स्वप्नील मुनोत व कृष्णा वाळके यांना सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार प्रदान

 स्वप्नील मुनोत व कृष्णा वाळके यांना सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार प्रदान.

वेब टीम नगर - येथील अभिनेता, निर्माता स्वप्नील मुनोत व अभिनेता, लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा शेवगावच्यावतीने देण्यात येणारा 'स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार' रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. नगर येथील अमरापूरकर यांच्या निवासस्थानी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात अमरापूरकर कुटुंबियांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

लेखिका सुनंदा अमरापूरकर, अभिनेत्री केतकी अमरापूरकर, दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, सदाशिव अमरापूरकर यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर, शेवगाव नाट्यपरिषदेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर, उपाध्यक्ष भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते. अकरा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आपल्यासोबतच नगरच्या मातीतील कलावंतांना मालिका, चित्रपट व नाटकाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अभिनेते स्वप्नील मुनोत हे एकांकिका स्पर्धा, चित्रपट व मालिकेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांपासून करीत आहेत. महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन, 'ट्रिपल सीट' या चित्रपटाची निर्मिती व व्यवस्थापन तसेच सध्या झी युवा वाहिनीवर सुरू असलेल्या 'तुझं माझं जमतंय' या मालिकेचे निर्माते म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.  तर अभिनेता, लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके यांनी अनेक कथा, एकांकिका व नाटकाचे लेखन केले असून त्यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या 'लाली' या एकांकिकेने मागील वर्षी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या 'पुरुषोत्तम करंडक' स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या 'लाली' या कथेवरील चित्रपट निर्मिती प्रक्रियेची पूर्वतयारी करण्यात ते व्यस्त आहेत. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी सादर केलेल्या 'म्हातारा पाऊस' या ऑनलाईन एकपात्री प्रयोगाची चांगली चर्चा सध्या सुरू आहे.

या दोन्ही रंगकर्मीना अमरापूरकर कुटुंबीय व शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने त्यांच्या रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मयुरी मुनोत, आशिष करमकर, सुहास लहासे, शुभम घोडके, सागर वाळके, अक्षय बेल्हेकर, राहुल मडके आदी उपस्थित होते. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम गरीब, होतकरू व धडपड्या रंगकर्मीला देण्यात येईल अशी घोषणा स्वप्नील मुनोत यांनी यावेळी केली.


Post a Comment

0 Comments