जनगणनेस नागरिकांनी सहकार्य करावे

जनगणनेस नागरिकांनी सहकार्य करावे 

जिल्हाधिकारी : यंत्रणेने संवेदनशीलतेने जबाबदारी पार पाडावी   

       वेब टीम नगर, दि. ६- राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी यात सहभागी असणार्‍या सर्व यंत्रणांनी त्यांची जबाबदारी अचूकपणे आणि पुरेशा संवेदनशीलतेने पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. नागरिकांनीही या जनगणनेसाठी येणार्‍या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जनगणना कामासाठी नियुक्त केलेले चार्ज अधिकारी आणि त्यांना साह्य करणार्‍या कर्मचारी यांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा न्यू आर्टस महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक एस.एन. पायस, आर. ए.चिंधे,  एस.एस. मुळीक, एस.आर. नाईक, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.
            या प्रशिक्षण कार्यशाळेस सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी व संबंधित जनगणना काम पाहणारे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना  द्विवेदी म्हणाले, जनगणना हा देशाच्या महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक महत्वाचा कार्यक्रम आहे. सन १८७२ रोजी सर्वप्रथम जनगणना करण्यात आली. त्यानंतर दुसरी जनगणना सन १८८१ रोजी झाली. त्यानंतर अखंडीतपणे  दर दहा वर्षांनी ही जनगणना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
            देशाची विविध धोरणे, योजना आखताना या जनगणनेचा उपयोग होत असल्याने त्यास महत्व आहे. त्यामुळे सर्व घटकांनी ही माहिती येणार्‍या प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहृन त्यांनी जि्ल्ह्यातील नागरिकांना केले.
         मित्तल यांनी, जनगणना सारख्या महत्वाच्या कार्यक्रमाचे महत्व ओळखून सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
            जनगणना संचालनालयाचे उपसंचालक  पायस म्हणाले, ही सोळावी जनगणना आहे. या जनगणनेमध्ये प्रथमच मोबाईल ॲपचा वापर करण्यात येणार आहे. पेपर मोड आणि ॲप्लीकेशन मोड अशा दोन्ही मध्ये माहिती भरण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments