हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार

हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार

वेब टीम उदयपूर :  शिवणकाम व्यावसायिकाची हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं आणि बेड्या ठोकल्या. दुचाकीवरुन पळून निघालेल्या या हल्लेखोरांना पकडताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. रस्त्यावर हल्लेखोर आणि पोलीस आमने-सामने आल्यानंतर काही वेळासाठी थरार रंगला होता. पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि अटक केली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.

कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एनआयएकडे या घटनेचा तपास सोपवण्यात आला आहे.

दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. बाहेरील बाजूला असणाऱ्या महामार्गावरुन दोघे दुचाकीवरुन निघाले असता त्यांना रोखण्यात आलं अशी माहिती राजसमंदचे पोलीस प्रमुख सुधीर चौधरी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

पोलिसांनी हल्लेखोरांना थांबण्यास सांगितलं असता त्यांनी तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांच्या दिशेने धाव घेत अडवलं आणि बेड्या ठोकल्या. काँग्रेसचे सोशल मीडिया को-ऑर्डिनेटर नितीन अग्रवाल यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कन्हैयालाल तेली यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत. राज्य सरकारने कुटुंबासाठी ३१ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून दोन्ही मुलांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.

तपास NIA च्या हाती, सर्व बाजू पडताळणार

या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. या प्रकरणात कोणती संस्था सहभागी होती का याचा तपास केला जाणार असून आंतरराष्ट्रीय संबंध होते का याचीही पडताळणी होईल अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments