कोरेगाव भीमा परिसरात ४ दिवस संचार बंदी

 कोरेगाव भीमा परिसरात ४ दिवस संचार बंदी 

वेब टीम पुणे : कोरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच जय स्तंभाजवळ कुठलीही सभा घेण्यास परवानगी नाही. आजूबाजूच्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स लावता येणार नाही.

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

दरवर्षी हजारो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे एकत्र येतात. पण यंदा अनुयायांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच मास्क लावणे बंधनकारक असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल्स आणि जाहीर सभा घेण्यावरही बंदी आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण 1 जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments