरोना प्रादुर्भावाच्या कटू स्मृतींना नववर्षाच्या स्वागताने धीरोदात्त पणे निरोप देतांना  आम्ही आमच्या वाचकांसाठी सर्व प्रथम दिर्घायूरारोग्याची ईश्वर चरणी मागणी करून काही नवीन संकल्प करत आहोत . 

नवीन वर्षात सर्वप्रथम आपल्या अंगी रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी योग्य साधना हे सदर सुरु करत आहोत. ज्यात प्राणायामा पासून निरनिराळी योगसन कशी करावी याची सविस्तर व सचित्र माहिती देणार आहोत जेणेकरून आपली प्रत्येक सकाळ प्रसन्नतेनं सुरु व्हावी हाच आमचा उद्देश आहे. आरोग्याचा मार्ग प्रामुख्याने आपल्या पोटातून जातो त्यासाठीच पौष्टिक आणि रुचकर असे पदार्थ आणि त्यांच्या कृती गेल्या वर्षातही आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवल्या तेच सदर " आरोग्य आहार " आता काहीश्या नव्या स्वरूपात वाचकांना देणार आहोत.यात प्रामुख्याने ऋतूंप्रमाणे आपणं कोणता घ्यावा या बद्दल मार्गदर्शन करतायेत आहार तज्ञ अनुपमा जोशी. 

 ऋतूमाना प्रमाणे  काही आजार हजेरी लावत असतात त्यावर घरगुती उपायांपासून आयुर्वेदातील चिकित्सा पद्धतीनुसार आधुनिक औषधींची माहिती माहिती देत आहेत वैद्य.मंदार भणगे.या व्यतिरिक्त कायदे विषयक सल्ला देणार सदर वाचकांच्या दिमतीला असणार आहे. या व्यतिरिक्त वाचकांच्या आवडीनुसार आणि मागणी नुसार काही सदरं सुरु करण्याचा आमचा मानस आहे त्यातही प्रामुख्याने रोजगाराच्या संधी आणि रोजगार निर्मिती या मुद्द्याला प्राधान्य राहणार आहे. अर्थात हि सर्व सदरे जानेवारीच्या मध्या पर्यंत सुरु होतील. 

वेब पोर्टल म्हंटल्यावर  ताज्या घडामोडी आणि विशेष बातम्या यातर आवश्यकच आहेत. म्हणूनच सकाळच्या सत्रात वरील सदरांसोबत काही ताज्या घडामोडी आणि " नगरटुडे बुलेटिन " अश्या लिंक्स आपल्या पर्यंत पोहोचवू आणि सायंकाळच्या सत्रात ताझ्या घडामोडींच्या काही लिंक्स आपल्या पर्यंत पोहचतील " नगरटुडे " या गेल्या वर्षी  सुरु केलेल्या वेब पोर्टलने  चांगलाच बाळसं धरलं आहे. असाच उदंड प्रतिसाद या पुढील काळातही आपल्याकडून अपेक्षित आहे. या प्रवासात आपण वाचक आणि वेब पोर्टल  चालवण्यासाठी आर्थिक रसद पुरवणारे आमचे जाहिरातदार यांचे आभार मानल्या शिवाय हे संकल्पपत्र पूर्ण होत नाही . म्हणून त्या सर्वांचे आभार . 

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 

          

Post a Comment

0 Comments