सलून असोसिएशनच्या वार्षिक सभेत नवीन दरवाढ जाहीर

सलून असोसिएशनच्या वार्षिक सभेत नवीन दरवाढ जाहीर


दाढीचे दरात वाढ नाही : कटींगच्या दरात २० रु. वाढ

   वेब टीम  नगर,दि. ५ - येत्या१ एप्रिल २०२० पासून कटींगच्या दरात सरासरी २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सलून असोसिएशनने केला असून, ही दरवाढ गेल्या ३ वर्षानंतर होत आहे. वाढती महागाई आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील, असे दर असोसिएशनने निश्‍चित केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक दुकानदारांनी हे समान दराची योजना अंमलात आणावी, असे आवाहन शहर सलून असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम यांनी केले. अहमदनगर शहर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय (टिळकरोड) येथे आयोजित केली होती, यावेळी अध्यक्ष निकम बोलत होते.

      नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व शांताराम राऊत, खान्देश नाभिक युवा मंचचे अध्यक्ष रामदास आहेर, खलिफा शेख सत्तारभाई  आदि व्यासपीठावर होते. श्री.निकम यांनी नवेदर यावेळी जाहीर केले. ते असे साधी दाढी ५० रु., फोम दाढी ८० रु., दाढी कोरणे  ८० रु., कटींग - १०० रु. आणि फॅशनेबल कटींग १५० रु. अशी दरवाढ सर्वानुमते निश्‍चित करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ग्राहकांना देण्यात येणारी सुविधा व कामाच्या दर्जाप्रमाणे इतर कामाचे दर राहतील, असेही ते म्हणाले.

     या व्यवसायात पदार्पण करतांना तत्पूर्वी प्रशिक्षणासाठी ५० ते ७०हजारांपर्यंत खर्च येतो. व्यवसाय उभा करण्यासाठी मोठी गुंतवणुक करावी लागते. ग्राहकांचे व्यक्तीमत्व खुलवतांना आपापले कला-कौशल्य वापरावे लागते, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा पगार इतर खर्च असा ढोबळ हिशोब करुन साधी दाढीच्या दरात वाढत न करता फक्त कटींगच्या दरात २० रुपयांची दरवाढ केली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक दुकानदारांनी दरवाढ लागू करावी व एकजूट कायम राखावी, असे आवाहन यावेळी अध्यक्ष आणि इतर वक्तांनी केले.

     यावेळी सागर औटी, महेश मोरे, मनेष शिंदे, बंडू बिडवे, संग्राम निकम या उच्च प्रशिक्षित व्यावसायिकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दर सोमवारी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय कायम करण्यात आला. असोसिएशनचे संस्थापक सदस्य बबन साळूंके व सुनिल वाघमारे आदिंची समयोचित भाषणे झाली. विशाल सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले तर जीवन सोन्नीस यांनी आभार मानले. असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष व विभाग प्रमुख पदावरील नियुक्त्या करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जाहीर करण्यात येतील.

Post a Comment

0 Comments