जंगलातील रणरागिणी : संजुक्ता पराशर यांच्या नेतृत्वाने मोडल्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या भिंती !

|| जागर शक्तीचा  ||  जागर कर्तृत्वाचा ||

जंगलातील रणरागिणी : संजुक्ता पराशर यांच्या नेतृत्वाने मोडल्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या भिंती !

कोब्रा कमांडो पासून महिला सक्षमीकरणापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

  काही विजय हे केवळ व्यक्तीचे नसतात, तर ते संपूर्ण समाजाच्या मानसिकतेला हादरा देणारे असतात. काही नियुक्त्या या केवळ प्रशासकीय आदेश नसतात, तर त्या वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या अदृश्य भिंतींवर केलेले धाडसी प्रहार असतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अत्यंत विशेष आणि आव्हानात्मक कोब्रा दलाचे नेतृत्व करण्याची ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारणाऱ्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी संजुक्ता पराशर यांची नियुक्ती ही अशाच परिवर्तनाची नांदी आहे. आसामची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजुक्ता पराशर यांनी १० सप्टेंबर २०२६रोजी जारी झालेल्या नियुक्ती आदेशानंतर कोब्राच्या दहा बटालियनच्या दलाची धुरा स्वीकारली. या दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला महानिरीक्षक ठरल्या आहेत. ही घटना केवळ एका महिला अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणारी नाही, तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील महिलांच्या वाढत्या सहभागाचे आणि नेतृत्व क्षमतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे.

         आपल्या समाजात आजही काही क्षेत्रे पुरुषांची मक्तेदारी असल्याचा गैरसमज घट्ट रुजलेला आहे. लष्कर, पोलीस, निमलष्करी दले, युद्धभूमी आणि दहशतवाद विरोधी मोहिमा यांसारख्या क्षेत्रांकडे पुरुषांच्या शौर्याशी जोडून पाहिले जाते. महिलांना या क्षेत्रांत संधी मिळाली, तरी त्यांच्याकडे अनेकदा सहानुभूतीच्या किंवा अपवादात्मक नजरेने पाहिले जाते. परंतु संजुक्ता पराशर यांचा प्रवास सांगतो की, शौर्य हे पुरुषांचे मक्तेदारीचे क्षेत्र नाही आणि नेतृत्व ही लिंगावर अवलंबून असणारी क्षमता नाही. जंगलातील प्रतिकूल परिस्थिती, जीवघेणे धोके, कठीण मोहिमा आणि सतत सज्ज राहण्याची गरज असलेल्या कोब्रा दलाचे नेतृत्व करणे ही निश्चितच मोठी जबाबदारी आहे. या दलाला जंगलातील युद्धतंत्र, गनिमी कावा, दीर्घ पल्ल्याच्या मोहिमा, घात आणि प्रतिघाताच्या कारवायांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. छत्तीसगड आणि झारखंडमधील नक्षलविरोधी कारवायांपासून ते मणिपूरमधील संवेदनशील परिस्थितीपर्यंत विविध आव्हानात्मक क्षेत्रांत या दलाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अशा दलाची धुरा एका महिलेने स्वीकारणे म्हणजे केवळ इतिहासात नाव नोंदवणे नव्हे, तर महिलांच्या क्षमतेबाबत समाजाच्या मनात असलेल्या पूर्वग्रहांना कृतीतून उत्तर देणे होय.

          संजुक्ता पराशर यांना ‘आसामची आयर्न लेडी’ ही ओळख सहजासहजी मिळालेली नाही. २०१ते २०१४या काळात सोनितपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी सशस्त्र बोडो बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे नेतृत्व केले. अवघ्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली १६ बंडखोर निष्प्रभ करण्यात आल्याचे आणि पाच डझनहून अधिक बंडखोरांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या आकडेवारीपलीकडे त्यांच्या कार्याचे खरे महत्त्व दडलेले आहे. दहशतवाद, सशस्त्र बंडखोरी आणि हिंसाचाराच्या सावटाखाली जणाऱ्या सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना देणे, हे कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्यापुढील मोठे आव्हान असते. बंदुकीच्या धाकापेक्षा कायद्यावरील विश्वास मोठा असतो आणि अधिकारापेक्षा जबाबदारीची जाणीव महत्त्वाची असते. सुरक्षा दलातील अधिकाऱ्याच्या यशाचे मोजमाप केवळ कारवायांच्या संख्येने नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेतून आणि शांततेच्या पुनर्स्थापनेतून व्हायला हवे. पराशर यांच्या कार्यप्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते ते मैदानी अनुभव, धाडसी निर्णयक्षमता आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या बळावर नेतृत्वाची ओळख निर्माण होते.

          संजुक्ता पराशर यांची कारकीर्द केवळ पोलीस ठाणे किंवा प्रशासकीय कार्यालयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेत त्यांनी २९१७ ते २०२३या कालावधीत काम केले. पोलीस अधीक्षक म्हणून सुरुवात करून त्यांनी उपमहानिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. दहशतवादविरोधी तपास आणि मध्य प्रदेशातील रेल्वे स्फोटाच्या प्रकरणासह विविध संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. या प्रवासात तपास, कायदा-सुव्यवस्था, दहशतवादविरोधी कारवाई आणि संघटनात्मक नेतृत्व अशा विविध क्षेत्रांतील अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतही वैविध्य दिसते. दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला. ज्ञान, अनुभव आणि धैर्य यांचा संगम झाला की नेतृत्वाला नवी उंची प्राप्त होते. संजुक्ता पराशर यांचा प्रवास या वस्तुस्थितीची साक्ष देतो.

          आज भारतातील महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, प्रशासन, न्यायव्यवस्था, क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरीही निर्णयक्षम नेतृत्वाच्या सर्वोच्च पातळ्यांवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज कायम आहे. सुरक्षा दलांसारख्या क्षेत्रांत महिलांना संधी देताना केवळ प्रतीकात्मक प्रतिनिधित्व पुरेसे नाही. त्यांना प्रशिक्षण, समान संधी, आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षित कार्यपरिसर आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम वातावरण मिळणे आवश्यक आहे. महिलांना एखाद्या पदावर नियुक्त केल्यानंतर त्यांच्या कामगिरीकडे केवळ ‘महिला म्हणून’ पाहणे हा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमानच ठरू शकतो. त्यांचे मूल्यमापन व्यावसायिक क्षमता, निर्णयक्षमता, नेतृत्व, शिस्त आणि कामगिरीच्या आधारेच व्हायला हवे. संजुक्ता पराशर यांच्या नियुक्तीचा खरा संदेश हाच आहे. महिलांना संधी दिली की त्या सक्षम होतात, असे नाही त्या सक्षम असतात म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे.

         देशातील असंख्य तरुणी आज पोलीस सेवा, लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांत प्रवेश करण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र सामाजिक बंधने, कौटुंबिक अपेक्षा, सुरक्षिततेबाबतच्या चिंता आणि पारंपरिक मानसिकता यांमुळे अनेक मुली आपल्या स्वप्नांपासून दूर राहतात. संजुक्ता पराशर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा प्रवास या मुलींना आत्मविश्वास देतो. ‘तू मुलगी आहेस म्हणून हे काम तुझ्यासाठी नाही,’ असे सांगणाऱ्या प्रत्येक आवाजाला ‘माझ्या क्षमतेला लिंगाची मर्यादा नाही,’ असे उत्तर देण्याची ताकद त्यांच्या यशातून मिळते. मात्र प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देऊन थांबणे पुरेसे नाही. मुलींना दर्जेदार शिक्षण, शारीरिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि आर्थिक-सामाजिक पाठबळ देणे ही कुटुंबाची, समाजाची आणि शासनाची सामूहिक जबाबदारी आहे.

          महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आपण अनेकदा ऐकतो. महिला दिनाच्या निमित्ताने भाषणे होतात, गौरव होतात, अभिनंदनपर संदेश दिले जातात. परंतु खरे सक्षमीकरण हे केवळ शब्दांतून होत नाही. ते घडते समान संधी, समान जबाबदारी आणि समान विश्वासातून. एखादी महिला कठीण जबाबदारी स्वीकारते तेव्हा तिच्या धैर्याचे कौतुक व्हावेच, पण त्याचबरोबर पुढील हजारो महिलांसाठी त्या क्षेत्राचे दरवाजे अधिक खुले व्हावेत, हीदेखील अपेक्षा असायला हवी. संजुक्ता पराशर यांची नियुक्ती ही एका व्यक्तीची उपलब्धी आहेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत महिलांच्या नेतृत्वाविषयीच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या नियुक्तीनंतर महिलांना अधिकाधिक नेतृत्वाच्या संधी मिळतील का, प्रशिक्षण आणि सुविधांमध्ये समानता येईल का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

       संजुक्ता पराशर यांची कहाणी ही केवळ शौर्याची कहाणी नाही, ती स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची, अडथळ्यांना सामोरे जाण्याची आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची कहाणी आहे. कोब्रासारख्या अत्यंत आव्हानात्मक दलाचे नेतृत्व स्वीकारताना त्यांनी भारतीय महिलांसमोर एक नवी क्षितिजे उघडली आहेत. त्यांच्या पुढील कार्यकाळात सुरक्षा, शिस्त, व्यावसायिकता आणि नागरिकांच्या हिताचे भान यांना सर्वोच्च स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक हाताला बळ हवे असते, तो हात पुरुषाचा असो वा स्त्रीचा! आज संजुक्ता पराशर यांच्या रूपाने एक महिला इतिहास घडवत आहे. उद्या त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन हजारो मुली नवे इतिहास घडवतील. त्या दिवशी महिला सक्षमीकरणाची खरी मशाल प्रज्वलित होईल. जंगलातील रणभूमी असो वा समाजातील संघर्षभूमी, जिंकण्याची क्षमता लिंगात नसते, ती जिद्दीत असते! आणि हीच जिद्द संजुक्ता पराशर यांच्या प्रवासाचा सर्वांत धारदार संदेश आहे.

                                             

                                                                                                                                  -प्रवीण बागडे 

Post a Comment

0 Comments