आदिवासी भटके विमुक्त परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
प्रा. किसन चव्हाण - ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी औरंगाबादला राज्यव्यापी आदिवासी भटके विमुक्त परिषदवेब टीम नगर ,दि. १०- केंद्र सरकारने लागू केलेल्या एन आर सी व सी ए ए या संविधानविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी १३ मार्च रोजी दुपारी १२ वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पैठण गेट औरंगाबाद येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी व भटके विमुक्तांच्या राज्यव्यापी परिषदेस जिल्ह्यातील आदिवासी भटके विमुक्त समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण व अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी केले आहे.
या परिषदेबाबत अधिक माहिती देतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने एन आर सी. व सी ए ए हे संविधान विरोधी कायदे मंजूर केल्याने देशातील कोट्यवधी आदिवासी भटके विमुक्त समाज १९५० पूर्वीचे जन्माचे व महसुली पुरावे देऊ शकत नसल्यामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. वरकरणी हे कायदे मुस्लिम विरोधी असले तरी राज्यातील समस्त आदिवासी भटका विमुक्त समाज या संविधान विरोधी कायद्याच्या प्रभावाखाली येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही संविधानातील हक्क व अधिकार उदासिन राज्यकर्त्यांमुळे आदिवासी व भटके विमुक्त समाजापर्यंत पोहचले नाहीत. मुळातच भारतीय राज्यघटनेने आदिवासी भटके विमुक्तांसह सर्व भारतीयांना नागरिकत्व दिलेले आहे. परंतु केंद्रातील आर एस एस प्रणित भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर एन आर सी व सी ए ए हे कायदे आणून आदिवासी भटक्या विमुक्तांचे भारतीय नागरिकत्व धोक्यात आणलेले आहे. उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती करणारा आदिवासी भटके विमुक्त समाज अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. त्यांना गाव, घर, शेत, जमीन नसल्याने ते १९५० पूर्वीचे पुरावे देऊ शकत नाहीत. पर्यायाने या समाजाचे नागरिकत्व या संविधान विरोधी कायद्याने नाकारले जाणार आहे. व त्यांची रवानगी पुन्हा डिटेक्शन कॅम्प मध्ये होणार आहे.
या देशातील आदिवासी भटका विमुक्त समाज भारतीय स्वातंत्र्याच्या अग्रभागी होता. मात्र तोच समाज या कायद्यामुळे उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी १३ मार्च २०२० रोजी आदिवासी भटके विमुक्तांची राज्यव्यापी परिषद ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड . प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर राज्यभर या संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
0 Comments