भ्रमंती

भ्रमंती

शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिर
प्रवरासंगम,टोका

नगर-औरंगाबाद रोडवर गंगापूर फाट्यापासून थोड्यादुरवर टोका या गावात शिल्पसमृद्ध असे सिद्धेश्वर मंदिर आहे.या मंदिराचे मुख्यद्वार बंद असल्याने मागील बाजूने मंदिरात प्रवेश करावा लागतो.या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलिचे आहे व त्यावर सुरेख नक्षीकाम काही ठिकाणी पहावयास मिळते.मंदिराच्या आवारात भगवान विष्णु व देवीचे मंदिर आहेत व यावर विविध शिल्पे कोरलेली आपल्याला पहावयास मिळतात.

मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे. स्तंभांवर भारवाहक यक्ष छत तोलून धरताना कोरलेले आहेत. २२०० वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली आलेली ही भारवाहक यक्षांची परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत झिरपलेली आहे. ब्राह्मणी लेण्यांत आणि हिंदू मंदिरांत काही वेळा यक्षांची जागा यक्षिणी अथवा योगिनी घेताना दिसतात.

सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले कोरीव काम इतके आकर्षक नाही. मंदिराचे गर्भगृह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलिंग स्थापित केले आहे.

 विष्णु अवतार

1)मत्स्यावतार :-वास्तविक विष्णूने मत्स्याचे रूप धराण करून मनु राजाला प्रलयातून वाचवले अशी ही कथा आहे पण शिल्पातला वार करणारा दैत्य कोण आहे ते कळत नाही.

2)कूर्मावतार :- येथे कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून समुद्र घुसळत असलेले एका बाजूला देव तर दुसर्‍या बाजूला दानव कोरलेले आहेत.

3)वराह अवतार :- या शिल्पात  वराहाने आपल्या दातांवर अर्धचंद्राकृती पृथ्वी उचललेली आहे त्या पृथ्वीवर हत्ती, घोडे, मनुष्य, वनस्पती आदी सजीव सृष्टी नांदत आहे. याच पृथ्वी तोलून धरलेल्या अवस्थेत वराह हिरण्याक्षाशी गदायुद्ध खेळतांना दाखवले आहे.

4)नृसिंहावतार :- येथे स्तंभातून प्रकट झालेला नृसिंह हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचे आपल्या नखांनीच पोट फाडताना दाखवला आहे. एका बाजूला लहानगा प्रल्हाद हात जोडून उभा आहे.

5)वामन अवतार :- हे शिल्प उद्धस्त अवस्थेत असल्याने नीट कळू शकत नाही पण वेदीवर बसलेल्या बळी राजाच्या मस्तकावर वामनाने पाय ठेवल्याचे या शिल्पाचे अंधुकसे अवशेष दिसतात.

6)परशुराम अवतार :- इथे सहस्त्र हात असलेल्या कार्तवीयाचा परशुराम परशुच्या साहाय्याने वध करताना दाखवलेला आहे. तर बाजूलाच सहस्त्रार्जुनाने परशुराम पिता जमदग्नीची बळजबरीने हरण केलेली धेनु दाखवलेली आहे.

7)रामावतार :- दशानन रावणाशी युद्ध करताना राम लक्ष्मण कोरलेले आहेत तर हनुमान एक वृक्ष उपटून रावणावर फेकत आहे. रावणाला नऊ मानवी तोंडे तर एक पशूचे तोंड कोरलेले आहे जणू ते त्याच्यातले क्रौर्याचे निदर्शक आहे. रावणाच्या हातात त्रिशुळ, खड्ग, गदा, धनुष्यबाण, भाला, चक्र, मुद्गल अशी विविध शस्त्रे दाखवली आहेत.

8)कृष्णावतार :- यात बालकृष्ण यशोदेबरोबर दाखवला आहे तर शेजारच्या शिल्पात त्याने कंसाचा राजमुकुट खेचून त्याच्या केशसंभाराला पकडून खेचताना कोरलेले आहे तर खालचे बाजूस कंसाचे मस्तक खंडित केलेले दाखवलेले आहे.

9)बुद्धावतार :- मध्यभागी बुद्ध व बाजूला त्याचे दोन अनुयायी एक स्त्री व एक पुरुष ध्यान करताना दाखवलेले आहेत. गंमत म्हणजे बुद्धाचा समावेश जेव्हा विष्णूच्या अवतारांमध्ये केला गेला तेव्हा विष्णूचे चार हात पण बुद्धाला चिकटले ते चारही हात येथे कोरलेले आहेत

10)कल्कीअवतार :- हा विष्णूचा दहावा अवतार. पुरांणाप्रमाणे हा भविष्यातला अवतार आहे. हा नेहमी पांढर्‍या छत्रधारी सालंकृत घोड्यासह दाखवला जातो. शस्त्रधारी कल्की काहीवेळा घोड्यावर बसलेला तर काही वेळा लगाम हातात धरलेल्या अशा दोन्ही स्वरूपात दाखवला जातो.......

इतके सुबक कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातली मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाहीत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे तरीही तिथे असे कोरीव काम बघायला मिळत नाही. 

एकंदरीतच हे मंदिर बघणे हा एक अनुभव आहे.

लेखक,छायाचित्रकार - राजेंद्र बुलबुले 

Post a Comment

0 Comments