व्यापाराने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या ; विरहाने भावानेही सोडले प्राण

 व्यापाराने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या ; विरहाने भावानेही सोडले प्राण 


वेब टीम अमरावती :  व्यापाऱ्यांने संत्र्याचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यानं राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून आत्महत्या केली.तर छोट्या भावाच्या आत्महत्येचा दुःखामुळे मोठ्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यानेही प्राण सोडला. एकाच वेळी घरातील कर्ती माणसं गेल्यानं भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंजनगाव सूर्जी तालुक्यातील भुयार कुटंबाला एकाच दिवशी दोन्ही भावंडांना निरोप द्यावा लागला.

बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकरी अशोक भुयारी यांनी काल (२२ डिसेंबर) आत्महत्या केली. अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील संत्रा उत्पादक अशोक भुयार यांनी विष प्राशन करुन जीवन संपवलं. व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केलेला आहे. बच्चू कडू यांच्याकडे भुयार यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून केली आहे.

भुयार यांच्या आत्महत्येनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला गावकऱ्यांनी घेराव घातला होता. ठाणेदार आणि बीट जमादारावर कारवाई करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अशोक भुयार यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहानपणापासून जपलेल्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का मोठे बंधू संजय भुयार यांना सहन झाला नाही. अंत्यसंस्कारावरुन परत येत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. संजय भुयार यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments