विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

 विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात 

वेब टीम ठाणे: मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने  शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून,सरनाईक यांच्या ठाण्यातील एका घरात पोलिसांनी  त्यांना नेले असल्याची  माहिती सूत्रांनी दिली.

ईडीने आज, मंगळवारी सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. ईडीच्या पथकात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांची झाडाझडती घेतली. 'टॉप्स सेक्युरिटी ग्रुप'शी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईला घेऊन जाण्याची शक्यता होती. पण ईडीचे अधिकारी वसंत लॉन्स येथील सरनाईक यांच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेल्याचे कळते.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच त्यांची  कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. 

तुम्ही सुरवात केली आम्ही शेवट करू 

काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छिते, आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.



Post a Comment

0 Comments