जागतिक जल दिनानिमित्त संजीवनी कॉलनीत 'जल' जागृती कार्यक्रम
पाणी जपून वापरण्याचे आयुक्त डांगे यांचे आवाहन
अ.नगर : संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निसर्गाचे हे अनमोल वरदान सध्या मोफत असले तरी भविष्यात पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील शुद्ध पाण्याची सध्या असलेली उपलब्धता लक्षात घेता प्रत्येकाने पाणी जपून व काटकसरीने वापरणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
22 मार्च जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ग्रीन कॉलनी संजीवनी कॉलनीमध्ये हरिभुमी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित जलजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आयुक्त डांगे बोलत होते.
घरगुती गार्डन पाईपला प्रेशर नोझल / जेट जोडल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी यावेळी आयुक्त डांगे यांच्यासमोर करून दाखवले. याचबरोबर हे गार्डन पाईप प्रेशर नोझल / जेट कॉलनीतील सदस्यांना जागतिक जलदिनानिमित्त वितरित करण्यात आले.
यावेळी पाणी बचती संदर्भात मार्गदर्शन करताना आयुक्त श्री डांगे म्हणाले की, नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध होणारे पाणी पेयजल काटकसरीने वापरावे, वाहने धुतांना, अंगणामध्ये सडा मारतांना होणारा पेयजलाचा अपव्यय टाळावा, नादुरुस्त जलवाहिन्या दुरुस्त करून घेणे, गळके / टीपकणारे नळ दुरुस्त करून घेणे, पिण्यासाठी पेल्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे, एक-दोन दिवसापूर्वीचे पिण्याचे पाणी टाकून न देता त्याचा इतर वापर करावा, वॉश बेसिनचा नळ गरजेपुरता वापरावा, धुण्याचे पाणी झाडांसाठी वापरण्याचे नियोजन करावे आदी साध्या सोप्या उपाययोजना करून पाण्याचा अपव्यय सहज टाळता येऊ शकतो असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
यावेळी कॉलनीतील जेष्ठ सदस्य शांतीलाल गुगळे, सुरेश चांडक, विनय बिनायके, सुनील जोशी,यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल युनिट बसविण्याचा संकल्प केला. तर सुमित चांडक यांनी घराच्या छतावरील पाण्याचे संवर्धन ( रूफ वॉटर हार्वेस्टिंग ) करण्यासाठी यंत्रणा बसविण्याचा निर्धार केला. यावेळी प्रशांत मते, चंद्रकांत शिपणकर, अभय ललवाणी, पारस चुडीवाल, सलिम शेख, यश गुगळे, आशिष बळे आदी उपस्थित होते.
0 Comments