कायदे विषयक ज्ञानामुळे महिला सक्षम होतील


कायदे विषयक ज्ञानामुळे महिला सक्षम  होतील 

न्या.श्रीकांत आणेकर - महिलादिन सप्ताहनिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद  

 वेब टीम  नगर,16 - जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्याप्रकारे अधिकार व हक्काची जाणिव करुन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमांचा फायदा नागरिकांनी घ्यावा. या उद्देशाने  महिलांसाठी कायदेविषयक माहिती व ज्ञान देण्याच्या  शिबीरामुळे महिलांच्या ज्ञानात भर पडून महिला सक्षम व जागृत होऊन न्याय व हक्कासाठी सकारात्मक पाऊल टाकतील. महिला दिन सप्ताहनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई व जिजाबाईंच्या स्वरुपातील विविध क्षेत्रातील महिला विद्यार्थीनी सहभागी झाल्याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.

     जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जुन्या न्यायालयाच्या इमारतीत असलेल्या औद्योगिक व कामगार न्यायालय, लेबर लॉ प्रॅक्टीशनर असोसिएशन, दिलासा सेल, आय लव्ह अहमदनगर, वंदे मातरम् ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन सप्ताहनिमित्त कायदेविषयक  साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. औद्योगिक व कामगार न्यायालयात वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश सुनिलजीत पाटील, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश निता आणेकर, न्यायाधीश हेमलता भोसले, औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर.गुप्ता, कौटूंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक, जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील, लेबर लॉ प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.दिपक चंगेडे, दिलासा सेलच्या पोलिस उपनिरिक्षक जयश्री काळे, रेसिडेन्शिअल हायस्कूलचे प्राचार्य ए.आर.दोडके, वंदे मातरम् ग्रुपच्या मिनल बोरा, प्रिती बोगावत, सोनल गांधी, आय लव्ह नगरच्या विशाखा पितळे, विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे अधिक्षक विकास जोशी, सहाय्यक प्रबंधक मिरजकर, नरेंद्र देशमुख आदिंसह मोठ्या संख्येने विधिज्ञ, विविध क्षेत्रातील महिला विद्यार्थीनी उपस्थित होेते.

     यावेळी न्या.निता आणेकर यांनी कौटूंबिक हिंसाचार कायदा २००५ व बालकांवर होणार्‍या लैगिंक अत्याचार विरोधी कायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले की, हिंसाचार म्हणजे, अन्याय, छळ, अत्याचार हे आपण जाणतोच. भयमुक्त वातावरणात महिलांना जगता यावे यासाठी स्त्रींवरील हिंसाचाराला आळा बसवा म्हणून कडक कायद्याची अंमलबजावणी करत आहे. बालकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही केवळ सरकारची नाही तर बालकांना हिंसा मुक्त वातावरणात सन्मानाने जगता यावे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने २०१३ साली या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

     न्यायाधीश बी.आर.गुप्ता यांनी कामगार विषयक कायद्याचे मार्गदर्शन करतांना सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी, संस्थेत कामगारांची काळजी घेण्याची जबाबदारी मालकांची असते. कामगारांच्या काळजी घेण्याच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली आहे.

     न्यायाधीश हेमलता भोसले म्हणाल्या, नगरच्या औद्योगिक, कामगार व कौटुुंबिक न्यायालयामध्ये प्रथमच महिला न्यायाधीश आहेत. तसेच या तिन्ही न्यायालयातील वरिष्ठ अधिकारीही महिलाच आहेत. त्यामुळे येथे महिलाराज असून, हे लेडिज स्पेशल न्यायालय असा उल्लेख व्हावा. म्हणूनच महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले आहे.

     प्रास्तविकात न्या.सुनिलजीत पाटील म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत मोफत कायदा पोहचविण्याचे काम होत आहे. जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे नगरचे नाव राज्यात उंचावले आहे. महिलांना कायद्याचे ज्ञान वाढावे, यातून त्यांचे सबलिकरण व्हावे, या उद्देशाने महिला दिनानिमित्त विशेष सप्ताहाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे केले आहे.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍वेता सोनवणे व भुषण कुलकर्णी यांनी केले तर आभार अ‍ॅड.संतोष जोशी यांनी मानले. यावेळी अ‍ॅड.  तांबोळी, श्रद्धा दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड.स्वाती नगरकर, अ‍ॅड.मिनाक्षी कराळे, अ‍ॅड.मनिष केळगंद्रे आदिंसह औद्योगिक, कामगार व कौटूंबिक न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments