संजीवनी युनिव्हर्सिटीचा‘लिंक्डइन लर्निंग’सोबत करार
विद्यार्थ्यांना 15 हजारांहून अधिक ऑनलाइन कोर्सेसचा लाभ
कोपरगाव : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य, उद्योगाभिमुख ज्ञान आणि रोजगार क्षमतेसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक कौशल्यांनी सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजीवनी विद्यापीठाने जगातील अग्रगण्य व्यावसायिक शिक्षण व्यासपीठ ‘लिंक्डइन लर्निंग’ सोबत सामंजस्य करार (एमओयु) करार केला आहे. या सहकार्यामुळे संजीवनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तब्बल १५ हजारांहून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. त्याद्वारे उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान, जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त प्रमाणपत्रे व प्रभावी व्यावसायिक प्रोफाइल तयार करण्याची संधी मिळणार आहे.
संजीवनी विद्यापीठात आयोजित सामंजस्य करार सोहळ्यास प्रेसिडेंट श्री. अमित कोल्हे, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, ऑनलाइन एज्युकेशन अँड डिस्टंस लर्निंग स्कूलचे डीन डॉ. विनोद मालकर आणि स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीच्या डीन डॉ. कविता राणी, लिंक्डइन लर्निंगतर्फे श्री. अमित मुखजी, श्री. शिवप्रसाद लोंगानी आणि श्री अनूप मेनन यांनी सहभाग घेतला.
या सामंजस्य करारामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा यातील दरी कमी करण्यास मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस ऍनालिटिक्स, नेतृत्व विकास, संवाद कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फायनान्स, उद्योजकता तसेच इतर अनेक उदयोन्मुख तंत्रज्ञान व व्यावसायिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
लिंक्डइन मोठे व्यावसायिक नेटवर्किंग व्यासपीठ
२०० हून अधिक देशांतील एक अब्जांहून अधिक सदस्य असलेले लिंक्डइन हे जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्किंग व्यासपीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थी स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करू शकतात, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात, रोजगाराच्या संधी शोधू शकतात आणि स्वतःची कौशल्ये प्रभावीपणे सादर करू शकतात.
मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, आयबीएम, ऍक्सेन्चर, डेलॉइट, इन्फोसिस, टीसीएस आणि मेटा यांसारख्या जागतिक आघाडीच्या कंपन्या लिंक्डइन लर्निंगच्या प्रमाणपत्रांना मान्यता देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बायोडेटा अधिक प्रभावी होतात. रोजगारक्षमता वाढते आणि भविष्यातील करिअरसाठी ते अधिक सक्षम होतात.
दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी संजीवनी विद्यापीठ आणि लिंक्डइन लर्निंगच्या प्रतिनिधींमध्ये सामंजस्य कराराची अधिकृत देवाणघेवाण करण्यात आली.
लिंक्डइन लर्निंगसोबतचे हे सहकार्य संजीवनीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्यांपलीकडे जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरेल. भविष्यातील कौशल्यांनी परिपूर्ण, उद्योगाभिमुख आणि जागतिक दृष्टीकोन असलेले पदवीधर घडविण्याच्या संजीवनी विद्यापीठाच्या ध्येयाला या उपक्रमामुळे अधिक बळ मिळेल. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आजीवन शिक्षणाची संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.
- अमित कोल्हे, प्रेसिडेंट- संजीवनी युनिव्हर्सिटी
.jpg)


0 Comments