‘विधानसभेवर भाजपचाच झेंडा फडकवणार’, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर युतीवर प्रश्नचिन्हवेेेब टीम

लातूर - महाजनादेश यात्रेनिमित्त लातूर येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले असे दिसून आले. त्यांनी भाषणात एकदाही शिवसेना किंवा युतीचे सरकार याचाही उल्लेख केला नाही. उलट भाषणाच्या शेवटी विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार अशी घोषणा केली. त्यांनी केलेल्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) लातूर येथे दाखल झाली. रात्री भरपावसात त्यांची जाहीर सभा झाली. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या माहितीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरू असलेली वाटचाल याचीही जाणीव उपस्थितांना करवून दिली. मात्र अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात त्यांनी एकदाही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही किंवा युतीचे सरकार असेही म्हटले नाही. उलट भाषणाच्या अखेरीस लातूरकरांचा जनादेश मोदींना आहे का? मला आहे का? पालकमंत्री निलंगेकरांना आहे का? महापौरांना आहे का? असे प्रश्न उपस्थितांना विचारून होकार घेतला.

तसेच तुम्ही दिलेल्या जनादेशावर आता मुंबईला जाऊन विधानसभेवर युतीचा झेंडा फडकविला जाईल, असे न म्हणता भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावतो, अशी घोषणाही केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळल्याने आता चर्चेला उधाण आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments