६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात

 ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात

नाट्यगृहाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे महापौर ज्योती गाडे यांचे आश्वासन

अहिल्यानगर : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ च्या प्राथमिक फेरीतील अहिल्यानगर केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभास अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. ज्योती गाडे, मराठी चित्रपट निर्माते श्री. बलभीम पठारे, ज्येष्ठ रंगकर्मी सौ. मीरा महाजनी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. क्षितिज झावरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेचे अध्यक्ष श्री. प्रसाद बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक श्री. राजेश जाधव, श्री. अरुण शेलार आणि सौ. प्रिया नेर्लेकर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी महापौर सौ. ज्योती गाडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व नाट्यसंस्था आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच अहिल्यानगर शहरातील प्रलंबित नाट्यगृहाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. शहरातील नाट्यकलावंतांना हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापौरांनी दिलेल्या आश्वासनाचे उपस्थितांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक सागर मेहेत्रे यांनी केले, तर सहसमन्वयक जालिंदर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

या स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या नाट्यचळवळीला नवी ऊर्जा मिळणार असून, विविध नाट्यसंस्थांच्या दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

Post a Comment

0 Comments