मनपाच्या आवाहनाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रतिसाद; परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार


वेब टीम : अहमदनगर
प्रोफेसर कॉलनी परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता सर्वेक्षणात व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे.

प्रत्येक विक्रेत्याने स्वखर्चातून ‘डस्टबिन’ ठेवत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्यांचे आभार मानले.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात विविध उपाययोजना राबवत स्वच्छतेसाठी सर्वांच्या सहकार्यातून चळवळ उभी केली आहे. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छतेसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.

नागरिकांनाही स्वच्छता सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. शहरातील दुकानदार, भाजीविक्रेते व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना कचरा साचविण्यासाठी ‘डस्टबिन’ ठेवण्याचे आवाहन मनपाने केले होेते.

त्याला प्रतिसाद देत प्रोफेसर कॉलनी परिसरात खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी ‘डस्टबिन’ ठेवून इतरत्र कचरा पडणार नाही, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

शहर अभियंता इथापे यांनी त्यांची भेट घेऊन स्वच्छतेसाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. मनपाकडून विविध उपाययोजना सुरू असून, नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी इतरत्र कचरा न टाकता, घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments