उपचारा अभावी मृत्यू

 उपचारा अभावी मृत्यू 

मृत्यूनंतर वेळेवर मृतदेह ताब्यात देत नसल्याने नागरिक संतप्त

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर निदर्शने

वेब टीम नगर - जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतरही कोरोनाच्या नावाखाली मृतदेह मिळण्यास सतरा ते अठरा तास कुटुंबीयांना ताटकळत ठेवल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर निदर्शने करुन जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय शहर जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे, भारतीय दलित महासंघ जिल्हाध्यक्ष पावलस पवार, भारतीय लहुजी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन ससाणे, राजू घोरपडे, याकोब पठारे, प्रकाश इंगळे, रवी पठारे, सुनील पठारे, गणेश शेलार, गणेश बोरुडे, रोहित वैरागर, अरुण पठारे आदी उपस्थित होते.        

बुधवार दि.२१ ऑक्टोबर रोजी अशोक भानुदास पठारे यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक तास होऊन देखील वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतर कोरोना चाचणी करुन सकाळी मृतदेह घेऊन जाण्यास जिल्हा रुग्णालयाच्या वतीने  सांगण्यात आले. पठारे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सकाळी आले असता कर्मचार्‍यांनी त्यांना व्यवस्थित न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन सर्व विभागात चकरा मारण्यास भाग पाडले. शेवटी कर्मचार्‍यांनी संध्याकाळी ५ वाजता मृतदेह ताब्यात देण्याचे सांगितले. तर गुरुवारी संध्याकाळी पठारे कुटुंबीयांना मृतदेह देण्यात आला. पावलस पवार म्हणाले की, जिल्हा रुग्णालय मृत्यूचा सापळा बनला असून, येथे वेळेवर उपचार दिले जात नाही. डॉक्टर व कर्मचार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी उध्दटपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

Post a Comment

0 Comments