पे अँड पार्क योजना राबविण्याच्या राष्ट्रवादी, भाजपच्या प्रस्तावालाही काँग्रेसचा विरोध

पे अँड पार्क योजना राबविण्याच्या राष्ट्रवादी, भाजपच्या प्रस्तावालाही काँग्रेसचा विरोध 

३२ कोटीच्या मलिद्यासाठी राष्ट्रवादीचे नागरिकांना खड्ड्यात घालत संगनमत - दशरथ शिंदे, मनोज गुंदेचा

वेब टीम अहमदनगर  : काल झालेल्या महासभेमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या नगरसेवकांनी आयत्या वेळच्या विषयात पे अँड पार्क योजना तात्काळ राबवात निवीदा काढून ठेकेदार नेमण्याची जोरदार मागणी केली. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून शहरातील खड्ड्यांमध्ये रस्ते नष्ट झालेले असताना कोणत्या रस्त्यांच्या बाजूला यांना पे अँड पार्क योजना राबवायची आहे ? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पे अँड पार्कचे ठेके यांना निविदा काढून द्यायचे आहेत. त्यासाठी नागरिकांना भुर्दंड देण्याची योजना यांनी आखली असल्याची टीका करत आधीच नागरिक मोठ्या प्रमाणात मनपाला कर भरत असताना त्यांच्या खिशातून अजून किती पैसे ओरबडून घ्यायचे आहेत ? असा सवाल काँग्रेसच्यावतीने माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी उपस्थित केला आहे. 

शहरात रस्त्यांची दुरावस्था आहे. खड्ड्यांमध्ये शहर हरवले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या प्रश्नावर शासन, मनपाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केल्यानंतर शहरात धीम्या गतीने काही भागांमध्ये कामे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होताना दिसत असून यातून लूट सुरु आहे. मनपा आधीच मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कर संकलन करत आहे. या पैशातून यांना रस्त्यांची कामे करण्याची सद्बुद्धी तर होत नाही. मात्र स्मशानभूमीसाठी पूर्वीपासून जागा आरक्षित असताना देखील आरक्षित नसणारी जागा 32 कोटी रुपयांच्या चढ्या भावाने घेण्याचा घाट हे लोक घालत आहेत. या खरेदीसाठी पैसे कमी पडतात की काय म्हणूनच यांनी आता शहरात पे अँड पार्क योजना राबवण्याची मागणी लावून धरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेसने म्हटले आहे की, पुढील महासभेत हा विषय सादर न झाल्यास सभा चालू दिली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर यांनी काल सभागृहात दिला. या विषयासाठी ८-१० दिवसांत विशेष महासभा लावली जाईल असे राष्ट्रवादीच्याच असणाऱ्या उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले. पे अँड पार्कसाठी राष्ट्रवादीच्याच डॉ.सागर बोरुडे, भाजपच्या स्वप्निल शिंदे या नगरसेवकांनी सभागृहात मागणी लावून धरली. पे अँड पार्क हा विषय आर्थिक बाबीशी निगडित असून याबाबत मनपाने अद्याप कोणतेच धोरण निश्चित केलेले नाही. राष्ट्रवादी, भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये रस्त्यांची दैनावस्था असताना यांनी पे अँड पार्कसाठी धरलेला आग्रह चुकीचा आहे. गर्दीत शिरून खिसे कापणारे नागरिकांना माहिती होते. मात्र आता महापालिकेच्या माध्यमातून खिसे कापणाऱ्यांची टोळी नागरिकच येणाऱ्या मनपा निवडणुकीत पिटाळून लावतील असा टोला काँग्रेसने लगावला आहे. 

32 कोटी रुपयांची स्मशानभूमी जागा खरेदी प्रकरणाबाबत काँग्रेसने नवीन मुद्दे उपस्थित करुन पुन्हा गंभीर आरोप करत याबाबतची काही कागदपत्रे माध्यमांना उपलब्ध करून दिली आहेत. महापौर, आयुक्त यांच्यासह राष्ट्रवादी नगरसेवक संपत बारस्कर यांनी स्मशानभूमीच्या आरक्षित असणाऱ्या आणि आरक्षण नसताना विकत घ्यायचा घाट घेतलेल्या जागांची स्वतः स्थळ पाहणी केलेली आहे. त्या स्थळ पाहणीचा नगररचनाचा अहवाल देखील काँग्रेसने माध्यमांना उपलब्ध करून दिला आहे. 

या जागेमध्ये पडद्या आडून काही राजकीय लोक पार्टनर आहेत. जागा मनापाच्या वतीने खरेदीसाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरू आहे. संगनमतातून राष्ट्रवादीने जनतेच्या पैशांची लूट चालवली आहे. हे नागरीकांच्या हितासाठी काम करतात, की मनपाची लूट करतात? असा सवाल काँग्रेसने केला आहे. त्यामुळे जागा खरेदी प्रकरणासह पे अँड पार्क प्रकरणामध्ये काँग्रेस जनहितार्थ निर्भीडपणे आडवा पाय घालण्याचे काम करेल. यापूर्वी देखील किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा योजना खाजगीकरणाचा डाव, तिप्पट करवाढीचा डाव काँग्रेसने उलथून लावला. 

Post a Comment

0 Comments