थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाला जलसमाधी मिळण्याचा धोका


रावेरखेडी (मध्य प्रदेश) : जगाच्या इतिहासातील दुसरे मोठे युद्ध म्हणून नोंद असणाऱ्या पानिपत युद्धावर आधारित चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मात्र, मराठा साम्राज्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवणाऱ्या याच पेशव्यांचे पूर्वज थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे बाजीरावांचे स्मृतिस्थळ असून त्यास माहेश्वरी धरणात जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारे महाराष्ट्रातील राज्यकर्ते किंवा पेशव्यांच्या वंशजांनाही याच्याशी काही देणेघेणे नाही. उलट या स्मृतिस्थळाच्या संवर्धनासाठी मस्तानीचे वंशज मात्र आटोकाट प्रयत्न करत आहेत.
डिसेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्यानंतर आता आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत ‘ हा ऐतिहासिक चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मराठा साम्राज्याची घोडदौड हा या चित्रपटाचा विषय आहे. नेहमीप्रमाणेच ऐतिहासिक कथानक असणाऱ्या चित्रपटांसोबत होतात तसेच वाद पानिपतबाबतही झाले. त्यावर मात करत चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.
मध्य प्रदेश : पेशव्यांची समाधी
बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर थोरल्या बाजीरावांचे कार्य जगासमोर आले. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी बाजीरावांना पेशवेपद मिळवले. अवघ्या वीस वर्षांच्या काळात सुमारे ३६ लढाया जिंकून “अपराजित हिंदू सेनानी’ अशी उपाधी त्यांनी मिळवली. बाजीरावाच्या मृत्यूच्या वीस वर्षांनी पानिपत घडले. मराठा साम्राज्याला सर्वोच्च शिखरावर पोचवणारा आणि त्याच्या मृत्यूनंतरही आपली दहशत कायम ठेवणाऱ्या पहिल्या बाजीरावाची समाधी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी येथे त्यांच्या उत्तुंग पराक्रमाची साक्ष देते.
संघर्षातून खडतर मार्ग सुकर
मराठी माणसाला थोरल्या बाजीरावांचे समाधिस्थान फार परिचयाचे नसले तरी मध्य प्रदेशातील सनावद येथील नागरिकांसाठी तो आस्थेचा विषय आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत बाजीरावांच्या समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग खडतर होता. सनावद येथील काही बाजीरावप्रेमींनी हा मुद्दा उचलून धरला. त्यांनी “थोरले बाजीराव पेशवा सडक बनाव संघर्ष अभियान’ राबवले आणि त्यांच्या संघर्षातून येथे रस्ता तयार झाला. आता समाधीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला आहे. ही वास्तू पुरातत्त्व खात्याने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे तेथे एक केअरटेकरही नेमला आहे. वास्तू पाहिल्यानंतर मराठा साम्राज्याच्या या योद्ध्याचे स्मरण आणि स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही.
जलसमाधी मिळण्याचा धोका
इतिहासात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या या वीर योद्ध्याच्या समाधिस्थळाकडे शासनाचे कायम दुर्लक्ष रािहले आहे. यामुळेच येथून जवळच असलेल्या माहेश्वरी धरणाच्या संचित पाण्यात ती बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षापूर्वी समाधिस्थळात एक फूट पाणी साचले होते. मावेजा घेऊन हे समाधिस्थळ मोकळे करावे असे प्रयत्न धरण व्यवस्थापनाकडून झाले. पण “मावेजा नको समाधी वाचवा’ अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली. पुरातत्त्व विभागानेही हीच मागणी लावून धरली. त्यामुळे समाधीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याच्या निर्णयापर्यंत केंद्र शासन पोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी रमेश पवार यांच्या म्हणाले, “समाधी पाण्यात बुडणार नाही असा आम्ही प्रयत्न करत आहोत. सुरक्षा भिंत बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे.

Post a Comment

0 Comments