अहिल्यानगरमध्ये १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान भव्य शिवमहापुराण कथा सप्ताह!

अहिल्यानगरमध्ये १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान भव्य शिवमहापुराण कथा सप्ताह!

११ हजार पंचमुखी रुद्राक्षांचे वाटप; दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांचे भाविकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर : पुढील पिढीला केवळ संपत्तीच नव्हे, तर धार्मिक आणि नैतिक संस्कारांचाही वारसा मिळावा, या उदात्त उद्देशाने अहिल्यानगर शहरात १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान भव्य श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सातदिवसीय आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दिल्लीगेट परिसरातील सातभाई मळा येथील डी.एड. कॉलेज मैदानावर दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत शिवमहापुराण कथेचे निरूपण होणार आहे. श्रीरामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान, केज (जि. बीड) येथील सुप्रसिद्ध कथाप्रवक्ते ह.भ.प. समाधानजी महाराज शर्मा आपल्या रसाळ वाणीतून शिवमहापुराणाचे निरूपण करणार आहेत.

या आध्यात्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित भाविकांना ११ हजार पंचमुखी रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दररोज कथा संपल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील भाविकांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सध्याच्या बदलत्या काळात तरुण पिढीवर धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक संस्कार होण्याची आवश्यकता आहे. भगवान शिव यांच्या शिकवणीतील जीवनमूल्ये, भक्ती, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीतील संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. केवळ भौतिक संपत्ती न देता मुलांना संस्कारांची शिदोरी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, या विचारातून या कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक तथा अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर आणि श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. धनंजय कृष्णाभाऊ जाधव यांनी अहिल्यानगर शहरासह परिसरातील भाविकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ : शिवपुराण महात्म्य, विद्येश्वर संहिता. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ : रुद्र संहिता, सती-पार्वती खंड, शिव-पार्वती विवाह. शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ : रुद्र संहिता, कुमार खंड, गणेश व कार्तिकेय चरित्र. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ : रुद्र संहिता, शुद्ध खंड, अर्धनारी नटेश्वर, नंदी वर्णन. सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ : उमा संहिता, कैलास संहिता. मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ : बारा ज्योतिर्लिंग महात्म्य. बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ : शिवमानस पूजा विधी, पंचाक्षर मंत्राची महिमा आणि कथा समापन.

या सातदिवसीय शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments