पंचनामे करून सरकार मदत करणार

पंचनामे करून सरकार मदत करणार 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : परतीच्या पावसाचे संकट अजून टळलेल नाही 

वेब टीम सोलापूर : "पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. "परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही," असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

"पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. पूरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. नुकसानग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी मी आलो आहे. संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पंचनामे सुरु आहे. पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत केली जाईल. कोणीही काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं कारण नाही. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देता आहे. त्यामुळे सावध राहा, प्राणहानी होऊ देऊ नका," असं मुख्यमंत्री म्हणाले.

घाईगडबडीत निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री

"मी आज काही घोषणा केलेली नाही. प्रत्यक्ष माहिती घेऊन जे काही करायचं ते करणार आहोत. पावसाने आगमन केलं तेव्हा निसर्ग वादळाच्या रुपात फटका बसला. मधल्या काळात विदर्भाला फटका बसला आणि परतीचा पावसाने तडाखा दिला आहे. परतीच्या पावसाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. केंद्राकडून मदत मिळेल, असं आश्वासन खुद्द पंतप्रधानांनी फोनवरुन दिलं आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा  फडवीसांना टोला

केंद्राची वाट न पाहता राज्याने तातडीने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहारला जातच आहेत. केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नाही." तसंच या विषयात राजकारण करुन नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. "सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं संकट आहे तर सोबत काम करुन केंद्राची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे," अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत

दरम्यान, अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी चार लाख रुपयांच्या धनादेशाचं मुख्यमंत्र्यांच्या वाटप यावेळी करण्यात. अतिवृष्टीमुळे सर्वाधित जीवितहानी सोलापूर जिल्ह्यात झाली. सोलापुरातील विविध तालुक्यातील दहा मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली. यामध्ये पंढरपुरातील चार, माढ्यातील तीन आणि दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील प्रत्येकी एक मृताच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही : मुख्यमंत्री

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी करत सरकारने जबाबदारी झटकू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही."

मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्त भागाची पाहणी

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. एकीकडे राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.. 

Post a Comment

0 Comments