शिक्षकांनी सर केले कळसूबाई शिखर

शिक्षकांनी सर केले कळसूबाई शिखर

सह्याद्री ट्रेकर्सचा उपक्रम
 वेब टीम नगर,दि. १४ - महाराष्ट्राचे सर्वोच्य शिखर अशी बिरुदावली मिरवणारे कळसूबाई शिखर नुकतेच नगर जिल्ह्यातील शिक्षकांनी सर केले. सह्याद्री ट्रेकर्सतर्फे या कळसूबाई नाईट ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. समुद्र सपाटीपासून 1646 मी. उंचवर असलेले हे शिखर चढाईच्या दृष्टीने मध्यम अवघड श्रेणित मोडते. मनमोहक सूर्योदय पाहण्यासाठी अनेक पर्यटक कळसूबाई शिखराची वाट पकडतात.
     यावेळी मात्र निसर्गाचा रुद्र अवतार ट्रेकर्सना पहायला मिळाला. गोठणबिंदूशी स्पर्धा करणारे निचांकी तपामान, तोंडवर होणार बर्फाच्या लहान-लहान कणांचा जोरदार मारा, आणि हातातील फोन उडवून लावण्याची ताकद बाळगणारा सोसाट्याचा वारा असा निसर्गविष्कार या ट्रेकर्संना अनुभवयास मिळाला. अशा प्रतिकूल वातावरणातही सर्वांनी जिद्दीने शिखर गाठले.
     पहाटे ४. ३०वा. शिखर मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पौर्णिमेचा नितळ शुभ्र चंद्रप्रकाश आणि जंगलातील निरव शांतता यांचा आनंद घेत आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता पणाला लावत सर्व ट्रेकर्सने चढायला सुरुवात केली. इ.५ वीत  शिकणारा अभिजित थोरात आणि वयाची पन्नाशी गाठणारे यशवंत गवळी  यांच्यासह ३१ शिलेदारांनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. कळसूबाई शिखरापर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: साडेतीन तास लागतात. या ग्रुपमधील नाना गाढवे, राम तुपे, प्रकाश मुरकुटे यांनी हे शिखर फक्त एक तास २१ मिनिटांत सर केले. यावेळी सामाजिक जबाबदारी जपत कळसूबाई शिखर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल जमा करुन शिक्षकांनी स्वच्छता मोहिम राबविली.
      सह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक आर.एल.शिकारे यांनी सांगितले की, दरमहा ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येते. या परिवाराची व्याप्ती वाढवून यावेळी विविध तालुक्यातील शिक्षकांना या मोहिमेत सहभागी करण्यात आले. निसर्गाच्या सहवासात जाऊन ऊर्जा मिळविण्यासाठी व शारीरिक, मानसिक तंदूरुस्ती वाढविण्यासाठी ट्रेकिंग आपल्याला मदत करते. या निमित्ताने या ठिकाणचे लोकजीवन चालीरिती, परंपरा आणि निसर्गाचे सौदर्य अनुभवण्याची संधी मिळते. पुढील ट्रेक दरम्यान आदिवासी मुलांना मोफत लेखन आणि वाचन साहित्य वाटप करण्याचे नियोजन सह्याद्री टेकर्सतर्फे करण्यात आल्याचे शिकारे यांनी सांगितले.
     ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनस्थळे यांचे संवर्धन करायला हवे याचे शाळेत धडे देणार्‍या गुरुजनांनी आपल्या कृतीद्वारे समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या स्त्युत्य उपक्रमाचे नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  हेमलता गलांडे यांच्यासह अनेकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments