सुहानी जलोटा यांचे जागतिक नागरिक पुरस्कारासाठी नामांकन

सुहानी जलोटा यांचे जागतिक नागरिक पुरस्कारासाठी नामांकन 

वेब टीम नगर : मुंबईतील कष्टकरी महिलांसोबत रोजगार आणि आरोग्य, या विषयावर पथदर्शक काम करणाऱ्या ‘म्याना महिला फाऊंडेशन’, च्या संस्थापक, कु. सुहानी जलोटा, यांची ‘सिस्को यूथ लीडरशिप अवॉर्ड २०२०’, या जागतिक गौरव पुरस्कारासाठी अंतिम तीन स्पर्धकांमध्ये निवड झाली आहे. अंतिम तीन स्पर्धकांमध्ये त्या एकमेव भारतीय प्रतिनिधी असल्याने त्यांच्यासाठी ऑनलाइन समर्थन देण्याचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे .

उद्योगपती आनंद महिंद्र , अभिनेता सुनील शेट्टी, तसेच महिला आणि बालकांच्या संदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी  ट्वीटर च्या माध्यमातून  सुहानी  साठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. म्याना महिला फाऊंडेशनला स्थापनेपासूनच स्नेहालय संस्थेचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली.

वर्ष  २०१७ मध्ये सुहानी आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी  स्नेहालय संस्थेस भेट दिली आणि काम समजावून घेतले. जुलै २०१९ मध्ये म्यानाच्या वार्षिक उदबोधन कार्यक्रमात स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त जयाताई जोगदंड आणि  डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे मासिक पाळी आणि आरोग्य , याबद्दलच्या वास्तवावर प्रकाश टाकला होता. 

सिस्को यूथ लीडरशिप पुरस्कार, १८ ते ३०,या वयोगटातील अशा युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करते. समाजातून गरिबी, भेदभाव  आणि अज्ञान  संपविण्यासाठी  अर्थपूर्ण योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. महिलांच्या आरोग्याशी संबंधित सामाजिक प्रश्नांमध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल सुहानीने यापूर्वी जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले होते .इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांनी  त्यांना ‘क्वीन यंग लीडर्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले. महिलांचे मासिक पाळीचे प्रश्न, रोजगार निर्मिती करणे आणि स्त्रियांसाठी विश्वासार्ह मदतजाळे तयार करण्यासाठी  कार्यरत ‘मेघन मार्कल फाउंडेशन’ ने देखील सुहानी यांच्या कार्याचा गौरव केला.

 वंचितांना सॅनिटरी व मासिक पाळीच्या उत्पादनांमध्ये प्रवेश मिळवून देणारी'*प्लेज अ पीरियड' ,ही मोहीम यावर्षी जुलैमध्ये त्यांनी सुरू केली. तब्बू, शिल्पा शेट्टी, आर. माधवन, रोहित रॉय यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील विविध कलाकारांनी सुहानी  यांच्या ‘म्याना महिला फाऊंडेशन’ ला सक्रीय सहयोग  दिला आहे.

ग्लोबल सिटीझन पारितोषिक-सिस्को युवा नेतृत्व पुरस्कार सुहानी यांना प्राप्त झाल्यास, म्याना  महिला फाऊंडेशनला २ लाख ५० हजार डॉलर्सचे  पारितोषिक प्राप्त होईल. २०२५ पर्यंत संपूर्ण भारतभरातील वंचित समुदायातील २ कोटी  मुली आणि स्त्रियांचे मासिक पाळीचे आरोग्य आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या म्याना संस्थेच्या अभियानास या पुरस्काराने पाठबळ मिळेल. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महिला रोजगार आणि आरोग्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर कार्य करण्यासाठी भारतात आर्थिक सहयोग या पुरस्कारामुळे उपलब्ध होणार आहे.

  सुहानी यांच्याबद्दल अधिक माहिती www.mynamahila.com या संकेतस्थळावर मिळू शकते.अंतिम फेरीतील निवड  १७ ते २४  नोव्हेंबर २०२० या कालावधीत सक्रिय असणार्‍या सार्वजनिक मतदानावर अवलंबून आहे .प्रत्येक मत महिला-मुलींसाठी मूर्त स्वरुपात, टिकाऊ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक पाउल असेल, असे स्नेहालय परिवाराला वाटते. सुहानी जलोटा यांना आपली मते देण्यासाठी https://bit.ly/35CCfHr  येथे क्लिक करण्याची विनंती भारतीय नागरिकांना विविध समाज माध्यमातून स्नेहालय परिवाराने केली आहे

Post a Comment

0 Comments