राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

 राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश 

वेब टीम मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ॲमेझॉन यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ॲमेझॉन कोर्टात गेल्यानंतर मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे सचिवांना नोटीस पाठवली. या प्रकरणी 5 जानेवारील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी मनसे नेते अखिल चित्रे यांना सुद्धा 19 डिसेंबरला अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती.

मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनने विविध ठिकाणी लावलेले पोस्टर फाडले होता. यामुळे ॲमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

मनसे-ॲमेझॉनमधील वाद

ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास ॲमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने ॲमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अ‍ॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात ॲमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंना नोटीस बजावण्याची किंमत अ‍ॅमेझॉनला मोजवी लागणार : अखिल चित्रे

राज ठाकरेंना यांना पाठवलेल्या नोटीसवर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, "मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून अ‍ॅमेझॉनला उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्रात व्यवसाय करत असल्याचं अ‍ॅमेझॉनने विसरु नये.अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी आम्ही नक्कीच पाजणार. अ‍ॅमेझॉनने खटले दाखल करण्याचा महाराष्ट्रात प्रयोग सुरु केला आहे. याआधी 19 डिसेंबरला मलाही नोटीस पाठवली होती. अ‍ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्याचं जे दु:साहस केलं आहे त्याची किंमत येत्या दिवसात नक्कीच मोजावी लागणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसला आम्ही फारशी किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही प्रकारचे खटले अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं."


Post a Comment

0 Comments