शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
सर्व प्रसिद्ध देवी मंदिरात विधिवत घटस्थापना
अहिल्यानगर : अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते.प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साज-या होणा-या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र.१०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.
आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. नगरशहरातील सर्व प्रसिद्ध देवीमंदिरांमध्ये आज सकाळीच विधिवत घटस्थापना करण्यात आली . केडगाव, बुऱ्हाणनगर ,त्याचबरोबर,जेलरोडची देवी ,भक्ताची देवी,नालेगावातील तुळजाभवानी , घासगल्लीतील कासार समाजाची कालिकादेवी ,सारंडालेनं मधील सप्तशृंगी ,दालमंडई तील हेमवतीदेवी मंदिर ,बरोबरच उपनगरातील रेणुकामाता मंदिर ,झोपडीकॅंटीन परिसरातील रमादेवी मंदिर तर पाईप लाईन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिरातून विधिवत ,पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.
केडगाव रेणुकामाता मंदिरात सकाळी साडेआठच्या सुमारास कोतकर -साबळे परिवाराच्याहस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिराचे सर्व पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होता.सालाबाद प्रमाणे यंदाही मंदिरात नित्य पूजांसह विशेष पूजांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिरात कुंकुमार्चन ,व अन्य पूजांचे आयोजन करण्यात आले आहे . सातव्या माळेला केडगाव देवीची यात्रा भरते, तर अष्टमीला चंडिका होम केला जातो. यामंदीरात होणारी भाविकांची गर्दी पाहता सर्वाना दर्शन मिळावे यासाठी स्त्री पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र रांगांमधून दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती मंदिराचे पुजारी चंद्रशेखर गुरव यांनी सांगितली.
बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिरात आज दुपारी बारा वाजता विजय भगत,अभिषेक भगत ,सुरेखा भगत ,दूर्गा भगत,सविता भगत ,कुणाल भगत ,अंकिता भगत यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली . सालाबाद प्रमाणे यंदाही मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून यंदा मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे . तिसऱ्या माळेला या देवीची यात्रा असते . त्याचा दिवशी भिंगार येथे पलंग पालखीची भेट होते हा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदाचे ऊन पाहता भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून मंदिर परिसरात मांडव घालण्यात आले आहेत. तसेच मंदिराच्या भव्य हॉल मध्ये भाविकांना सहजगत्या देवीचे दर्शन व्हावे यासाठी बॅरिकेटस लावून दर्शन रांगेची सोय केली असल्याचे विजय भगत यांनी सांगितले .
केडगाव ,बुऱ्हाणनगर यादोन्ही मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होत असल्याने तसेच या दोन्ही मंदिरात पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविक पायी येत असल्याने दोन्ही मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची मनपा आणि ग्रामपंचायत प्रशासनाने डागडुजी करून पथदिव्यांचीही सोय केली. असल्याने भाविकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.


0 Comments