श्री तारकेश्वर गडावर एकादशी निमित्त रक्तदान शिबिर



श्री तारकेश्वर गडावर एकादशी निमित्त रक्तदान शिबिर



वेब टीम पाथर्डी,दि.७ - पाथर्डी पासून १० किमी अंतरावर असलेल्या श्री तारकेश्वर गड, देवस्थानच्या वतीने अमलिका एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वा. गडाचे मठाधिपती गुरुदेव महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले.

जनकल्याण रक्तपेढी (अहमदनगर) येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिलीप दाणे, जनसंपर्क अधिकारी सागर उंडे, तंत्रज्ञ योगेश आरवेल, परिचारिका गया चव्हाण, प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जोशी, मदतनीस बाळासाहेब खरपुडे, विमल लोखंडे, यांच्यासह भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात २५ भाविकांनी रक्तदान केले.

श्री तारकेश्वर गड येथे परमपूज्य नारायण बाबा, भगवान तारकनाथ व श्री विठ्ठल रुख्मिणी यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी उस्फूर्तपणे रक्तदान करावे. अन्नदानापेक्षाही रक्तदानाला विशेष महत्व आहे. त्यामुळेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री क्षेत्र तारकेश्वर गड येथे एकादशी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दिली.

रक्तदानामुळे इतरांना जीवनदान मिळते, रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्तपेशी तयार होण्यास चालना मिळते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या रक्तगटाची माहिती होते, गरजू रुग्णांसाठी भविष्यात रक्तपेढी मध्ये रक्त साठविता येते. तसेच रक्तदात्यांना जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला मोफत रक्त दिले जाते अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिलीप दाणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments