हर्षवर्धन जाधव ,प्रकाश महाजन मनसेत दाखल

हर्षवर्धन जाधव ,प्रकाश महाजन मनसेत दाखल 

वेब टीम मुंबई,दि. ८- कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे. कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली. आता खैरे आयुष्यात कधीच खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी केलं आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत नांदेड शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे.
एका नव्या डॅशिंग भूमिकेत हर्षवर्धन जाधव दिसेल. गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, काही गैरसमज झाले होते, त्यातून आता माझी घरवापसी झाली आहे. राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी नाही. या हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील. रावसाहेब दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल, असं कुणी समजू नये, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कधीच आयुष्यात खासदार होणार नाही, हे मी लिहून देतो. मी त्यांना आधी सुद्धा बोललो, आता तुमचं वय झालंय तुम्ही निवृत्ती घ्यावी. शिवसेनेचं नेतेपद मिळेल त्यावर खूश राहावं. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबाबत घाणेरडी वक्तव्य करणे सोडावं. त्यात त्यांची पातळी दिसते, असंही हर्षवर्धन जाधवांनी म्हटलं
राज ठाकरे ज्या पक्षासोबत जातील त्यान्च्या बरोबर आम्ही  आहोत- प्रकाश महाजन
राज ठाकरे यांच्यासोबत काम करावं, अशी इच्छा होती, मात्र मधील १० वर्षाचा गॅप गेला. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यानुसार त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी मी पुन्हा राज ठाकरे सोबत आलो आहे. राज ठाकरे ज्या पक्षासोबत जातील त्यासोबत आम्ही आहोत. कारण जे राजकारण बदलत आहे, त्यात राज ठाकरेंसोबत जावं वाटलं. खूप दीर्घ काळापासून दूर होतो याची मला खंत आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

Post a Comment

0 Comments