श्रद्धा, साधना आणि समाजसेवेची प्रेरणा हा अमूल्य वारसा

 श्रद्धा, साधना , समाजसेवेची प्रेरणा हा अमूल्य वारसा


 अशोक (बाबूशेठ) बोरा यांच्या हस्ते ‘मेरी भावना, मेरे शब्द’ पुस्तकाचे विमोचन

संभाजीनगर : येथे चातुर्मास निमित्त विराजित आचार्य सम्राट परम पूज्य आनंद ऋषीजी म. सा यांचे अंतेवासी शिष्य, आगम ज्ञाता, अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प. पू. प्रविण ऋषिजी म. सा. यांचे चातुर्मास उत्साहपूर्ण वातावरणात जिनशासनाची प्रभावना करत धर्ममय पद्धतीने संपन्न होत आहे. 

सदर चातुर्मासात उपाध्याय प्रवर प. पू. प्रविण ऋषिजी म. सा. यांच्या आशीर्वादाने श्रीमती सुनीता गिरिशजी चोरडिया लिखित पुस्तक ‘मेरी भावना, मेरे शब्द’ याचे भव्य विमोचन सोहळा पूज्यश्रींच्या जन्मदिनानिमित्त काल अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे ट्रस्टी अशोक (बाबूशेठ) सिमरतमल बोरा यांच्या शुभहस्ते पार पडला. 

‘मेरी भावना, मेरे शब्द’ हे पुस्तक श्रीमती सुनीता चोरडिया यांच्या चातुर्मासातील अनुभूती व अध्यात्मिक साधनेचे प्रतिबिंब आहे तर त्यात श्रीमती चोरडिया यांनी त्यांच्या मनोभावना मांडल्या आहेत. पुस्तकात चातुर्मासाच्या अनुषंगाने केलेली उपासना, तपस्या, आणि आध्यात्मिक प्रवासाचे प्रभावी वर्णन आहे.

या चातुर्मासात विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि संभाजीनगरचे माजी मंत्री श्री. राजेंद्र बाबू दर्डा यांनी देखील उपाध्याय प्रवर यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.

यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना उपाध्याय प्रवर प्रविण ऋषिजी महाराज साहेबांनी आचार्य भगवंत आनंद ऋषिजी महाराजांच्या जन्मस्थळ, चिचोंडी येथील आनंद तीर्थ क्षेत्र उभारणीविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे, प्रबुद्ध विचारक परम पूज्य आदर्श ऋषिजी म. सा. यांच्या प्रेरणेतून अहिल्यानगर येथे कार्यरत आनंद ऋषिजी हॉस्पिटल, तसेच कल्याण रोड येथील शैक्षणिक संकुल, युनिव्हर्सिटी, नर्सिंग कॉलेज आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

यावेळी बोलताना बाबूशेठ बोरा यांनी सांगितले की ‘मेरी भावना, मेरे शब्द’ या पुस्तकाच्या निमित्ताने समाजात अध्यात्मिक विचारांना प्रेरणा मिळत असून, समाजसेवेची दिशा अधिक सुस्पष्ट होत आहे. 

विमोचनाच्या वेळी लेखिका सुनीता चोरडिया, चातुर्मास अध्यक्ष पंकज फुलफगर, गिरीश चोरडिया आदी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments