।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।। ऑलिम्पिक खेळाडू निर्माण करण्यासाठी धडपडणारी "अंजली "

 ।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

ऑलिम्पिक खेळाडू निर्माण करण्यासाठी धडपडणारी "अंजली " 

शिवजयंतीची मिरवणूक असो गणेशोत्सवाची मिरवणूक एक किशोरवयीन चुणचुणीत मुलगी अत्यंत जोमाने तलवार दांडपट्टा फिरवून सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची.  तिथे कौशल्य पाहून सगळेच थक्क व्हायचे जमलेल्या गर्दीतून कोणी दर्दी तिला बक्षीस द्यायचे बघता बघता ही मुलगी महाराष्ट्राची सुवर्णकन्या बनली. देशातील पहिली महिला कुस्तीपटू,पहिली राष्ट्रीय पातळीवरील महिला मार्गदर्शिका, छत्रपती पुरस्कार विजेती असे अनेक विक्रम तिच्या नावावर जमा झाले आहेत. आता ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिचे प्रयत्न सुरू आहेत.तीचे नाव अंजली देवकर-वल्लाकट्टी.

महाराष्ट्राची सुवर्णकन्या असा लौकिक असलेल्या अंजलीचे यशस्वी व्यक्तिमत्व आज लोकांच्या नजरेत भरते,मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणारा मार्ग अत्यंत खडतर असल्याचे तिच्या प्रवासाच्या अंतरंगात डोकावताना जाणवते तिच्या पूर्वायुष्या बाबत सांगताना कित्येकदा तिचेही डोळे पाणावतात.

आपल्याला खेळाडू व्हायचंय हे कधीकाळी अंजलीच्या ध्यानीमनीही नव्हतं काही कळण्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात आधीच तिचं मातृछत्र हरपलं.घरात , अंजली, तिची मोठी बहीण, दोन भावंडं आणि वडील असं पंचकोनी कुटुंब वडिलांचा जेमतेम चालणारा पानपट्टीचा व्यवसाय मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावरच प्रपंच चालायचा,घरातली खाण्यापिण्याची आबाळ टाळावी म्हणून अंजली गजरे ओवायची त्यावेळी बोटांना सुई टोचून जखमा व्हायच्या मात्र त्यातूनच जीवनातील काटेरी मार्गावरून चालण्याचे धडे तिला मिळाले.व्यावहारिक जगाचे चांगले-वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले. त्यातूनच ती व्यवहार शिकली त्याच शिदोरीवर अंजली ची आजची वाटचाल सुरू आहे.

नगर शहरातील पाणीपुरवठा बाबत सगळ्यांनाच माहिती आहे.तोफखाना परिसरात राहणाऱ्या अंजलीला ही पाणी पहाटेच पाणी भरावे लागे मात्र ज्यांना वरती पाणी भरायची त्या नावावर एक महिला दंडेली ने वागायची इतरांचे हांडे लाथाडून द्यायची अंजलीने ही गोष्ट वडिलांना सांगितले तसे पैलवानी पेशातल्या वडिलांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला सांगितलं.अंजलीने जूडो शिकण्याचा ध्यास घेतला होता तिथे शाळेतील क्रीडाशिक्षक गोडळकर यांनी तिला ज्युडो प्रशिक्षक धोपावकर यांच्याकडे घेऊन तिची शिफारस केली ही मुलगी फि देऊ शकणार नाही मात्र नाव नक्की कमावेल असे सांगितले ज्युडोचे प्रशिक्षण घेतानाच अंजलीने त्या दंडेली करणाऱ्या बाईला चांगलाच धडा शिकवला.येथूनच अंजलीच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरु झाली. 

 शहरातील समारंभ मिरवणुकीतून अंजली तलवारबाजी दांडपट्टा याची प्रात्यक्षिकं दाखवायची त्यातून मिळालेल्या पैशातून वर्षभरातील स्पर्धेसाठी तयारी करायची.जेव्हा अंजलीला छत्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा तिने त्या महिलेचे घर गाठले आणि तिच्या पाया पडून तुमच्यामुळे आज मला हा पुरस्कार मिळाला असे म्हणून गळाभेट घेतली. तसं त्या बाईलाही गहिवरून आलं आज त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत,असे एक ना अनेक प्रसंग घडले मात्र अंजली प्रत्येक प्रसंगातून घडत गेली तिला समजायला लागल्यापासून ती ज्या ठिकाणी स्पर्धेसाठी गेली तिथून ती रिकाम्या हाताने कधीच परतली नाही.तिची 'अंजली' नेहमी पदकांनी भरलेली असायची.

लहानपणी खेळायला जाण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य खरेदी करायलाही पैसे नसायचे मग शालेय स्तरावरच्या जिल्हा स्तरावरीच्या  स्पर्धेत सहभाग व्हावा  म्हणून जीवतोड मेहनत करायची. या स्पर्धांमध्ये निवड झाल्यावर ट्रॅक सूट व बूट मिळायचे मग त्यावर वर्षभराचा सराव निघायचा, राष्ट्रीय स्तरावरच्या खेळायला दिल्लीसारख्या मोठ्या शहरात गेल्यावर तिथे आपले नैपुण्य दाखवायचे आणि मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून बाजारात फिरायला गेल्यावर ठोक दरात स्वेटर वगैरे आणायचे आणि नगरमध्ये विकून पुन्हा मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवून पुढच्या स्पर्धेची तयारी करायची अशी तारेवरची कसरत अंजली नेहमी करायची.एकदा कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरला गेली महिला कुस्ती खेळणार म्हणल्यावर तेथील कुस्तीपटूंनी पुरुषी अहंकारापायी तिला विरोध केला  अखेर त्यांची कशीबशी समजूत काढून निवड चाचणी पार पडली आणि अंजलीची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली राष्ट्रीय पातळीवर अंजलीने सुवर्णपदक पटकावल्यानंतर मात्र विरोध करणारी सर्व मंडळी सत्कारासाठी करण्यासाठी पुढे सरसावले मात्र हे सर्व करत असताना पुरुषी अहंकाराचा सामना कराव्या लागलेल्या अंजलीला कौटुंबिक पातळीवरही विरोधाला तोंड द्यावे लागले.अनेकांनी अबोला धरला खेळातून चरितार्थ चालायचा नाही पोटापाण्याचे उद्योग बघा असे सल्लेही मिळाल्याने मग सात आठ सुवर्णपदके पटकावत ऐन बहरात आलेल्या कारकिर्दीला खीळ बसते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा  अंजलीला सातार्‍याजवळील नरसापुर येथे क्रीडा प्रशिक्षकाची नोकरी मिळाली तेथे हॉस्टेलमध्ये रहाणे परवडणारे नसल्याने आणि छत्रपती पुरस्कारामुळे एसटीचा प्रवास मोफत असल्याने नगर ते नरसापूर व्हाया पुणे असा रोज प्रवास करावा लागे.मात्र असे असले तरी अंजलीची क्षमता किंचितही कमी झालेली नाही उत्तम कुस्तीपटू होण्यासाठी घेतलेली मेहनत आजही तिच्या कामी येताना दिसते.आपल्यातील क्षमता वाढवण्यासाठी खुराकाची नव्हे तर जिद्द आणि चिकाटी ची गरज असते हे अंजलीने आपल्या कारकिर्दीतून  सिद्ध केले, नव्हे या क्षेत्रात तिने एवढा दबदबा निर्माण केला होता की अंजलीचा सहभाग असलेल्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडू आपला गट बदलून भाग घ्यायचे. अनेकदा तिने स्पर्धेत नये म्हणून तिला करण्यासाठी तिला रॅगिंग करण्याच्या घटनाही घडल्या आहेत, मात्र अंजली न डगमगता सगळ्या स्पर्धांतून चमकायची मात्र , मारे तिच्या स्वभावामुळे  तिने सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत.राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून तिचे श्रेष्ठत्व राष्ट्रीय खेळाडूंनीही मान्य केले आहे.

गीता फोगाट , सुशिलकुमार , मास्टर चंदगीराम यांच्या दोन कन्या अंजली कडून कुस्तीचे प्रशिक्षण मार्गदर्शन घेतात.गेल्या बारा वर्षापासून जरी अंजली स्पर्धेपासून लांब असलीतरी तिची क्रीडा क्षेत्राशी असलेली नाळ अजिबात तुटलेली नाही.गेल्या वर्षी अंजलीने राणी लक्ष्मीबाई कला  क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने 17 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती ,अत्यंत नेटक्या  संयोजनामुळे या स्पर्धेला प्रतिसादही उत्तम मिळाला.राज्यातून जवळपास अडीचशे ते तीनशे महिला कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी झाल्या नाहीत याची पावती.

*भारतातील पहिली महिला अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व मार्गदर्शिका. 

*महाराष्ट्राची प्रथम सुवर्णपदक विजेती (कुस्ती). 

*कुस्ती मार्गदर्शक पदविका परीक्षेत सन २००४ साली देशात प्रथम

*सन २००१ मध्ये श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (ज्युडो) प्राप्त

*अखिल भारतीय महिंद्रा अवार्ड विजेती. 

*सन १९९९ साली पोलंड येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले.  

*जपान येथे आयोजित केलेल्या टोकियो सीनियर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती. 

*कोरिया येथे झालेल्या कॅडेट एशियन चॅम्पियन्स मध्ये भारताची प्रमुख मार्गदर्शिका म्हणून नियुक्ती. 

*रशिया येथे झालेल्या जुनिअर वर्ल्डकपमध्ये भारतीय कुस्ती संघाची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती. 

*थायलंड बँकॉक येथे झालेल्या कॅडेट एशियन चॅम्पियनशिप मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती. 

*कुस्तीमध्ये सहावेळा राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त.  

*फुटबॉल स्पर्धेत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ग्वालियर येथे निवड.   

* सन २००२ साली लातूर येथे झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार.  

*तीन वेळात पावर लिफ्टिंग मध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत प्रथम.  

*सन १९९९ साली स्ट्रॉंग वुमन ऑफ अमदनगर पुरस्कार विजेती,श्री संताजी क्रीडा पुरस्कार विजेती. 

*सन २००५ सली पुणे येथे झालेल्या वार्षिक क्रीडा पारितोषिक समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळवला. 

*दिनांक २५ मे २००२ रोजी ग्रुप फाउंडेशन नाशिक येथे माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सन्मानपत्र प्रदान.  

*लाठी-काठी,शिवकालीन दांडपट्टा,ढाल तलवार या सर्व शस्त्र प्रकारांमध्ये पारंगत. 

*शाळा,महाविद्यालय, विद्यापीठ , राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण २१ सुवर्णपदके,११ ब्रॉंझ  पदके ५ रौप्य पदके व इतर अनेक पुरस्कार प्राप्त.  

*फुटबॉल, पॉवरलिफ्टिंग व अथलेटिक्स यामध्ये विशेष प्रावीण्य २०१३ साली तुर्कस्तान येथे जागतिक कुराश स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.  

*संपूर्ण महाराष्ट्र जवळपास सहा ते सात लाख मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.

Post a Comment

0 Comments