जगभराची चिंता पुन्हा वाढवणाऱ्या चीनचा मोठा दावा; म्हणे, “करोना परिस्थिती…”
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
वेब टीम बिजींग : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाग्रस्तांची वाढ झाल्यामुळे येथे रुग्णालये अपुरी पडत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच रुग्णसंख्या वाढत असताना चीनकडून तेथील करोनास्थितीबाबत माहिती दिली जात नाहीये, असा आरोप केला जात आहे. असे असतानाच चीनने आमच्याकडील करोनास्थिती नियंत्रणात आहे, असे सांगितले आहे. तसेच चीनने तेथील करोनास्थिती स्पष्ट करणारी आकडेवारीदेखील जागतिक आरोग्य संघटनेकडे दिली आहे.
चीनने काही दिवसांपूर्वी आपल्या झिरो कोविड पॉलिसीमध्ये तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोजण्यासाठीच्या निकषांतही बदल केला. या निर्णयानंतर मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून तेथे करोनामुळे फक्त २३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून चीनकडून तेथील करोनास्थितीची माहिती, आकडेवारी दिली जात नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती. अशीच चिंता युरोपीयन देशांनीही बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही चीनमधील करोना हाताळणीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता चीनने करोनासंदर्भातील आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या देशांनी चीनमधून परतणाऱ्यांसाठी अनेक निर्बंध जारी केले आहेत. याबाबत चीनमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चीनने करोनास्थितीबाबतची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. येथील करोनास्थिती नियंत्रणात आहे. प्रवासासाठी निर्बंध लावण्याऐवजी लोकांनी मुक्तपणे प्रवास, संचार करावा यासाठी अन्य देशांनी सोबत काम केले पाहिजे,” अशी भावना निंग यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चीनमध्ये मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे अनेक देशांनी वेगेवगळे प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहेत. अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. असे निर्बंध लागू करणाऱ्या देशांमध्ये गुरुवारी (६ जानेवारी) जर्मनी आमि स्वीडन या देशांचाही समावेश झाला आहे.
0 Comments