मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयानं आज हा निर्णय दिला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नीरव मोदीविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात खटला दाखल केला आहे. वारंवार समन्स बजावूनही नीरव न्यायालयीन कार्यवाहीला सामोरा जात नसल्याने त्याला नव्या कायद्यान्वये 'परागंदा आर्थिक गुन्हेगार' घोषित करावे, अशी विनंती ईडीनं अर्जाद्वारे केली होती. ईडीचा अर्ज मान्य करतानाच, न्यायालयानं नीरव मोदीला परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं. आता न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
१७ हजार ९०० कोटींचा घोटाळा; ५१ घोटाळेबाज पसार
दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर व्हा, अन्यथा तुम्हाला फरार म्हणून घोषित केले जाईल, असा इशारा देणारी नोटीस बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने मुख्य आरोपी नीरव मोदी तसेच त्याचा भाऊ निशाल मोदी व निकटवर्तीय सुभाष परब यांना जारी केली होती. या तारखेपर्यंत हे तिघे न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांना फरार घोषित केले जाईल आणि त्यानंतर त्यांची देशातील संपत्ती जप्त करण्याचे अधिकार सीबीआयला मिळणार आहेत.
.
0 Comments