साकळाई उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून तातडीने काम सुरू करा!

 साकळाई उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून तातडीने काम सुरू करा!

दुष्काळामुळे शेतकरी, पशुपालक अडचणीत; चारा छावण्या, चारा डेपो किंवा अनुदान जाहीर करण्याची मागणी

१२ नोव्हेंबरपासून हिवरे झरे येथे जनआंदोलन व रास्ता रोको करण्याचा साकळाई योजना कृती समितीचा इशारा

अहिल्यानगर : जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारने मंजुरी देऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप योजनेच्या कामाचे भूमिपूजन झालेले नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवाळीत भूमिपूजन करण्याचे जाहीर
केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार तातडीने भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. तसेच दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी चारा छावण्या, चारा डेपो सुरू करावेत किंवा पशुधन वाचविण्यासाठी तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी साकळाई योजना कृती समितीने केली आहे.

या मागण्यांसाठी गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून हिवरे झरे, ता. नगर येथे जनआंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, गोवर्धन कार्ले, नारायण रोडे, सोमनाथ घाडगे आदी उपस्थित होते.

साकळाई उपसा जलसिंचन योजना जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, या योजनेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी साकळाई योजना कृती समितीच्या वतीने यापूर्वी जनआंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारने योजनेला मंजुरी दिली. मात्र, मंजुरी मिळून सहा महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवाळीत योजनेचे भूमिपूजन करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे लाभधारक शेतकरी भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, शासनदरबारी अद्याप कोणत्याही ठोस हालचाली दिसून येत नसल्याची नाराजी कृती समितीने निवेदनात व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार योजनेचे भूमिपूजन लवकरात लवकर जाहीर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी लाभधारक शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

भूमिपूजनाची तारीख जाहीर न झाल्यास १२ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा जनआंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची सुरुवात हिवरे झरे, ता. नगर, जि. अहिल्यानगर येथून रास्ता रोको करून करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता आंदोलन सुरू होईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही समितीने दिला आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पाण्याअभावी शेतीचे नुकसान होत असताना पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर जनावरांचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत अथवा पशुधन वाचविण्यासाठी आवश्यक अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे. 

शेतकरी आणि पशुपालकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचा हात द्यावा. साकळाई योजनेचे भूमिपूजन आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा व अनुदानाच्या उपाययोजना या दोन्ही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात नसून, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे कृती समितीने निवेदनात स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments