नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

"आम्ही शिक्षक रक्तदान करणार" 

शहराध्यक्ष प्रसाद शिंदे : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन

वेब टीम नगर : राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन कास्ट्राईब शिक्षक संघटना अ.नगर शहर शिक्षकांच्या पुढाकारातुन अ.नगर मध्ये  रक्तदान शिबिर रविवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १०ते सायंकाळी ५ पर्यत आनंदऋषीजी रक्तपेढी अ.नगर येथे  आयोजित केले  जाणार असल्याने या माध्यमातून नगर शहरातील जिल्ह्यातील  सर्व शिक्षकांनी   पुढाकार घेऊन रक्तदान शिबीरासाठी उपस्थित राहून रक्तदान करावे.आणि राज्यातील रक्ताचा जो तुटवडा झाला आहे. रक्तदान करुन हातभार लावावा आणि असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे यावे ,शिक्षक नेहमीच अशा प्रसंगी पुढे असतात  आणि आणि ही एक सामाजिक गरज आहे .या माध्यमातून सर्व शिक्षकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य पार पाडावे असे मत रक्तदान शिबीर आयोजक  शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मांडले.तसेच इतर आजार असणाऱ्या शिक्षकांनी सहभागी होऊ नये अधिक माहिती संपर्क क्रमांक - ९४०५६३६६५६९

 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी नवोदय प्रवेश परीक्षा

विद्यार्थ्यानी प्रवेश अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा

वेब टीम नगर :  जिल्ह्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय येथे अनुक्रमे इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेश घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठीची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती.  इयत्ता पाचवीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत आता २२ डिसेंबरपर्यंत तर इयत्ता आठवीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) यांनी केले आहे.

            प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Ahmednagar/en/home/ आणि http://www.navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class/ या संकेतस्थळाचा वापर करावा. प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायद्याची त्वरीत अंमलबजावणी व्हावी

लहुजी शक्ती सेना : बिलोली येथील मुकबधीर मुलीवर अत्याचार करुन खून करणार्‍या आरोपींना फाशी द्या   

वेब टीम नगर: लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बिलोली (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलीचे बलात्कार करून तीचा निर्घुणपणे खून करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची व महाराष्ट्रात त्वरीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले.  

दि. ९ डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील झोपडपट्टी राहत असलेल्या २७ वर्षीय अनाथ आणि मुकबधीर मुलीवर बलात्कार करून, तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच महाराष्ट्रात महिलांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सहा  दिवसात पाणी प्रश्‍न न सोडविल्यास मंगळवारी तीव्र आंदोलन, भिंगार बंद ठेणार 

मतीन सय्यद : भिंगारच्या नागरिकांचा पाण्यासाठी छावणी परिषदेवर मोर्चा,रिकामे हांडे घेऊन महिलांची निदर्शने

वेब टीम नगर : भिंगार शहरात छावणी परिषद हद्दीत अकरा दिवसापासून पाणी न सुटल्याने नागरिकांनी छावणी परिषदेवर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात रिकामे हांडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी सर्व नगरसेवक व छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिकात्मक दगड ठेऊन त्याची पूजा केली व लवकरात लवकर पिण्यासाठी दररोज पाणी मिळण्यासाठी साकडे घालण्यात आले.

या मोर्चात संभाजी भिंगारदिवे, सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव, ईश्‍वर भंडारी, इब्राहिम चौधरी, निसार शेख, आसिफ शेख, मदिना शेख, नुरजहॉ शेख, गुलनाज सय्यद, अनुराधा भंडारी, शोभा भंडारी, ज्योती देवतरसे, सुशीला देवतरसे, राणी विधाते, कुसुम वागस्कर, नलिनी भिंगारदिवे, सुंदर भिंगारदिवे, सरिता पंडित, रोहिणी पंडित, नासिर शेख, अंजुम सय्यद, सलमान शेख, स्वप्निल पवार, हाजी आरिफ, अन्सार सय्यद, जाफर शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भिंगार येथील छावणी हद्दीत सुमारे अकरा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहेत. मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे हाल होत असून, सदर ठिकाणी पाण्याचे टँकर येत असले तरी हे टँकरमधून मोजक्या लोकांनाच पाणी वाटप केले जात आहे. प्रभागातील नगसेवक सांगेल तेथेच पाणी वाटप होत आहे. प्रभाग चार मधील बोअरवेल नादुरुस्त असल्याने, कॅन्टोन्मेंटचे पाणी नाहीच तर बोअरवेलचे पाणी मिळणे देखील अवघड झाले आहे. स्थानिक नागरिकांसह महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहे. छावणी परिषदेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता पैसे नाही, टेंडर झालेले नाही असे उडवाउडवीचे उत्तरे दिले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भिंगार शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न येत्या ६ दिवसात न सोडविल्यास मंगळवार दि.२२ डिसेंबरला तीव्र आंदोलन करुन भिंगार बंद ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद यांनी दिला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणे-शिर्डी खाजगी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचे प्रस्ताव

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन ,भारतीय जनसंसद : साईबाबा  मंदिर हे विश्‍व मानव मंदिर म्हणून गॅझेट प्रसिध्द करणार

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे-शिर्डी खाजगी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचे प्रस्ताव रविवार दि.२० डिसेंबरला हुतात्मा स्मारकात मांडण्यात येणार आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते या प्रस्तावाचे पूजन करुन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सदर मागण्यांचे निवेदन ई मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच यावेळी साईबाबांचे मंदिर हे विश्‍व मानव मंदिर म्हणून गॅझेट प्रसिध्द केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

शिर्डी येथील साईबाबा यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन माणुसकीचा धर्म आपल्या विचारातून समाजाला सांगितला. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर हे विश्‍व मानव मंदिर म्हणून सर्व समाजासमोर उभे आहे. सर्व धर्मिय भाविक येथे दर्शनास येत असतात. समाजामध्ये असलेली जाती-धर्माची तेढ संपवण्यासाठी साईबाबांचे विचार व शिकवण मार्गदर्शक आहे. बाबांच्या शिकवणीत देशाचे अखंडत्व टिकून असून, सर्व धर्माचा सार त्यांच्या विचारात आहे. समाजात समता, बंधुता निर्माण होण्यासाठी साईबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे-शिर्डी खाजगी लोकल रेल्वे सुरु झाल्यास भाविकांची सोय होऊन त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यास  मदत होणार आहे. तर विकासापासून वंचित राहिलेल्या नगर शहराला देखील व्यापाराच्या दृष्टीकोनातून एकप्रकारे चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेनपेक्षा ही रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची व प्रभावशाली ठरणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी आग्रही आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सांडवा फाटा ते मांडवा पर्यंतच्या रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

जन आधार सामाजिक संघटना :  नगर-जामखेडच्या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

वेब टीम नगर : नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडवा पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, युवक अध्यक्ष बापू खांदवे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, मनोहर खांदवे आदी उपस्थित होते.

नगर-जामखेड रस्त्यावरील सांडवा फाटा ते मांडवा दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सदर रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे असल्याने खड्डे चुकविताना वाहनांचे लहान-मोठे अपघात घडत आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा  त्रास सहन करावा लागत असून, जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या भागात असलेल्या खडी क्रेशरमुळे अवजड वाहनांची वाहतुक दररोज सुरु असल्याने देखील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मागासवर्गीयावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) : अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

वेब टीम नगर : निर्मलनगर येथील शिरसाठ मळ्यातील अलंकापुरी कॉलनीत राहत असलेल्या मागासवर्गीय (मातंग) कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, मंदा ठोकळ, संदीप ठोकळ, गौरव घोरपडे आदिंसह पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

निर्मलनगर येथील अलंकापुरी कॉलनीत मंदा अरुण ठोकळ अनेक वर्षापासून राहत आहे. या भागात एकच मागसवर्गीय (मातंग) समाजाचे घर आहे. मंगळवार दि.१५ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ठोकळ कुटुंबीयांच्या घरावर दिपक सावंत, तुषार थोरवे, गजानन सावंत आदिंसह आठ ते दहा व्यक्तींच्या टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केला. काही वर्षापासून सदर आरोपी व त्यांच्या मित्रांनी ठोकळ कुटुंबीयांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सातत्याने केले आहे. सदर भागांमध्ये खालच्या मागासवर्गीय जातीच्या लोकांनी शांत राहायचे, इतर कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही, असे सांगितले. सदर मागासवर्गीय एकच कुटुंब असल्याने ते घाबरून शांत बसले. परंतु मंगळवारी ठोकळ कुटुंबीयांच्या घरी बारशाचा कार्यक्रम सुरु असताना सदर आरोपींनी सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यासाठी शिवीगाळ करुन धमकावले. कार्यक्रम बंद न केल्याचा राग धरुन ठोकळ कुटुंबीयांवर लाठी-काठी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला.

सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ठोकळ कुटुंबीयांच्या सदस्यांना मारहाण करुन घराचे नुकसान केले. तर वाहने जाळण्यात आली. यामध्ये अरुण ठोकळ हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे भयभीत झाले असून, दहशतीचे वातावरण आहे. हा प्रकार जातीयद्वेषातून घडला असला असून देखील पोलीसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन घेतला नाही. सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आरपीआय व पिडीत कुटुंबीयांनी दिला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल त्वरीत जाहीर करा  

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासू) ची पुणे विद्यापीठाकडे मागणी

वेब टीम नगर : पुणे विद्यापीठयाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील ६विद्यार्थ्यांच्या निकालात आलेल्या अडचणी तातडीने सोडवून सुधारित निकाल त्वरित जाहीर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू), नाशिक विभागाकडून कुलगुरू डॉ. नितीन करमळ व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. महेश काकडे यांना निवेदन देण्यात आले.

अहमदनगर येथील न्यू लॉ महाविद्यालय, न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय व पुणे येथील विश्‍वकर्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या ५दिवसांपासून पुणे विद्यापिठाला ई-मेल च्या माध्यमातून निकालात आलेल्या अडचणीबाबत तक्रार करीत आहे. परंतु त्यांच्या ई-मेलला अद्यापि कोणतेही उत्तर मिळालेले नाही. हे विद्यार्थी अतिशय तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जात असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण शून्य गुण, गैरहजर व अनपेक्षित एक किंवा दोन गुण असे ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालपत्रात आले आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षण प्रक्रिया, नोकरी अर्जही हे विद्यार्थी करू शकत नाही. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) चे विद्यार्थी प्रतिनिधीनी अ‍ॅड. सारस क्षेत्रे व इतर सहकारी यांनी या संदर्भात कुलगुरू तसेच परीक्षा संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांवर आलेलया अडचणी सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली व यासंदर्भात निवेदन दिले. त्यावर कुलगुरू आणि परीक्षा संचालक यांनी दोन दिवसात सुधारित निकाल जाहीर करु असे सकारात्मक आश्‍वासन मासूच्या पदाधिकार्‍यांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास ते महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) कडे करण्याचे आवाहन मासुचे नाशिक विभाग प्रमुख सिद्धार्थ हिरामण तेजाळे यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलाचा खून करणार्‍या मुख्य आरोपीला अटक व्हावी

 वाळकी खून प्रकरण : आईने घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट

मुख्य आरोपी विश्‍वजीत कासारला अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप

वेब टीम नगर : काही दिवसापुर्वी वाळकी (ता. नगर) येथे ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

वाळकी (ता. नगर) येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय २१) याला काही दिवसांपूर्वी विश्‍वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपी असलेला विश्‍वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही. तरी लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी मयत मुलाच्या आईने केली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन देखील न्याय मिळत नसल्याने सदर महिलेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन सदर प्रकरणी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments