इंग्लंडहून अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होणार

 इंग्लंडहून अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होणार

नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

वेब टीम नगर : इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, दिनांक २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून माहिती देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासन आणि राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील १३ नागरिक इंग्लंडहून जिल्ह्यात आले असून यातील ११ जण नगर शहरातील असून उर्वरित दोघे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील दोघांपैकी एक जण अद्याप मुंबई येथे आहे. दुसरा प्रवाशी पुणे येथे असून त्याची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. या चाचणी मध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एन.आय.व्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळता-जुळता आहे का, याची माहिती मिळेल.

जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल.

या प्रवाशांपैकी जे आरटीपीसीआर पॉझिटिव्ह येतील त्यांना इतर कोविड १९ रुग्णांपेक्षा वेगळ्या आयसोलेशन विभागात भरती करण्यात येईल. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वाना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासीतांना ते पॉजीटिव्ह रूग्नाच्या संपर्कात आल्यापासून ५ व्या ते १० व्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.

जिल्ह्यात २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरुन दाखल झाले आहेत त्यांनी स्वत: तून जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे. 

Post a Comment

0 Comments