शरद पवारांनी चक्क या चिमुकलीला सांगितले 'त्या' दिवशी पावसात भिजण्यामागचे गुपित!!



वेब टीम
एंटरटेन्मेंट डेस्क -   झी युवा या वाहिनीवर प्रसारित होणा-या 'युवा सिंगर एक नंबर' या सांगितिक कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अलिकडेच बारामतीच्या गदिमा सभागृहात पार पडला. या महाअंतिम सोहळ्याला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते. या कार्यक्रमाच्या एका अॅक्टमध्ये राधिका पवार या बालगायिकेने शरद पवारांना ५ असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी तिला एक गुपित सांगितले.
बारामतीमध्ये झालेल्या 'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बाल गायिका राधिका पवारने निवेदिका मृण्मयी देशपांडे हीला सांगितले की आज मी सुद्धा निवेदन करणार आहे आणि आज मी शरद पवारांना काही प्रश्न विचारणार आहे. शरद पवारांनाही या गोष्टीला संमती दिली आणि राधिका सरळ पवार बसले होते तिथे जाऊन तिने त्यांना प्रश्न विचारायला सुरु केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं नाव बरंच चर्चेत राहील होतं ते त्यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे. पाच दशकाहून अधिक काळ राजकीय प्रवास केलेले पवार किती हजर जबाबी आहेत आणि प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे युवा सिंगर एक नंबरच्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
राधिकाच्या प्रश्नांचा ओघ हा या प्रचार सभांना घेऊनच होता. तिने पहिला प्रश्न विचारला की, "तुमच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली असतानासुद्धा महाराष्ट्रात एवढ्या सभा तुम्ही कश्या घेतल्यात?" यावर पवार म्हणाले, ”मला कुणीतरी सांगितलं की मला हे जमणार नाही, तर ' मला हे जमणार नाही' हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही."
राधिका ने दुसरा प्रश्न विचारला "क्रिकेट जास्त आवडतं की कुस्ती?" यावर पवार म्हणाले, "दोन्ही खेळ माझ्या तेवढेच जवळचे आहेत त्यामुळे हे सांगणं कठीण आहे."
त्यानंतर राधिकाने त्यांना तिसरा प्रश्न विचारला, शाळेत मला निबंध लिहिताना मी मुख्यमंत्री झाले तर.. या विषयावर तिला काय लिहायचं ते कळत नाही, तर यावर पवार तिला म्हणाले, "तुम्ही आत्मविश्वासाने निबंधाची सुरुवात करायची "हो... मी मुख्यमंत्री होणारच..." यावर सभागृहात एकंच हशा पिकला.
राधिकाने चौथा प्रश्न विचारला, "मला कविता छान करता येतात, पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता हो?“ यावर पवार मिश्कीलपणे म्हणाले, "मी भाषणं देऊ शकतो पण कविता काही करू शकत नाही, तिथे तुझी आणि माझी परिस्तिथी सारखीच!"
राधिकाने पवारांना शेवटचा प्रश्न विचारला, ज्यात त्यांनी त्यांचे गुपित सांगितले. राधिकाने पवारांना प्रश्न केला, "मी पावसात भिजायला गेले तर माझे आजोबा मला खूप रागवतात तर तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं? राधिकाने विचारलेल्या या प्रश्नावर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळेच पवारांकडे पाहू लागले. यावर पवार राधिकाला म्हणाले "पावसात भिजल्यामुळे तुझे आजोबा जरी तुला रागावत असले, तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मते देऊन मतांचा पाऊस पाडला. यावर सभागृह टाळ्यांनी कडाडून निघाले.

Post a Comment

0 Comments