भक्तांच्या हाकेला धावणारी रेणुकामाता

।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।

भक्तांच्या हाकेला धावणारी रेणुकामाता 

सुयोग गृह निर्माण सोसायटी येथे  माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचे हे मंदिर आहे. श्री रेणुकामाता येथे तांदळा व मूर्ती अशा दोन्ही रूपात विराजमान झाली आहे. सुयोग गृहनिर्माण मंडळाने मंदिर उभारून सुयोग ट्रस्टची स्थापना केली व मंदिराची जबाबदारी ट्रस्टवर सोपवली.भाद्रपद प्रतिपदा ते तृतीया असे तीन दिवस प्राणप्रतिष्ठा होम-हवन कलशारोहण असा सोहळा शास्त्र व वेदोक्त पद्धतीने संपन्न झाला.

नित्य-नैमित्तिक धार्मिक विधी संपन्न होत असल्याने मंदिराचे पावित्र्य व मांगल्य जपले जाते.हे एक जागृत देवस्थान आहे शक्तीपीठ आहे अशी श्रद्धा सर्व भाविकांची आहे.मुख्य पीठा शेजारी श्रीगणेशाची रेखीव भव्य आणि वरदहस्त असलेली सुबक मूर्ती आहे.श्री गणेश व श्री रेणुकामाता दोन्ही देवतांची नित्यपूजा यथासांग होते.अथर्वशीर्षाचे व श्रीसुक्ताच्या आवर्तनाने अभिषेक होऊन वस्त्रालंकारांनी नानाविध परीमल पुष्पाने पूजा अर्चना संपन्न होते.प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात सुयोग ट्रस्टचे विश्वस्त आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी खूप कष्ट घेऊन मातेची सेवा केली. इतकेच नव्हे तर पूजाविधी सर्वजण मिळून करत माता-भगिनी साडी नेसवण्या करता श्री रेणुकामातेच्या सेवेत येत असत.श्री सूक्त सर्वांचे मुखोद्गत व्हावे याकरिता अभ्यास वर्ग घेण्यात आला. श्रद्धेने भक्तिभावाने हे कार्य अखंड चालू राहिल्याने एक शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण झाली. सर्व विश्वस्त निस्वार्थपणे कार्यरत आहेत.दानपेटीतील रक्कम,देणगी रुपाने आलेली रक्कम यांचा हिशोब असतो ही सर्व रक्कम बँक खात्यात जमा होते ट्रस्टचे नियमितपणे ऑडिट केले जाते.

भक्तीमार्गात मन प्रसन्न राहावे,चित्त शांत असावे लागते विज्ञान युगाचा विचार करून मंदिर व परिसराची स्वच्छता ठेवली जाते. दोन मजली या पेक्षाही उंच गेलेली वनराई परिसरात जोपासली गेली आहे सुंदर शेड उभारून होम-हवनाची व्यवस्था आहे. मंदिरात प्रवेश करताच सात्विक लहरींचा आपणास लाभ होतो.मातेचे प्रसन्न रूप नजरेचा ठाव घेते पितळी सिंहासन आणि पादुका पर्यंत जाताना मन भारावून जाते. नंदादीपाचा प्रकाश भक्तांकडून आलेल्या किमती साड्या,  आकर्षक पुष्परचना, मातेचे भव्य अलंकार, शंख , घंटा  यांचे स्थान व शेजारी असलेले असलेला तांदळा पाहून भक्त नतमस्तक होतो परिसरात जितका मंत्रोच्चार होईल भजन, कीर्तन, प्रवचन, धार्मिक ग्रंथांचे वाचन व निरूपण होईल तितके पावित्र्य वाढते.याशिवाय वातावरण चैतन्यमय होते,या सत्वगुणांचा साधकांना उपयोग होतो. भक्तांची आणि विश्वस्तांची अशी श्रद्धा आहे व त्याचा सर्वांना अनुभव आहे.

या मंदिरात पुढीलप्रमाणे उत्सव साजरे केले जातात जन्मोत्सव (वर्धापन दिन), गणेशोत्सव,  नवरात्री उत्सव , शारदीय व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम दसरा सीमोल्लंघन,  दिवाळीतील दीपोत्सव, मकरसंक्रांत, गुढीपाडवा , वटपौर्णिमा याशिवाय राष्ट्रीय कर्तव्य समाजप्रबोधन, मानवी जीवनाशी तन्मयता, सुखी संसार, सांस्कृतिक जडणघडण, एकात्मता व ग्रंथांचा भारतीय संस्कृतीत प्रसार करण्याकरता संत महंत विद्वतजनांना पाचारण केले जाते. 

आजपर्यंत प.पू स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प.पू.माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती,प.पू.वा.ना.उत्पात (भागवताचार्य)प.पू.स्वामी मुकुंदकाका जाटदेवळेकर,प.पू.पूर्णवाद वर्धिष्णू एडवोकेट विष्णू महाराज पारनेरकर,प.पू.चारुदत्त आफळे शास्त्री,प.पू.स्वामी भौमानंद महाराज,प.पू. स्वामी विष्णुपदानंद महाराज,प.पू. स्वामी सुवेज्ञेयानंद महाराज, प.पू.दिनकर महाराज वरुरकर,प.पू.चितळे शास्त्री यांची ज्ञानसत्रे संपन्न झाली आहेत. 

१६ संस्कारांमध्ये व्रतबंध संस्कार श्रेष्ठ मानला जातो जातीचा विचार न करता ज्या समाजामध्ये व्रतबंधाची परंपरा आहे,अशा सर्व स्तरातील बटूनसाठी  सामुदायिक व्रतबंध सोहळा गेली पंधरा वर्षे उत्साही वातावरणात संपन्न होतो.शास्त्रोक्त पद्धतीने व थाटामाटात संपन्न होतो.जन्मोत्सव, व्रतबंध सोहळा अशाप्रसंगी मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करून अन्नदान केले जाते.

प्रत्येक अधिक महिन्यात संपूर्ण महिनाभर रोज दुग्धधारा अभिषेक केला जातो.त्याचप्रमाणे विष्णू यागाचे आयोजन केले जाते.  विश्वस्तांकडून व भक्तांकडून  अपूपदान केले जाते.त्याच वेळी परिसरातील भाविकांसाठी जामात पूजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम होतो व त्यामुळे परिसरामध्ये चैतन्य निर्माण होते.  अधिक मासामध्ये अन्नकोट या धार्मिक विधीला विशेष प्राधान्य असते नित्य दर्शनार्थी व साधकांच्या वतीने यथाशक्ती 56 भोगासाठी घरी तयार केलेले अपूपदान  व ज्यांना घरी करणे शक्य नाही त्यांचेकडून मिठाई जमा होते महाआरती नंतर ही सर्व मिठाई प्रसाद म्हणून वाटण्यात येते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने मेहूण (पती-पत्नी) यांना पाचारण करून पूजन केले जाते व मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. 

सुयोग ट्रस्ट यांची ट्रस्ट म्हणून सामाजिक बांधिलकी असते ती जपण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत,  स्वातंत्र्य सैनिकांना आरतीसाठी निमंत्रित करून त्यांचा उचित सत्कार केला जातो राष्ट्रीय आपत्ती प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संरक्षण निधी मदत केली जाते. 

Post a Comment

0 Comments