अकृषक मालमत्ता विकसित होण्यासाठी
महासभेत ठराव घेण्याची मागणी
फुले बिग्रेडच्या वतीने आयुक्तांना निवेदन
अन्यथा शहरातील सर्व मालमत्ता धारकांचा महापालिकेवर आक्रोश मोर्चाचा इशारा
वेब टीम नगर - शासन नियमानुसार २००१ नंतरच्या अविकसित व अकृषक मालमत्ता गुंठेवारी नियमात घेऊन विकसित होण्यासाठी पुढील महासभेत हा विषयावर ठराव घेऊन तो ठराव राज्य सरकारकडे पाठविण्याच्या मागणीचे निवेदन फुले ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर कार्यालयात देण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, आशिष भगत, तेजस दळवी, विक्रम बोरुडे, रमेश पुंड, महेश सुडके, संतोष हजारे, संकेत लोंढे, विश्वास शिंदे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य गुंठेवारी विकास नियमितीकरण व श्रेणीवाढ करणे आणि गुंठेवारी विकासाचे नियंत्रण करणे अशा स्वरूपाचा महाराष्ट्र शासनाने दि.१३ ऑगस्ट २००१ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्या अनुषंगाने शासन नियमांचा आदर करत त्या नियमांचे पालन करण्याची तरतुदी पूर्ण करून महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करून हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. तर शासन दरबारी सदर प्रश्न मांडून नियमात मुदतवाढ करून घेतल्यास अहमदनगर महापालिका हद्दीतील जवळपास 3 ते 5 हजार मालमत्ताधारकांना सदर मालमत्ता विकसित करणे शक्य होऊन खरेदी-विक्री, बांधकाम परवानगी घेणे या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्न वाढ होणार आहे. तसेच नगर विकासास चालना मिळून सर्व मालमत्ता विकसित होण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रश्नावर कार्यवाही न झाल्यास शहरातील सर्व मालमत्ता धारकांना एकत्र करून महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा फुले ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आला आहे.
0 Comments